आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाट आणि ओझे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या विविध टप्प्यांवर सामोऱ्या आलेल्या वाटा आणि स्त्री आयुष्य यांची सुंदर सांगड घालत आपल्या वाचक मैत्रिणीनं उलगडलेलं मनोगत...

 

लहानपणी आम्हाला धडा होता ‘पायवाट’. त्या धड्यातलं वाटांचं वर्णन खूप अप्रतिम होते!  मला वाटते त्यातले वाटांचे वर्णन स्त्री जीवनासारखेच आहे. लहानपणीची ती धुळीने भरलेली पांदीची वाट मला फार आवडायची. त्या वाटेने मला आई डोक्यावर पाटी घेऊन येताना दिसायची. तीच वाट मला आईकडे शेतात घेऊन जायची. त्या वाटेने जाताना मला माझं शरीर, मन वजनरहित असल्याचा भास व्हायचा. पक्ष्यांसारखं हवेत तरंगल्यागत वाटायचं. कसलंही ओझं तोपर्यंत नव्हतं. ना विचारांचं, ना भावनांचं, ना संस्कारांचं. वयाप्रमाणे वाटा आणि ओझं दोन्ही वाढले. एक नवीन वाट मिळाली शाळेची. त्या वाटेमुळे डोक्यावर तोळाभर ओझ्याची रेषा उमटली. पण ते ओझं पेलल्याशिवाय जीवनाची वाट सुकर होणार नाही. आमच्यासारखी डोळे असून आंधळा अशी गत नको व्हायला, असं आई म्हणायची. मला जग उघड्या डोळ्यांनी बघायचे होते. म्हणून मी ती वाट आणि ओझे आनंदाने स्वीकारले. 


पुढे एकेक वाट वाटेला जोडत गेली. तोळाभर वजनात किलोने भर घालत गेली. शाळा, काॅलेज झाले. अनुभवांच्या गाठोड्याचा आकार वाढत गेला. तेव्हाही प्रकाशवाटा दिसायच्या, पण त्यांचा उजेड एवढा प्रखर होता की, डोळे दिपायचे. वाटलं एवढा प्रकाश डोळ्यांना सहन होणार नाही. म्हणून त्या प्रकाशवाटा सोडून वहिवाटा स्वीकारल्या. आता वाटते प्रकाशाने डोळे दिपले असते तर चालले असते. किमान अधू नजरेने का होईना प्रकाशाच्या दुनियेत राहता आले असते.


त्यानंतरची जी वाट मिळाली ती म्हणजे सासरची वाट. पुरती वाट लावली त्या वाटेने. सुरुवातीला खूप रम्य वाटली. सप्तरंगांनी माखलेली शीतल अशी. पण, या वाटेचे वैशिष्ट्य म्हणजे जे ओझे तोळ्याने, किलोने वाढत होते ते अचानक मणाने वाढल्यासारखे वाटले. लग्नापूर्वी झालेला भार उतरवायला आई चटकन पुढे यायची, पण या वाटेवरचा भार ना हलका होतो ना उतरवायला कोणी येत. पण या वाटेवरनं चालणं आवश्यक होते. या वाटेवर भावभावनांचे,  संस्कारांचे ओझे फार जड असते. 


जीवनाचा मध्य येईपर्यंत एवढ्या वाटा मिळाल्या की, आता मोजता पण येत नाहीत. धड्यातल्या त्या मनमोहक वाटा तर दिशेनाशाच झाल्या. पण, माझ्या मुलीला मी न गेलेली प्रकाशवाट दाखवणार. सापडवू दे मग तिला तिची स्वतःची वजनरहित वाट. तिला मी सांगणार आहे की, जीवन म्हणजे माझ्यासारखं वाटांच्या जाळ्यात ओझ्याखाली अडकलेली भावनांचे, संस्कारांचे, दबलेल्या विचारांची भावनाशून्य वस्तू नसून “क्षितिज’ आहे, जेथे वाटांचा अंत होतो. म्हणून ‘क्षितिजाला’ वाटाच शोधतात. मी तिला जीवनात ‘वाटा’ न शोधता ‘क्षितिजाला’ गवसणी घालण्याचे सांगणार आहे.

बातम्या आणखी आहेत...