आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावरील दत्त मंदिराच्या विरुद्ध दिशेला ऋतुपुर्णा बिल्डिंगमध्ये असलेले एसबीआय बँकेेचे एटीएम मशीनच चोरट्यांनी पळवून नेले. शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अवघ्या १८ मिनिटांमध्ये चोरांनी जमिनीमध्ये रोवलेले एटीएम नटबोल्ट उखडत चोरून नेले.
एसबीआय बँकेतर्फे राज्यातील सर्व एटीएम सेंटरची देखभाल व सुरक्षेचे काम इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. ऋतुपर्णा बिल्डिंगमधील एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्याच्या दोन मशीन आहेत. शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची चारचाकी गाडी एटीएम सेंटरसमोर आली. त्यानंतर निळे जॅकेट व हेल्मेट घातलेला, हातात स्प्रेची बाटली असलेला एक चोर आत शिरला. आत शिरताच त्याने वेगात हातातील स्प्रेने प्रथम विजेचे दिवे व नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाची शाई फवारली.
एटीएम मशीन जमिनीमध्ये समोरील दोन बाजूंनी जमिनीत रोवलेले होते. चोरांनी ते उखडून वर काढले. मागच्या बाजूने मशीनला जोडलेले वायर कापले. त्यानंतर दुकानाच्या समोरील बाजूने असलेले फायबर, काचेचे आवरण तोडून मशीन बाहेर नेत वाहनामध्ये टाकून पसार झाले. मोठा आवाज झाल्याने जवळच्याच दुकानात काम करणाऱ्या नोकराला जाग आली. तो बाहेर आल्यावर त्याला पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओसारखी गाडी वेगात जाताना दिसली. त्याने तत्काळ पोलिसांना घटनेची कल्पना दिली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आले.
एटीएम बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे फुटेज नाही
या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कॅनरा बँक असून त्या बँकेचे एटीएम सेंटर याच सेेंटरच्या शेजारी आहे. कॅनरा बँकेच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर मागील दीड महिन्यापासून खराब असल्याने त्याचे चित्रण बंद आहे, तर बँकेने मागील काही महिन्यांपासून त्यांचे एसबीआयजवळील एटीएम सेंटर रात्री अकरा ते सकाळी नऊच्या दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळू शकले नाही. तसेच नाेकर कपातीमुळे मागील काही महिन्यांपासून सायरन व सुरक्षा रक्षक ठेवणे बहुतांश ठिकाणी बंद केले आहे. या कारणामुळे चाेरांचे फावले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.