आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील कर्तबगार लेकींचा सत्कार करुन बार्टी मार्फत सावित्रीबाई फुले जयंती साजरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेकी  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक भवन , कोरेगाव  पार्क , पुणे  येथे  विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्रातील महिलांचा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास शारदाताई बडोले, तसेच पुण्याचे समाज कल्याण आयुक्त  मिंलीद शंभरकर यांची विशेष उपस्थिती होती.

 

सदर उपक्रमा अंतर्गत दिनांक 26 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2018 दरम्यान बार्टीच्या समतादूतांमार्फत राबविण्यात आलेल्या संविधान जागर  अभियानावर तयार करण्यात आलेल्या चित्रफितीचे  राजकुमार बडोले, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे हस्ते उद़घाटन करण्यात आले. दिनांक 2 जानेवारी रोजी बार्टी कार्यालयात  आम्ही सावित्रीच्या लेकी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या  वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना मा.राजकुमार बडोले मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.


मा.राजकुमार बडोले (मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग) आपल्या भाषणात महिलाच्या विविध क्षेत्रातील प्रगतीला प्रोत्साहन देणा-या सावित्रीच्या लेकी या कार्यक्रमाविषयी तसेच सर्व वंचित घटकाच्या उन्नती करीता बार्टी मार्फत केल्या जाणा-या कार्याबदल समाधान व्यक्त केले. त्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांच्या अतुलनीय कार्याबदल अदयाप प्रलंबित असलेला भारतरत्न  पुरस्कार प्रदान करण्या विषयी  राज्यसरकार कटिबध्द असून मा.राजकुमार बडोले मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे स्वत: मा. मुख्यंमत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे विशेष पाठपुरावा करणार असल्याचे घोषित केले.

 

यावेळी बोलतांना  ते म्हणाले की आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असुन अनंत अडचणीवर मात करुन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतीराव फुले यांनी या देशात स्री शिक्षणाचा पाया रोवला याला इतिहासात तोड नाही. या देशात बुध्द काळात बुध्दांनी धम्मात प्रवेश देवुन न्याय दिला होता. महात्मा जोतीराव फुले यांनी अनिष्ट रुढी विरुध्द बंड पुकारले पुण्यासारख्या सनातनी शहरात 1848 साली महिलांना शुद्रांना शिक्षणाचे द्वार उघडे केले. प्रस्तापिता विरुध्द लढा दिला तेच कार्य शाहु महाराजांनी,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदु कोड बिलाद्वारे मांडले संविधानात महिलांना न्याय देवुन सन्मान केला. तोच वसा व वारसा आपणास पुढे न्यायचे असुन महिलांनी त्यांचा आदर्श घेवुन कार्य करावे. असे आवाहन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सावित्रीबाई व  महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित एकांकीकेचे  कलाकार सुप्रिया व सिध्दार्थ मोरे यांचे कडून सादरीकरण करण्यात आले. समारंभाचे प्रास्ताविक कैलास कणसे (भापोसे) महासंचालक बार्टी यांनी केले. प्रज्ञा वाघमारे प्रकल्प संचालक  यांनी जागर संविधानाचा या विषयी महाराष्ट्रातील समतादुतांनी  केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. सुत्र संचालन मोना फासगे यांनी केले तर आभार प्रदर्शन  आरती डोळस प्रकल्प संचालक  यांनी मानले .

 

 

यावेळी खालील मान्यवर महिलांचा गौरव करण्यात आला..
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारीत युगंधर या संगीत अल्बमच्या गीतकार व निर्मात्या  मा. शारदाताई बडोले.

पुणे व सिंधुदर्ग जिल्हयात कौटुंबिक हिंसाचार कयदा 2005 याविषयी प्रशिक्षण देऊन माहिला सक्षमीकरणाचे कार्य करणा-या ॲड. असुंता पारधे, ह्या चेतना महिला विकास संस्थेच्या संस्थापक आहेत. पुणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 या कायद्याचे प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करतात. हिसाचारग्रस्त महिलांना कायदाविषयक मार्गदर्शन तसेच मानसिक आधार देऊन हिंसाचाराविरुद्ध तक्रार करण्यास प्रेरणा देणे हे मुख्य काम व्यवसायाने वकील आहेत.


प्रा. प्रतिमाताई परदेशी १९९० पासून पुण्यात विद्यार्थी दशेत असल्यापासून सत्यशोधक विदयार्थी संघठन ते सामाजिक कार्यात सहभागी, सध्या पुणे येथील जेधे महाविद्यालयात राज्यशास्त्र या विषयाच्या प्राध्यापिका आहेत.सत्यशोधक जागर मासिकाच्या संपादक तसेच  आंतरजातीय विवाह लावण्यात सक्रीय सहभाग तसेच सत्यशोधक पद्धतीने लग्न होण्यासाठी प्रचार प्रसार व प्रयत्न करतात. त्यांना सत्यशोधक सहजीवन पुरस्कार मिळाला आहे. हिंदू कोड बिल ते ओनर किलिंग या सारख्या अनेक पुस्तकांच्या लेखिका आहेत.

 

निर्भीडपणे पत्रकारीता करुन वंचितांच्या समस्या मांडणा-या पत्रकार हलीमा कुरेशी  या इलेक्ट्रॉनिक मीडिया  न्युज १८ लोकमत पूर्वीच आयबीएन लोकमत सर्वात कमी वयाची पत्रकार आहेत. पत्रकारितेतील प्रतिष्ठित रामनाथ गोएंका राष्ट्रीय पुरस्कार, २०१६ मिळाला आहे. लीज्जत रत्न पुरस्कार,मराठवाडा पत्रकारिता रत्न पुरस्कार मिळाला आहे. माळीन दुर्घटना, एम आय टी कॉलेज मधील रॅगिंग प्रकरण, घुमान साहित्य संमेलन ,पंजाब, गोवंश हत्याबंदी चे सामाजिक आर्थिक परिणाम, सफाई कामगारांची व्यथा,वंचित घटकांचे प्रश्न समोर आणणारे अनेक वार्तांकन केलेले आहे.


भिक्षेक-याच्या पुर्नवसन व वैदयकीय सेवेसाठी कार्य करणा-या डॉ. मनिषा सोनवणे Social Health And Medicine (SOHAM ) Trust ही धर्मादाय आयुक्तांनी रजीस्टर्ड केलेली सरकारमान्य संस्था आहे.डॉ .मनिषा अभिजीत सोनवणे या संस्थेच्या अध्यक्ष असुन, संस्था समाजातील तळागाळातील लोकांसाठी कार्यरत आहे.याच संस्थेचा डॉक्टर फॉर बेगर्स हा एक नाविन्यपुर्ण प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत धार्मिक स्थळांबाहेर अथवा रस्त्यावर केवळ जगण्यासाठी म्हणुन नाइलाजाने  भिक मागणारे भिक्षेकरी यांच्या वैद्यकीय तसेच सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हे डॉ. मनीषा सोनावणे यांचे उद्दिष्ट असुन, भिक्षेक-यांना शारीरीक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक  व वैद्यकीय मदत करुन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविणे व पर्यायाने गाव, शहर, जिल्हा, राज्य "भिक्षेकरी मुक्त" करणे हे त्यांचे ध्येय आहे.


अंधश्रध्दा निर्मुलनासाठी कार्य करणा-या नंदीनीताई जाधव गेली 6 वर्षे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती  चळवळीत काम करीत आहे. अतिशय जिद्दी,महत्वकांक्षी,धाडसी,परिवर्तनशील आहेत.त्यांनी रेड लाईट एरिया मधील पिअर्सना ज्वेलरी मेंकींगचे प्रशिक्षण घेतले. अंध,अपंग,अनाथ आश्रम मधील मुलांसाठी  विविध क्राफ्टचे मेंकींगचे मोफत प्रशिक्षण शिबिर त्यांनी घेतले. मुली व महिलांना त्यांनी स्वसंरक्षणासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण दिले. लंडन येथील सिडॅस्कोचा ब्यूटी पार्लरचा एक वर्षाचा कोर्स पुर्ण केला व स्वतःची "गोल्डन ग्लोरी" नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. महिन्याला लाख रूपये मिळायचे पण पैश्यापेक्षा प्रबोधन जास्त महत्वाचे आहे असे त्यांना वाटले. स्त्रियांचे  बाह्य सौदर्य वाढविण्यापेक्षा आंतरिक विचाराचे सौदर्य वाढविणे महत्वाचे वाटल्यामुळे त्यांनी संपुर्ण पार्लर बंद करून अंनिसमध्ये पुर्ण वेळ काम करण्याचा निर्णय घेतला. डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या बरोबर एक वर्ष काम करण्याची संधी त्यांना मिळाली. जादूटोणा विरोधी कायदा व्हावा यासाठी आझाद मैदानावर "जेल भरो आंदोलनात" सहभाग घेतला आहे. अंनिस मध्ये काम करत त्यांनी  ब्युटी पार्लरचा उपयोग महिलांच्या डोक्यात असणारी जट सोडवण्यासाठी करत आहेत. डोक्यात जट झाली की त्या विषयी असणारी देवाची व समाजाची भिती यामुळे महिला जट काढण्यास तयार होत नव्हत्या. पण त्यांना समुपदेशन करून आतापर्यत ९९ महीलांच्या डोक्यात असणारी जट नंदिनीताई यांनी सोडविल्या आहेत.


अहमदनगर येथे मनोरुग्न व पीडीतासाठी मोफत इलाज करणा-या डॉ. सुचिता धामणे  ज्यांचे कुणी नाही आणि ज्यांना कुटुंबियांनी वाऱ्यावर सोडलंय अशांसाठी नगरचं माऊली सेवा प्रतिष्ठान मायेचा ओलावा देणारं घर ठरलंय. नगरच्या बाबतीत अनेक नकारात्मक गोष्टी वारंवार घडत आहेत. मात्र असं असलं तरी डॉ राजेंद्र आणि डॉ सुचिता धामणे या दाम्पत्यानं सुरू केलेलं काम तुमचा नगरकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलायला नक्कीच मदत करेल. अन्याय, अत्याचार, बलात्कार पीडित असोत कि मनोरुग्ण या सगळ्यांना माऊली सेवा प्रतिष्ठान आधार देतंय. अन्यायग्रस्तांसाठी स्वतःचं असं हक्काचं घर ठरलेल्या माऊली सेवा प्रतिष्ठानची स्थापना केलीय डॉ राजेंद्र धामणे आणि डॉ सुचेता धामणे या दाम्पत्यानं. एका बाजूला वैद्यकिय सेवेतून बक्कळ पैसा मिळवणं वाढत असताना दुसरीकडे सेवाभावासाठी झटणाऱ्या या डॉक्टर दाम्पत्याने 1998 साली सुरू केलीली ही सेवा आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे.अशा रुग्णांवर उपचार करणं खूप महागडं असतं. त्यामुळे या डॉक्टर दाम्पत्यानं वडिलोपार्जित जागेत काम सुरू केलं. शिवंगे इथं रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, 5 खाटांची सोय असलेला अतिदक्षता विभाग आणि पॅथॉलॉजीही सुरू केलीय.


भारतीय रेल्वे सेवेत कार्यरत प्रशासकीय अधिकारी रिटा हेमरंजनी या IRS अधिकारी आहेत सध्या त्या भारतीय रेल्वे प्रशासन येथे कार्यरत आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्य त्यांनी अवघ्या चार दिवसात २०,००० DVD तयार करण्याचा विक्रम केला. त्यावेळी त्या फिल्म डिविजन च्या महासंचालक पदावर सक्रीय होत्या.
महिला बस कंडक्टर सुलोचना मोरे सुलोचना मोरे यांचे पती हे PMT येथे नोकरीला होते. २००८ साली हृदयविकारामुळे त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यांनी पतीची नोकरी मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केलेत व त्यांच्या प्रयत्नांना यश देखील मिळाले.२०१० साली त्यांची PMT मध्ये महिला बस कनडक्टर म्हणून नियुक्ती झाली. सध्या त्या टिकेट चेकर म्हणून कार्यरत आहेत.या क्षेत्रात काम करत असताना त्यांना असेक समस्यांचा सामना करावा लागला पण त्यांनी माघार घेतली नाही.महिला बस कनडक्टर ची नियुक्ती झाल्यास त्या समुपदेशनाचे देखील काम करतात.त्या अतिशय आनंदाने त्यांचे काम करतात.


कवयित्री, नकुसाताई लोखंडे या सामाजिक कार्यकर्ता आहेत. फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारणा जन्सामाजात पेरण्यासाठी वस्तीपातळीवर प्रबोधनाचे काम करतात.प्रामुख्याने सांगण्याची गोष्ट म्हणजे त्यांनी शालेय शिक्षण घेतलेले नाही व किंवा शाळेत गेल्याही नाही.सामाजिक कार्यासाठी नकुसाताई लोखंडे यांना स्मिता पाटील,निळू फुलेव रमाई हे पुरस्कार मिळालेले आहेत.तसेच त्या उत्कृष्ट कवियित्री देखील आहेत.नकुसाबाईची गाणी या नावाचे कवितेचे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. व त्यासाठी स्व. भाई वैद्य ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आर्थिक सहाय्य व पुस्तक प्रकाशन करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले.


पुरुषांचे व्यवसाय क्षेत्र  मानल्या गेलेल्या रिक्षा व्यवसायात खंबीरपणे महिला रिक्षा चालक म्हणून  20 वर्षांपासून कार्यरत असलेल्या  वैशाली रासकर या रिक्षा चालक आहेत. २००१सालापासून  त्या  या क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या या कामगिरीला २० वर्षे पूर्ण झाली आहेत.वैशाली रासकर यांचे पती शाळेच्या बस वर ड्रायवर आहेत. त्यांच्या पतीने त्यांना आवड होती म्हणून रिक्शा चालविण्यास शिकविले पण हि आवड त्यांना स्वतःच्या पायावर उभे करून गेली.


वाघासोबत 15 मिनिटं झुंज देऊन रुपालीने वाचवला आईचा जीव व शेळयांचा जीव वाचविणा-या रुपाली मेश्राम घराबाहेर बांधलेल्या शेळींचा ओरडण्याचा आवाज आला आणि रुपाली शेळ्यांना पाहायला गेल्यावर वाघाने तिच्यावर हल्ला केला होता. वाघासोबत पंधरा मिनिटे झुंज देऊन आपल्या आईचे आणि स्वता:चे प्राण वाचवणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील रुपाली मेश्राम कौतुकाची पात्र ठरली आहे. भंडारा जिल्ह्यातील नागझिरा जंगलाजवळील ऊसे गावातील ही तरुणी मध्यरात्री घराच्या अंगणात बांधलेल्या शेळ्यांचा आवाज येतो. काय झाल हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणी दार उघडते पण काही कळायच्या आतच पट्टेदार वाघ हल्ला करतो. जवळपास पंधरा मिनिटांची ही झुंज चालते  आणि रुपाली विजयी होते. ही कुण्या चित्रपटातील ‘कथा’ नव्हे तर एका तरूणीने हिंमतीच्या बळावर वाघाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील आहे. वाघ दिसताच भल्यांची दातखिळी बसते परंतु रूपाली विचलीत झाली नाही हे विशेष. आपल्या जिवापाड प्रेम असलेल्या शेळीला वाचवण्यात तिला अपयश आले पण आपली आई आणि स्वताचा जीव वाचवून तिने खऱ्या अर्थाने मर्दानी असल्याच दाखवून दिले आहे.


स्मशान भुमीतील चितेच्या प्रकाशात अभ्यास करुन अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन 10 वी मध्ये 91 टक्के  मिळवणारी व सध्या फार्मसीचे  शिक्षण घेणारी पुजा गायकवाड बीड मधल्या पुजाच्या विलक्षण कहाणीमुळे  ती खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील पुरस्काराची मानकरी  आहे. पूजा तिच्या कुटुंबियांसोबत हिंदू स्मशानभूमीच्या आवारात राहते. अशा भयावह  परिस्थितीमध्ये राहून  ९१.२ % गुण मिळवून ती दहावी उत्तीर्ण झाली. हिंदू स्मशानभूमीच्या आवारात १० बाय १० फुटाच्या छोट्याशा घरात राहून त्यातही घरात दिवे नसल्याने  घराबाहेर बसूनच अभ्यास करावा लागत असे. जवळ जळत असलेल्या चितेच्या  प्रकाशात अभ्यास करत असताना पुजा ला घाबरायला झाले नाही. ती अनेक जणांच्या अंत्यसंस्काराची साक्षीदार आहे पण त्या परिस्थितही तिने तिच्या  अभ्यासावर लक्ष केंद्रित करून  दिवसातून सात ते आठ तास अभ्यास केला. तिच्या  समाजातली ती पहिली मुलगी आहे जिला दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेमध्ये इतके चांगले गुण  मिळाले.  तिच्या समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत नाही ; पण तिच्या  आई-वडिलांनी तिला  नेहमीच शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. तिच्या भावंडांना देखील ते वेळोवेळी शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करायची त्यांची तयारी असते.जर मी अभ्यास केला तर माझी भावंड पण त्यातून प्रेरित होतील आणि त्यातून ते देखील स्वतःचे  आणि आमच्या पालकांचे  जीवनमान बदलण्यासाठी सक्षम होतील  असे तीचे ध्येय आहे. सध्या ती D pharmacy च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. पुजा खऱ्या अर्थाने शिक्षणसम्राज्ञी ठरली आहे.