आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Savita Prashant Rasik Article About Indian Idols Salman Ali And Sunny Hindusthani

आहे "गरीब' तरीही...!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सविता प्रशांत  

यापूर्वी सलमान अली आणि आता सनी हिंदुस्तानी या इंडियन आयडॉलच्या दोन गायकांनी भारतीय संगीत क्षेत्रात आपल्या भन्नाट गायकीच्या जोरावर वादळ निर्माण केलंय. एकीकडे या गायकांचं हलाखीचं जिणं यावर चॅनल टीआरपी वाढवू पाहतेय, तर दुसरीकडे अफाट गायनशैलीमुळे त्यांचे कोट्यवधी फॅन तयार झाले आहेत. चॅनल भलेही त्याच्या हलाखीच्या परिस्थितीवर फोकस करत असले तरी शेवटी त्यांचा आवाज, त्यांची गायकी हेच त्यांना तारणार आहे आणि म्हणूनच कारकीर्दीच्या संघर्षात या घडीला सलमान, सनीसारखे गायक यशस्वी होताना दिसत आहेत.


सध्या सुरू असलेल्या इंडियन आयडॉलची ऑडिशन राउंड सुरू होती. रिषभ चतुर्वेदी नावाचा एक गायक स्टेजवर दाखल झाला. महागडे बूट, ब्रँडेड कपडे-जॅकेट... गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी स्पर्धकांच्या आवडीनिवडी, कुटुंबाबद्दल जी काही माहिती विचारली जाते तशी ती रिषभलाही विचारण्यात आली. त्या वेळी तो म्हणाला, ""मला माझ्या श्रीमंतीची भयंकर चीड आहे. मी अतिशय सधन घरातला आहे, माझ्याकडे महागड्या कार आहेत. मला आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कधीच कमतरता भासली नाही आणि याचंच मला वाईट वाटतंय...'' 

"असे का'? हा प्रश्न जेव्हा परीक्षक असलेल्या नेहा कक्कडने विचारला तेव्हा रिषभने दिलेले उत्तर असे होते...
""मैं अमीर घर से हूं इसलिए मैं कभी भी इंडियन आयडल जीत नहीं सकता, यहां पर सिर्फ गरीब ही जीतते हैं.''

आता हे सगळं काही "स्क्रिप्टेड' असतं, स्पर्धकांना रेडीमेड स्क्रिप्ट दिलेली असते आणि कॅमेऱ्यासमोर काय बोलायचं हे त्यांना अगोदरच सांगण्यात आलेलं असतं... चॅनलवाले टीआरपीसाठी असे गेम खेळतच असतात असा विचार करत आपण पुढे जातो.

मग आणखी एक स्पर्धक ऑडिशन राउंडसाठी येतो. गाण्याला सुरुवात करण्यापूर्वी त्याची "एव्ही' दाखवली जाते. दिल्लीच्या कुठल्या तरी बसस्टँडच्या बाहेर हा मुलगा बूटपॉलिश करतोय... वडिलांचे अचानक निधन झाल्यामुळे त्याची आई रस्त्यांवर फुगे विकतेय आणि लोकांच्या दारी जाऊन पीठ मागतेय. ६० सेकंदांचा तो व्हिडिओ संपतो आणि काही मिनिटांपूर्वीच अगोदरच्या स्पर्धकाचे "यहां पर सिर्फ गरीब ही जीतते हैं' या डायलॉगची आठ‌वण येऊन आपण लगेचच गालातल्या गालात हसतो. 
मात्र कहाणी इथे संपत नाही...

हा जरी टीआरपीचा खेळ असला तरी तो फक्त आणि फक्त टीआरपीचा खेळ नसतो. बूटपॉलिशवाला पोरगा गायला सुरुवात करतो. "हुस्न-ए-जाना की तारीफ मुमकिन नहीं, आफरीन आफरीन'... त्याच्या पहिल्याच तानेवर परीक्षकांच्या तोंडून "वाह' निघतो... त्याच्या खड्या आवाजाला आणखी धार चढते... आता त्याने "तराणा' घ्यायला सुरुवात केलेली असते... आपण डोळे बंद करून ऐकू लागतो... गाणं संपतं आणि इंडियन आयडॉलचा कार्यक्रम पाहणाऱ्या कोट्यवधी प्रेक्षकांच्या तोंडून उद्गार निघतात... क्या बात है, अगदी नुसरत फतेह अली खानसारखा गातोय हा पोरगा... सगळ्या परीक्षकांनी त्याला "स्टँडिग ओव्हिएशन' दिलेलं असतं. तो मुलगा असतो सनी... ज्याला आता सबंध भारत "सनी हिंदुस्तानी' या नावाने ओळखतोय. गेल्या वर्षातील इंडियन आयडॉलचे दहावे पर्व  आतापर्यंतच्या आयडॉलच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेले पर्व आणि हे पर्व इतके गाजले याचे एकमेव कारण म्हणजे सलमान अली नावाचे भारतीय संगीत विश्वात शिरलेले वादळ... अफाट ताकदीचा गायक असलेला सलमान अली आज प्रत्येक भारतीयाच्या गळ्यातला ताईत बनलाय. मात्र इंडियन आयडॉलचा किताब जिंकण्यापूर्वी जेव्हा तो ऑडिशन राउंडला आला होता तेव्हाही काहीसा अशाच प्रकारचा "सीन' होता. हरयाणाच्या मेवातमध्ये राहणारा सलमान फक्त १९ वर्षांचा... मात्र जे वय शिकण्याचे-खेळण्याचे आहे त्या वयात तो गावोगावी गाण्याचे कार्यक्रम करून आपल्या १५-२० जणांच्या भल्या मोठ्या कुटुंबाचे कसेबसे पोट भरतोय. ऑडिशन राउंडला सलमान त्याच्या आवाजाची अफाट "रेंज' दाखवतो आणि परीक्षकांवर छाप पाडतो. इतका तगडा गायक शोधून काढल्याबद्दल परीक्षक आणि इंडियन आयडॉलवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. पुढचा इतिहास तमाम भारतीयांना माहीत आहेच. मात्र सलमानच्या प्रकरणात इंडियन आयडॉल टीआरपीसाठी बऱ्यापैकी चलाखी करते आणि ही चलाखी सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात लगेच पकडली जाते. एक तर सलमानला कुठल्याच कानाकोपऱ्यातून शोधून काढलेले नसते तर सलमान हा काही वर्षांपूर्वीच्या "सारेगम लिटिल चँप'चा उपविजेता असतो. दुसरे जितकी हलाखीची परिस्थिती सलमानच्या "एव्ही'मध्ये दाखवलेली असते तितकी ती मुळात नसते. सलमान हा असाही सबंध हरयाणामध्ये बऱ्यापैकी लोकप्रिय गायक असतो आणि तो आणि त्याची भावंड  गाण्याचे कार्यक्रम करत असतात. (यूट्यूबवर आजही सलमानचे इंडियन आयडॉलचा किताब जिंकण्यापूर्वीचे व्हिडिअो उपलब्ध आहेत.) आयडॉलच्या त्याच पर्वात सौरभ वाल्मीकी नावाचा एक गायक होता. चांगला आवाज असूनही केवळ दलित समाजाचा असल्याने गावात त्याला कसे झिडकारले जाते, हीन वागणूक दिली जाते यावर इंडियन आयडॉलने फोकस केला. मात्र नंतर कळले की तोदेखील टीआरपीसाठी केलेला गलिच्छ खेळ होता. वास्तविक सौरभ वाल्मीकी आणि त्याचा गायक असलेला मोठा भाऊ हे दोघेही दलित समाजाचे असले तरी त्या गावाची शान होते. कोणतीही स्पर्धा जिंकली की गावकरी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूक काढायचे. इंडियन आयडॉलच्या या प्रकारावर त्या वेळी गावकरीदेखील प्रचंड संतापले होते...

टीआरपी वाढवण्यासाठी चॅनल कोणत्याही थराला जाऊ शकतात हे निर्विवाद सत्य आहेच, परंतु पुन्हा मुद्दा हा उपस्थित होतो की गायकीचे काय...? ती तर "प्युअर' आहे... सलमान अली काय किंवा सनी हिंदुस्तानी काय, ते वाईट गातात असे कोणीही म्हणूच शकणार नाही. म्हणूनच आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सलमान अलीने आयडॉलचा किताब जिंकल्यानंतर बॉलीवूडमध्ये शिरकाव केला आणि त्याच्यापाठोपाठ आता सनीनेही... 
सनी हा साँसी समाजाचा. आपल्याकडे महाराष्ट्रात पारधी, कोल्हाटी, वडार, रामोशी यासारख्या भटक्या विमुक्त जातींवर जन्मजात गुन्हेगार जमातीचा ब्रिटिशींनी जसा शिक्का मारला होता तसाच शिक्का उत्तरेकडे राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब या भागातल्या साँसी, बेडिया, कंजर या जातींवरही होता. साँसी समाजाच्या रक्तातच कला वाहते. संगीत,नाच-गाणी हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन होते. अशाच समाजात सनी साँसी जन्मला... महान गायक नुसरत फतेह अली खान हे सनीचे आदर्श. फक्त त्यांची गायकी ऐकून ऐकून एकलव्याप्रमाणे कोणत्याही गुरुविना सनीने नुसरतची शैली अचूक पकडली. दिल्लीच्या बसस्टँडवर बूटपॉलिश करता करता मोबाइलवर नुसरतची गाणी ऐकायची आणि अखंड रियाज करत ती गाणी म्हणायची हाच सनीचा दिनक्रम होता. नुसरतची शैली त्याने इतकी अनुसरली की आज सनी जेव्हा गातो तेव्हा नुसरतलाच ऐकतोय असा संगीतक्षेत्रातील अनेक जाणकारांचा दावा आहे. 

महेंद्र ग्रुपचे चेअरमन आनंद महेंद्र यांनी दिवाळीच्या सुमारास इंडियन आयडॉलचा सनीने गायलेला एक एपिसोड पाहिला आणि ते त्याच्या प्रेमातच पडले. सनीला ऐकल्यावर लगेच त्यांनी त्यांच्या ट्विटरवर त्याचा व्हिडिअो अपलोड केला... आपल्या ट्विटरवर आनंद महेंद्र म्हणतात, ""आयुष्याचे ध्येय गाठण्यासाठी सनीची धडपड ही खूपच प्रेरणादायक आहे. त्याचे गाणे ऐकताना नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझा दावा आहे की सनीला ऐकल्यानंतर तुमचीही तीच अवस्था होईल.'' इतक्या हलाखीच्या परिस्थितीतही सनीची कमालीची गायकी ऐकून परीक्षक नेहा कक्कडने ऑडिशन राउंडलाच सनीला एक लाख रुपये दिले. (नेहा कक्कड अनेक ठिकाणी चॅरिटी देत असते, तो तिचा पब्लिसिटी स्टंट नसतो.) अजय-अतुल जेव्हा इंडियन आयडॉलमध्ये "गेस्ट जजेस' म्हणून आले होते आणि त्यांनी जेव्हा सनीला ऐकले तेव्हा त्याची तारीफ करताना दोघेही थांबतच नव्हते. कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण न घेता इतक्या ताकदीच्या गायकाला ऐकल्यानंतर अजय-अतुल यांनी सनीला त्यांच्याकडची हार्मोनियम भेट दिली. अजय-अतुल म्हणाले की, सरस्वती स्वत: तुझ्या दरवाजापर्यंत आली आहे हे तुझे भाग्य आहे. आम्ही दोघेही कुठेच शिकलो नाही की शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नाही. तुला ऐकल्यानंतर आम्हाला आमचे दिवस आठवले.'' आयडॉलचे आणखी एक परीक्षक ज्याने एका रात्रीत राणू मंडलला स्टार बनवले त्यानेदेखील त्याच्या आगामी चित्रपटासाठी सनीशी पार्श्वगायक म्हणून करार केला तर संगीतकार विशाल दादलानीने सनीची आणखी एक संगीतकार शमीर टंडनकडे शिफारस केली. पुढच्याच आठवड्यात इमरान हाश्मीचा "द बॉडी' हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि त्यात सनीने "रोम रोम' हे गाणं गायलय. या गाण्याचा व्हिडिअो यूट्यूबवर झळकला आणि काही तासांतच त्याला लाखो हिट्स मिळाले.

गायकाची किती हलाखीची परिस्थिती आहे आणि चॅनल त्या परिस्थितीवरच कसा फोकस करतो हा मुद्दा गौण आहे. आता सलमान अलीप्रमाणे सनी हिंदुस्तानीबद्दलही काही गॉसिप सुरू झालंय. कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले नसल्याचा सनीचा दावा काही लोकांनी खोडून काढला आहे. दिल्लीच्या स्वरसाधना अकॅडमीमध्ये सनी गेल्या दोन वर्षांपासून उस्ताद तिलक मलिक यांच्याकडून गायकी शिकतोय असे व्हिडिअोही काहींनी यूट्यूबवर अपलोड केले आहेत. 

असेलही कदाचित... मात्र चॅनलच्या या लबाडीत गायकाचा काहीएक दोष नसावा किंवा त्याच्या हातात काहीही नसावे. आपली कारकीर्द घडवायची असेल तर त्या गायकाला चॅनलच्या अरेरावीसमोर किंवा खोडसाळपणासमोर झुकावे लागणारच... चॅनल एकीकडे भलेही त्याच्या हलाखीच्या परिस्थितीवर फोकस करत असला तरी शेवटी त्याचा आवाज, त्याची गायकी हेच त्याला भविष्यात तारणार आहे. अरिजित सिंग, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, बेला शेंडे, मोनाली ठाकूर यांच्यापासून सुरू झालेल्या या "कारवाँ'मध्ये आता सलमान अली आणि सनी हिंदुस्तानीही सामील झाले आहेत... 

आपल्याला काय करायचंय...? आपल्याला स्पर्धकांची "दुखभरी' कहाणी... ही कहाणी सांगताना पाठीमागे सतत वाजणारी "सैराट'ची "सॅड सिग्नेचर ट्यून'... खिशातून रुमाल काढत डोळ्यांची आसवं पुसणारी वारंवार दिसणारी दृश्यं... याकडे चक्क कानाडोळा करायचा. ही "दुखभरी'कहाणी कदाचित खरी असेलही किंवा नसेलही... तो चॅनलचा टीआरपी वाढवण्याचा खेळ असेलही वा नसेलही... आपण फक्त माइकवर गाणाऱ्या स्पर्धकाच्या अस्सल गायकीचा अनुभव घ्यायचा... त्याच्या गायकीला दाद द्यायची... एका सांगीतिक मैफलीचा "फील' घ्यायचा आणि तृप्त व्हायचे... मग तो स्पर्धक गरीब असो वा श्रीमंत..!