आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावता परिषदेची राज्यासह जिल्हा कार्यकारिणी बरखास्त

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

बीड : येथील सावता परिषद या सामाजिक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून संघटनेची नव्याने बांधणी करण्याचा निर्णय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतल्याची माहिती सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण अाखाडे यांनी दिली.

सावता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी बीडमध्ये पार पडली. राज्यभरातून संघटनेचे कार्यकर्ते बीडमध्ये बैठकीसाठी दाखल झाले होते. माळी समाजाचे प्रतिनिधी म्हणून छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने त्यांच्या अभिनंदनाचा आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आभाराचा ठराव या वेळी घेण्यात आला. दरम्यान, या वेळी बोलताना कल्याण आखाडे यांनी भाजपवर टीका केली. भाजपने माळी समाज आणि ओबीसींवर सातत्याने अन्याय केला. त्यामुळे आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे आखाडे यांनी स्पष्ट केले. माळी समाजाच्या न्याय हक्कासाठी व संघटन शक्ती वाढवण्यासाठी सावता परिषदेची नव्याने बांधणी करण्यात येणार असून यासाठी राज्य कार्यकारिणीसह सर्व जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यभर दौरा करून पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जातील, असे आखाडे यांनी सांगितले. बैठकीस मयूर वैद्य, संतोष राजगुरू, अभिमन्यू उबाळे, प्रा. डॉ. राजीव काळे, बाबासाहेब जाधव, श्रीकांत महाराज माळी, नाना आमले, बाळासाहेब वाडकर, मनीषा सोनमाळी, वैशाली गिरमे, संगीता सत्त्वधर यांची उपस्थिती होती.

कार्यकारिणीत कुणाला स्थान

आता सावता परिषदेच्या नव्या कार्यकारिणीत कुणा कुणाला संधी मिळते, याकडे लक्ष असेल. पूर्वी भाजपत असलेल्या आखाडेंनी छगन भुजबळांच्या समता परिषदेप्रमाणे माळी समाज सावता परिषदेखाली एक केला होता. आखाडे आता राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादीतच माळी समाजाच्या दोन संघटना झाल्या. त्यातच नव्या कार्यकारिणीत राष्ट्रवादीशी संलग्न माळी समाजातील इतर नेत्यांना स्थान मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

९ जणांची कार्यकारी समिती

सावता परिषद संघटनेची राज्य आणि सर्व जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर संघटनेचे कार्यक्रम ठरवणे, नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून संघटनात्मक बांधणी करण्यासाठी ९ जणांच्या कार्यकारी समितीची स्थापना केल्याची माहिती आखाडे यांनी दिली.


बीड येथे सावता परिषदेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे व व्यासपीठावर उपस्थित पदाधिकारी.

भाजपवर सडकून टीका

कल्याण आखाडे यांनी आपल्या भाषणातून भाजपवर सडकून टीका केली. ओबीसी नेतृत्वाच्या हिताविषयी भाजपने कधीही ब्र शब्द काढला नाही. ओबीसींना आणि त्यांच्या प्रश्नांना भाजपने अक्षरश: वाऱ्यावर साेडले. भाजपने ओबीसींवर सातत्याने अन्याय केल्याची टीका आखाडेंनी केली.
 

बातम्या आणखी आहेत...