आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव नगर परिषदेतील अपहार प्रकरणी 3 मुख्याधिकाऱ्यांसह 4 लेखापालावर गुन्हा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

माजलगाव : मागील आठवड्यात माजलगाव नगर परिषदेत १४ व्या वित्त आयोगात उघडकीस आलेल्या १ कोटी ४४ लाख रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा ४ कोटी १३ लाख रुपयांचा नवा अपहार समोर आला असून या प्रकरणात अभियंता कृष्णा श्रीराम जाेगदंड यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकाऱ्यांसह चार लेखापालांवर येथील शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव न.प.मध्ये विविध योजनेअंतर्गत मंजूर कामांमध्ये अपहाराच्या तक्रारीवरून ३ मे २०१९ मध्ये चौकशी समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालात १४ व्या वित्त आयोगामधील सर्वच वित्तीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे समितीने नमूद केले आहे. या अनियमिततेबाबत तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्यासह लक्ष्मण राठोड व हरिकल्याण येलगट्टे यांनी शासनास अहवाल देऊन याची माहिती देणे अनिवार्य होते. यातील गावित, राठोड, येलगट्टे यांनी पूर्ण माहितीने अनुज्ञेय नसलेल्या बाबींवर खर्च करून निधीचा एच.डी.एफ.सी. बँकेच्या खात्यावरून अपहार केल्याचे समितीच्या निदर्शनास आले. मुख्याधिकारी विवेक जॉन्सन यांनी कायदेशीर मार्गदर्शन घेऊन मंगळवारी पहाटे तीन वाजता अभियंत्यास तक्रार देण्याचे आदेश दिले. या तक्रारीवरून मुख्याधिकारी बी.सी. गावित, लक्ष्मण राठोड, हरिकल्याण येलगट्टे, तत्कालीन लेखापाल कैलास रांजवन, अशोक कुलकर्णी (वांगीकर), आनंद हजारे, सूर्यकांत सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल झाला अाहे.

वेगवेगळ्या संस्थांच्या नावासह कर्मचाऱ्यांच्या नावे धनादेश देऊन दिली बिले

अपहार प्रक्रियेत नगर पालिकेने चेअरमन खंडेश्वर सहकारी संस्था, केशवराज कन्स्ट्रक्शन, विपासा टेक्नो सिस्टम, मुंबई , गुरू इंटरप्रायजेस, साबेर कन्स्ट्रक्शन, कोमल सेल्स कार्पोरेशन, सुप्रीम इंटरप्रायजेस, महावीर इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग, रामेश्वर खराडे, बालाजी तिडके, शाहीदखान राजाखान, गुरू इंटरप्रायजेस, वैष्णवी इलेक्ट्रिकल, कुलकर्णी इंजिनिअरिंग अँड असोसिएट्स, बीड, बालाजी इलेक्ट्रिकल, शब्बीर शेख, अलीम अहमद यांच्यासह पालिकेतील कर्मचारी वैभव चव्हाण, नरेश राठोड, जावेद इनामदार, सौरभ जाधव यांसह अनेकांच्या नावावर धनादेश देऊन बिले दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शासनाने तीन लाख रुपयांपर्यंत इ टेंडर निविदा करणे बंधनकारक केले असताना शासनाचे आदेश डावलून नगर पलिकेने ई- टेंडर न करता निधी खर्च करत अपहार केला आहे.

कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण

सदरील गुन्हा हा चुकीच्या पद्धतीने दाखल केला असून यातून कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण होणार आहे. आलेला सर्व निधी नियमानुसार खर्च करण्यात आला आहे, असे माजलगाव नगर पालिकेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी सांगितले.

रकमा उचलणे गैर आहे

या प्रकरणात चौकशी झाली असून समितीच्या अहवालावरूनच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पालिकेत कसल्याही प्रकारचे दस्तऐवज या बाबतीत मिळून येत नाहीत. अस्थायी कर्मचाऱ्यांच्या व इतरांच्या नावाने आशा प्रकारे रकमा उचलणे गैर असल्याने यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. - विवेक जॉन्सन , मुख्याधिकारी, नगर परिषद

मुख्याधिकाऱ्यांनी पदभार सोडतानाच दुसरा अपहार समोर आणला

आठ दिवसांपूर्वी एक कोटी ६१ लाख रुपयांच्या निधीत देखील काम न करताच अपहार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. तत्कालीन मुख्याधिकारी गावित, अभियंता व लेखापाल यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. जॉन्सन यांना एक महिन्यासाठी माजलगाव नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचा पदभार देण्यात आला होता. अवघ्या महिनाभरात जॉन्सन यांनी अनेक प्रकार उघड केले. पदभार सोडतानाही एक मोठी कार्यवाई केली आहे.

माझ्या तक्रारीला न्याय

१३ मार्च २०१९ राेजी या प्रकरणात आयुक्त नगरविकास संचालनालय मुंबई यांच्याकडे तक्रार केल्यानंतर यात चौकशी समितीने केलेल्या चौकशीत मोठ्या प्रमाणात रकमेची अफरातफर झाल्याचे आगोदरच निष्पन्न झाले होते. आता त्यातील दोषींवर गुन्हे दाखल झाल्याने मी केलेल्या तक्रारीला न्याय मिळाला आहे. - शेख मंजूर, तक्रारदार, माजलगाव
 

बातम्या आणखी आहेत...