आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Savita Bahirat Madhurima Article About Commenting On Today's Woman, Her Motherhood, And Her Career

हिरकणीच्या निमित्ताने...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. सविता बहिरट  

‘हिरकणी’चा ऐतिहासिक संदर्भ आणि इतिहास ठाऊक नसणारा मराठी माणूस विरळाच. हिरकणीच्या धाडसावर बेतलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. चित्रपटाच्या विषयाच्या अनुषंगानं, आजची स्त्री, तिचं मातृत्व आणि तिचं करिअर यावर भाष्य करणारा हा लेख...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरच्या जिद्दी, धाडसी आणि धैर्यवान हिरकणीची कथा आपल्या सर्वांच्याच स्मरणात आहे. किल्ल्यावर कामासाठी आलेल्या हिरकणीला अंधारामुळे गडाचे दरवाजे बंद झाल्यानं गडउतार होता येत नाही. मात्र, तिच्यावर अवलंबून असणाऱ्या तान्ह्या बाळाची आठवण तिला बुरुजावरून उतरण्याची हिंमत देते. मातृत्वाची ओढ अशक्यप्राय बुरुजावर मात करते आणि हिरकणी आपल्या बाळाजवळ पोहोचते. आज हिरकणी चित्रपटाच्या निमित्ताने या ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकला जातोय, परंतु ज्या स्त्रिया या कामाच्या निमित्ताने अर्थव्यवस्थेच्या संघटित व असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांचं काय?

कार्यालय शासकीय असो अथवा खाजगी, त्यातले वरिष्ठ अधिकारी छत्रपतींची भूमिका निभावू शकतात का? एकीकडे मातृत्वाचा गौरव केला जातो, तर दुसरीकडे ती भूमिका सर्वार्थाने पूर्ण करायला स्त्रीला पुरेसा वेळ दिला जात नाही. चित्रपटाच्या बॅनरवर प्रत्येक स्त्री ही हिरकणी असते, अशी ओळ आहे. ते निश्चितच खरे आहे, परंतु नोकरदार स्त्रियांना त्यांच्या अपत्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. एकीकडे मातृत्वाची ओढ तर दुसरीकडे नोकरीतले कडक नियम अशी तारेवरची कसरत आजच्या नोकरदार महिला करताहेत. 

पितृसत्ताक समाजव्यवस्थेत आताशा कुठे स्त्रिया आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाताहेत. मात्र, अशा महिलांना आवश्यक असणारं वातावरण समाजात नाही. मुलाच्या, कुटुंबाच्या जबाबदारीमुळे स्त्रियांना नोकरी सोडावी लागल्याची उदाहरणं तर आपल्या आसपासच दिसतात. उच्चशिक्षित स्त्रियाही मुलांच्या संगोपनासाठी घरगुती चौकटीतच अडकल्यात. ‘सुपर मॉम’, ‘सुपर वुमन’ अशा धादांत खोट्या संकल्पनांचा फुगा निर्माण केला गेलाय. त्यामुळे तर नोकरी, करिअर करू इच्छिणाऱ्या स्त्रियांची अधिकच फरफट होतेय.  मात्र जबाबदाऱ्यांच्या उदात्तीकरणामुळे याची जाणीव ना स्त्रियांना आहे ना पुरुषांना. त्यामुळेच मग घर आणि  मुलांना सांभाळून नोकरी करणं शक्य नसेल तर स्त्रियांनी नोकरी सोडावी, असाही युक्तिवाद केला जातो. एकीकडे मातृत्वाचं गौरवीकरण तर दुसरीकडे घरदार व कौटुंबिक जबाबदाऱ्यांच्या बंदिस्त वातावरणात भांडवली पितृसत्तेत स्त्रियांची मोठ्या प्रमाणात गळचेपी सुरू आहे. स्त्रिया मातृत्वाचे भांडवल करतात असा विचार मांडणारे लोक हे ‘जवळचेच’ असतात ही आणखी एक मोठी शोकांतिका. सरकारी नोकरीतल्या स्त्रियांसाठी अनेक योजना आहेत. मात्र त्याचा पुरेपूर लाभ किती जणींना घेता येतो? खाजगी क्षेत्र तर या सवलतीपासून दूरच आहे. 

पाळणाघराची सोय अनेक ठिकाणी आहे. परंतु तिथं पाल्य किती सुरक्षित असते? मातृत्वाचा नुसताच गौरव करणं उपयोगाचं नाही. जन्माला येणाऱ्या बाळाचे किमान संगोपन स्त्रियांना मोकळेपणाने, निर्धास्तपणे आपल्या कार्यालयीन वेळेत करता यावे यासाठी संघटित व असंघटित क्षेत्रात लवचिक भूमिका असणे गरजेचे आहे. आज संघटित व असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक हिरकणी आपल्या आजूबाजूला आहेत. आजही त्या प्रचंड संघर्ष करत आहेत. या हिरकणीच्या प्रयत्नांचा सर्वार्थांनी सन्मान करायलाच हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा ऐतिहासिक वारसा आपणा सर्वांना मिळालेला आहे. त्यामुळे स्त्रियांचा सर्वार्थांनी सन्मान फक्त धोरणांपुरता भाषणात बोलण्यापुरता किंवा नियमांमध्येच असू नये, तर प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवायला हवा.

लेखिकेचा संपर्क : ८६०५४९५७६०

बातम्या आणखी आहेत...