• Home
  • Business
  • Savings is strength: In 2008 was overcome on recession only due to savings

आर्थिक मंदी / बचत हीच ताकद : २००८ मध्ये बचतीमुळेच मंदीवर केली होती मात; सध्याच्या अडचणीतही तिचीच मदत

लोकांकडे पैसा आहे, पण खर्च करत नाहीत : भार्गव, गुंतवणूक वाढल्यास बचत वाढेल : तज्ञ

Sep 08,2019 07:03:00 AM IST

मुंबई - भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे बचतच आहे. विकास दर भलेही थोडा कमी झाला असला तरी देशात बचत वाढली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या ताज्या उपलब्ध आकड्यांनुसार २०१७-१८ मध्ये एकूण देशांतर्गत आर्थिक बचत जीएनडीआयच्या (ग्राॅस नॅशनल डिस्पोजल इन्कम) १०.८% राहिली. एक वर्षाआधी ती ९.२% होती. म्हणजे आपली निव्वळ बचतही वाढली आहे. ती २०१७-१८ मध्ये ६.५% होती, तर एक वर्षाआधी हा आकडा ६.२% होता. मात्र या काळात आपली आर्थिक वित्तीय जबाबदारीही (लायबिलिटी) वाढली आहे. ती २०१७-१८ मध्ये ४.३% झाली तर एक वर्ष ती ३% च होती. मात्र, विकास दर ५% झाल्यानंतर बचतीसंदर्भात तज्ञांच्या मते, लोकांकडे पैसा आहे, पण त्यांना तो सध्या खर्च करण्याची इच्छा नाही.


अर्थव्यवस्थेतील ही मंदी मागणीत घट झाल्यामुळे आहे. ‘दिव्य मराठी’शी बोलताना मारुती-सुझुकीचे अध्यक्ष आर. सी. भार्गव म्हणाले की, सध्याची मंदी चक्रीय आहे. असे दशकात एकदा होते. अडचण ही आहे की पैसे असूनही लोकांना खर्च करण्याची इच्छा नाही. बँक आॅफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ञ समीर नारंग यांनी सांगितले की, जेव्हा मंदी येते तेव्हा लोक बँकांच्या एफडीमध्ये जास्त गुंतवणूक करतात. ते आवश्यक खाद्य गोष्टी खरेदी करतात, पण टीव्ही, बाइक, कारसाठी खर्च करत नाहीत. अशा स्थितीत सोन्याची किंमतही वाढते, पण त्याचे देशांतर्गत अर्थव्यवस्थेच्या स्थितीशी जास्त देणे-घेणे नसते. क्रिसिलचे मुख्य अर्थतज्ञ डी. के. जोशी यांनी सांगितले की, थोडी बचत वाढली तर चांगली बाब आहे, पण अर्थव्यवस्थेत सध्या वाढ कमकुवत आहे. त्यामुळे बचत वाढणे कठीण आहे. २००८ मध्ये एकूण बचत दर जास्त होता. हा दर परत कधीपर्यंत येईल, या प्रश्नावर जोशी म्हणाले की, त्यासाठी अर्थव्यवस्थेचा विकास दर ८-९ टक्क्यांपर्यंत व्हायला हवा. मार्च २०१८ मध्ये एकूण बचत दर ३०.५१% आहे. तो गेल्या वर्षीपेक्षा ०.२६% जास्त आहे.


सामान्य माणसाच्या बचतीबाबतच्या प्रश्नावर माजी मंत्री आणि अर्थतज्ञ वाय. के. अलघ म्हणाले की, बचतीची चिंता नाही. सध्या गुंतवणूक वाढायला हवी. गुंतवणूक वाढली तर स्थिती सुधारेल. केअर रेटिंगचे मुख्य अर्थतज्ञ मदन सबनवीस म्हणाले की, २००८ च्या आर्थिक संकटाच्या वेळी सरकारने प्रोत्साहन पॅकेज दिले होते, त्यामुळे लोकांत विश्वास वाढला होता. सध्या मंदी दिसत असूनही सरकारने प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केलेली नाही. मात्र सरकारने व्यवसायाची स्थिती चांगली करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, पण त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास परत आलेला नाही.


जेएनयूचे माजी प्राध्यापक आणि अर्थतज्ञ अरुणकुमार म्हणाले की, बचत सध्या स्थिर आहे. त्याचा अर्थ अर्थव्यवस्थेत अडचण कायम आहे. प्रसिद्ध अर्थतज्ञ केन्स यांनी म्हटले होते की, सर्व लोकांनी बचत केली तर खप कमी होईल आणि खप कमी झाल्यास उत्पादन घटेल. त्यामुळे गुंतवणूक वाढवावी लागेल. फक्त व्याजदर कमी केल्याने काहीही होणार नाही.

७०% वर्किंग पाॅप्युलेशन २० ते ४० वर्षांची, त्यामुळे खर्च जास्त
क्रिसिल या रेटिंग एजन्सीचे मुख्य अर्थतज्ञ डी. के. जोशी म्हणाले की, देशात सध्या वर्किंग पाॅप्युलेशनचे ७०% लोक २० ते ४० वर्षांदरम्यानचे असल्याने खर्च वाढला आहे. त्यामुळे बचतीची प्रवृत्ती कमी झाली आहे. त्यामुळेच देशात बचत वाढली आहे, पण आर्थिक देणेही त्यापेक्षा जास्त वेगाने वाढले आहे. फिजिकल असेटबाबत बोलायचे तर घरगुती बचतीत रिअल स्टेटमध्ये घसरण आहे. २०१२ मध्ये ती १५.९% होती, ती २०१८ मध्ये घटून १०.३% झाली आहे. बचतीत वाढ केली जाऊ शकते. मात्र सरकारने गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यावे. गुंतवणूक वाढल्याने मागणी वाढेलच शिवाय रोजगार, बचत दोन्ही वाढण्याची शक्यताही राहील.

१० वर्षांत कसा झाला आपल्या बचतीवर परिणाम

आपली बचत : हाऊस होल्ड सेक्टर (ग्राॅस नॅशनल डिस्पोजेबल इन्कम टक्क्यांमध्ये)

आर्थिक बचत 2016-17 2006-07
एकूण आर्थिक बचत 9.2 15.6
रोख (चलन) -2 1.7
जमा 6.3 8.8
शेअर/डिबेंचर्स 0.2 1.6
क्लेम्स आॅन गव्हर्नमेंट 0.4 -0.6
इन्शुरन्स/पीएफ/पेन्शन फंड 4.3 4
b. आर्थिक देणे 3 4.4
c. निव्वळ बचत (a-b) 6.2 11.2
स्रोत : आरबीआय वार्षिक अहवाल

देशाची बचत (यात व्यक्ती, कंपनी, सरकारच्या बचतीचा समावेश)
वर्ष बचत दर
2008 37.8%
2009 36.02
2010 36.01
2011 36.90
2012 34.64
2013 33.88
2014 32.12
2015 32.24
2016 31.09
2017 30.25
2018 30.51
स्रोत- सीबीआयसी डेटा डाॅटकाॅम

देशांतर्गत बचतीत १ वर्षात १.६% वाढ पण आपल्या देण्यातही १.३% झाली वाढ

X