एसबीआयने डिसेंबर तिमाहीमध्ये / एसबीआयने डिसेंबर तिमाहीमध्ये नोंदवला 7 वर्षांतील सर्वाधिक 3955 कोटींचा नफा 

वृत्तसंस्था

Feb 03,2019 09:18:00 AM IST

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयला डिसेंबर तिमाहीमध्ये ३,९५५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हा सुमारे सात वर्षांतील सर्वाधिक नफा आहे. याआधी मार्च २०१२ च्या तिमाहीमध्ये बँकेला ४,०५० कोटी रुपयांचा नफा झाला होता, तर वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये बँकेला २,४१६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.


एसबीआयच्या नफ्यामध्ये ही वाढ मुख्यत्वे अनुत्पादित कर्जासाठी (एनपीए) कमी तरतूद करावी लागल्यामुळे झाली आहे. बँकेने डिसेंबर तिमाहीमध्ये अनुत्पादित कर्जासाठी ८,६७० कोटी रुपयांची तरतूद केली होती.

वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये करण्यात आलेल्या १४,१७१ कोटी रुपयांपेक्षा यंदाची तरतूद ३९ टक्के कमी आहे. तर, डिसेंबर तिमाहीमध्ये बँकेच्या एकूण कर्जात निव्वळ एनपीएचा वाटा कमी होऊन ८.७१ टक्क्यांवर आला आहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये हा १०.३५ टक्के होता, तर नेट एनपीए डिसेंबर तिमाहीमध्ये ३.९५ टक्क्यांवर आला आहे. वर्षभरापूर्वी समान तिमाहीमध्ये हा ५.६१ टक्के होता. एसबीआयचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी मार्च २०१९ पर्यंत हा आणखी कमी होऊन ३ टक्क्यांपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

रिझर्व्ह बँकेने नियम कडक केल्याने गेल्या तिमाहीत तोटा
एनपीएची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी कडक नियम लागू केले होते. यामुळे थकीत कर्जासाठी जास्त तरतूद करावी लागल्याने बँकेच्या मागील काही तिमाहींच्या आकडेवारीत तोटा दिसून आला होता. ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीमध्ये बँकेचे 'नेट इंटरेस्ट इन्कम' वार्षिक आधारावर वाढून २१.४२ टक्क्यांच्या गतीने वाढून २२,६९१ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

X
COMMENT