Home | Magazine | Madhurima | Savita Prabhune writes about Bhandbhaje

भांडभजं

सविता प्रभुणे, मुंबई | Update - Aug 28, 2018, 12:31 AM IST

खरं तर हा पदार्थ आहे टोमॅटो-कांद्याचं धिरडं. पण आमच्या घरी याला ‘भांडभजं’ असं नाव आहे आणि यातच त्याची गोष्ट सामावली आहे.

 • Savita Prabhune writes about Bhandbhaje

  खरं तर हा पदार्थ आहे टोमॅटो-कांद्याचं धिरडं. पण आमच्या घरी याला ‘भांडभजं’ असं नाव आहे आणि यातच त्याची गोष्ट सामावली आहे. माझी आजी लग्न होऊन आमच्या घरी आली. ती येताना या अशा धिरड्याचं नाव घेऊन आली, ‘भांडभजं’. तिच्या घरी तिच्या आईवडिलांचं किंवा कोणाचंही भांडण झालं की, हा पदार्थ होत असे. करायला सोप्पा. भांडून डोकं ठिकाणावर नसल्यामुळे फारसा चुकायचा प्रश्न नाही. सगळा उरलासुरला राग कांदा-टोमॅटो चिरण्यात, तेल तव्यावर टाकण्यात, पीठ कालवण्यात, ते तव्यावर सोडताना चर्र असा आवाज होण्यात निघून जात असावा, असं नेहमी मला वाटे. अगदीच राहिला राग शिल्लक तर याच्या चमचमीत चवीत तो विरून जात असेल. अन्नपदार्थ रागावर उतारा होतातच. पण घरात भांडण झालं की, भांडभजं करायचं हा जसा शिरस्ता आहे, तसं भांडभजं झालं की घरात भांडण झालं असं ओळखण्याचादेखील शिरस्ता आहे. ‘आज कोणाचं?’ असा प्रश्न असतो. भांडणं सर्व कुटुंबांत होतात, प्रत्येक नात्यात होतात. पण जेव्हा माझी आई घरी लग्न होऊन आली, तेव्हा मजा आली. आई दिल्लीत शिकताना आणि पुढेही अनेक सामाजिक चळवळींत सक्रिय होती. माझे वडील वकील. अनेक सामाजिक, राजकीय, वैचारिक गोष्टींत त्यांची चर्चा होत असे, दोघं तावातावात बोलू लागले की, आजी जेवायच्या वेळी भांडभजं करी. कायद्यात बदल झाला, नवी तरतूद आली की चर्चा अटळ. अाईवडील बाहेरून खाऊन आले, जेवून आले तर भांडभजं आजोबांनाच खावं लागे. एक दिवस ते म्हणाले, ‘आपलं दोघांचं वाजलं तरच कर. यांची रोजच चर्चा होते, ते काही भांडण नव्हे.’ पुढे असं झालं की, माझे वडील एकदा आजीला म्हणाले, ‘खूप दिवसांत भांडभजं खाल्लं नाही गं!’ त्यावर आजी उत्तरली, ‘अाता मी नक्की करू तरी केव्हा!’


  मी वकील झाले तसं तर चर्चेला उधाण आलं. पदार्थ करण्याचे प्रसंग दुर्मिळ झाले, पण पदार्थाचं नाव गळलेलं नाही. त्यामागचा इतिहासही नाही. आणि त्याचं प्रयोजनदेखील. बाहेरच्यांनी हे नाव ऐकलं की प्रश्नार्थक भावाने पाहतात.
  भांडभजं ची


  कृती: सर्व मोजमाप हे रागावर अवलंबून आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. त्यात डाळीचं पीठ, मीठ, हळद, लाल तिखट, घालून धिरडी पीठ भिजवतो तसं सरसरीत भिजवावं. तव्यावर तेल टाकून, तेल गरम झाल्यावर मोहरी हिंग घालावे. तडतडली फोडणी की, सरसरीत द्रावण धिरड्याप्रमाणे पसरून खमंग झालं की, उलटावं. भांडभजं तयार.

  - सविता प्रभुणे, मुंबई
  savitaprabhune@gmail.com

Trending