आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना 'नियोजन' ना नियंत्रण अंतिम भाग : सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजनेत ११ वर्षांत फक्त २८ लाभार्थी 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कुटुंबात एक किंवा दोन मुलींनंतर कुटंंंुब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना १ एप्रिल २००७ रोजी सुरू करण्यात आली होती, पण या योजनेला हवा तसा प्रतिसादच मिळाला नाही. ११ वर्षांत फक्त २८ लाभार्थीच समोर आले. त्यामुळे ही योजना वर्ग करून 'माझी कन्या भाग्यश्री योजना' ही नवी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालविकास विभागाकडे सोपवली आहे. 


या योजनेचे काम सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत केले जात होते. या योजनेंतर्गत एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या जोडप्यांना दोन हजार रुपये रोख व मुलीच्या नावे आठ हजारांचे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र दिले जात होते. दोन मुलींवर शस्त्रक्रिया केल्यास दोन हजार रुपये रोख आणि दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी चार-चार हजारांचे बचत प्रमाणपत्र देण्याची तरतूद होती. मात्र, जोडपे बीपीएल गटातील असावे, अशी अट असल्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहिले. 

 

अशी आहे नवी योजना : यानंतर १ ऑगस्ट २०१७ पासून 'माझी कन्या भाग्यश्री योजना' सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे ५० हजार रुपये, तर दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवले जाणार आहे. या ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येण्याची सोयही आहे. तसेच मुद्दल आणि व्याज वयाच्या १८व्या वर्षी काढता येते. माता वा पिता यांनी शस्त्रक्रिया केल्यानंतरच ठेवीची रक्कम मुलीच्या नावावर जमा करण्यात येते. नंतर मुलीच्या वयानुसार देय असणारी व्याजाची रक्कम तिला प्राप्त होऊ शकेल. 

 

कुणाला होईल फायदा 
१ ऑगस्ट २०१७ पासून लागू करण्यात आलेली ही योजना जिल्हाभरात राबवण्यात येत आहे. आधी या योजनेत दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) तसेच वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत असणारी (एपीएल) कुटुंबे पात्र ठरवण्यात येत होती. मात्र, सुधारित योजनेअंतर्गत साडेसात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्या सर्व घटकांतील कुटुंबांनाही योजनेचा लाभ मिळेल. 

 

काय म्हणतात अधिकारी 
- सावित्रीबाई योजना 'माझी कन्या भाग्यश्री योजने'त वर्ग करण्यात आली आहे. आता ही योजना महिला व बालकल्याण विभागाकडे सोपवली आहे. -प्रकाश ब्रह्मकर, जिल्हा विस्तार व माध्यम अिधकारी, आरोग्य विभाग 


- माझी कन्या भाग्यश्री योजनेत गेल्या वर्षी १० लाभार्थी समोर अाले होते. या वर्षी २१ अर्ज आले -आहेत. त्यांना मार्च अखेरपर्यंत योजनेचा लाभ मिळेल. -अनिल वडते, विस्तार अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग 

 

 

 ना 'नियोजन' ना नियंत्रण भाग 1: कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांत 33% घट; पुरुषांचे प्रमाण फक्त 1 टक्का 

 

ना 'नियोजन' ना नियंत्रण भाग २ : ५ वर्षांत ४८ शस्त्रक्रिया फेल, ३ वर्षांत ४ महिलांचा मृत्यू

बातम्या आणखी आहेत...