आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीत रात्री 8 ते 10 पर्यंत फक्त 2 तासच आतषबाजीची मुभा, लडींवर बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिवाळीच्या रात्री फक्त ८ ते १० वाजेपर्यंत दोनच तास फटाके फोडता येतील. सुप्रीम कोर्टाने मंगळवारी ही वेळमर्यादा घालून दिली. दिवाळीसह इतर सण-उत्सव वा लग्नातही फटाके फोडण्यासाठी सबंध देशात हाच नियम लागू असेल. ख्रिसमस व नववर्षी रात्री ११.५५ ते १२.३० वाजेपर्यंत फटाके फोडण्याची मुभा राहील. आता देशात फक्त कमी आवाजी, कमी प्रदूषण करणाऱ्या ग्रीन फटाक्यांच्या निर्मिती-विक्रीची परवानगी असेल, असा आदेश कोर्टाने दिला. ई-काॅमर्स वेबसाइट्सवर फटाक्यांची ऑनलाइन विक्री करता येणार नाही. सुप्रीम कोर्टाने ३ मुलांच्या याचिकेवर हा आदेश दिला. मुलांच्या वतीने त्यांच्या आई-वडिलांनी २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. तेव्हा त्यांचे वय ६ ते १४ महिन्यांदरम्यान होते. त्यावर गेल्या ३ वर्षांत अनेक आदेश जारी झाले. गतवर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांची विक्री बंद केली होती. नंतर हा नियम शिथिल केला होता. 

 

कोणते फटाके 'ग्रीन' समजले जातील? 
- कमी धूर-आवाजी फटाक्यांच्या निर्मिती-विक्रीस मुभा, पेट्रोलियम-स्फोटक सुरक्षा संस्था फटाके प्रमाणित करेल. 
- फटाक्यांत लिथियम, आर्सेनिक, अँटिमोनी, शिसेे, पाऱ्यासारखी हानिकारक रसायने नसली पाहिजेत. 
- पीईएसओ फटाके निर्मात्यांकडील कच्च्या मालाची तपासणी करणार आहे. त्यानंतरच विक्री केली जाईल. 

 

...तर ठाणे अंमलदारावर होईल कारवाई 
- रात्री १० नंतर आतषबाजी झाल्यास संबंधित हद्दीतील ठाणेदार जबाबदार मानून अवमाननेची कारवाई होईल. 
- आतषबाजी ही निर्धारित वेळमर्यादा व नियोजित स्थळी होईल, याची खातरजमा पोलिसांनाच करावी लागेल. 
- केंद्र सरकार हे राज्य सरकारांच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक स्थळी ग्रीन फटाक्यांबद्दल जागरूकता मोहीम राबवणार आहे. 
- पंजाब-हरियाणा हायकोर्टाने गतवर्षी असाच आदेश दिला. १० नंतर फटाके फोडल्याने ४३ खटले, २५ जणांना अटक झाली. 

 

उल्लंघन केल्यास परवाना रद्द, माल नष्ट 
- ई-कॉमर्स वेबसाइट्स फटाके विकू शकणार नाहीत. उल्लंघन केल्यास कोर्ट अवमाननेची कारवाई होईल. 
- प्रमाणित फटाकेच बाजारात विक्रीस आणावे लागतील. अन्यथा विक्रीचा परवाना रद्द व माल नष्ट केला जाईल. 
- पूर्व उत्पादित फटाके जे ग्रीन श्रेणीतील नाहीत, त्यांची विक्री बंद. लग्न-सणांही ग्रीन फटाक्यांचीच सक्ती. 

 

दिल्ली-एनसीआरमध्ये जास्त सक्ती 
- दिल्ली व एनसीआर राज्यांची सरकारे आपल्या भागात फक्त सामुदायिक आतषबाजीलाच परवानगी देतील. 
- आठवडाभरापूर्वी जागा ठरेल. म्हणजे लोकांना दिवाळी आधी फटाके कुठे फोडायचे याची माहिती मिळेल. 
- लग्न, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही पूर्वनिर्धारित जागांवरच ग्रीन फटाके फोडण्याची परवानगी असेल. इतर कुठेही फटाके फोडता येणार नाहीत. 

 

याबाबत संतुलित दृष्टिकाेन हवा : सर्वाेच्च न्यायालय 
फटाके निर्मिती आणि विक्री बंदीमुळे होणाऱ्या महसुलाच्या नुकसानीवर आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही. प्रदूषणाविरुद्ध संतुलित दृष्टिकोन गरजेचा आहे. जेणेकरून दोन्ही बाजूंच्या मुद्द्यांना ध्यानात ठेवून तार्किकदृष्ट्या तोडगा काढता येईल. - न्यायमूर्ती ए.के. सिकरी आणि अशोक भूषण 

 

फटाका निर्माते कोर्टात फेरविचार याचिका दाखल करणार; संघटना म्हणाली, ग्रीन फटाके नावाची कुठलीही वस्तू नसते | तामिळनाडूतील शिवकाशी येथील फटाके निर्माते सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करणार आहेत. संघटनेचे सरचिटणीस के. मरियप्पन म्हणाले, हे निर्देश कोणत्याही कामाचे नाहीत. ग्रीन फटाके नावाची कोणतीही वस्तू नसते. 

बातम्या आणखी आहेत...