आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच किलो सोने म्हणून पितळ तारण ठेवून 1 कोटी 5 लाखांचे कर्ज घेतले, मास कॉपी प्रकरणातील संस्थाचालकांचा दुसरा प्रताप उघडकीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुन्हा दाखल होताच अॅड. गंगाधर मुंढे, मंगेश मुंढे शहरातून पसार
  • महाराष्ट्र ग्रामीण बँक व नगर अर्बन बँकेला गंडा
  • 'त्या' गुन्ह्याच्या वर्षभर अगोदरपासून दोघेही घेत होते कर्ज

​​​​​​औरंगाबाद : हलक्या चांदीला सोने म्हणून तारण ठेवत लाखोंचे कर्ज उचलणारे एक रॅकेट समोर आल्यानंतर शहरातील शिक्षण क्षेत्रात कार्यरत दोघांनी सोने म्हणून चक्क पाच किलो पितळ तारण ठेवत दोन बँकांकडून तब्बल १ कोटी ५ लाख ८ हजार ४८५ रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केली. विशेष म्हणजे आरोपी याच खोट्या सोन्यावर मागील चार वर्षांपासून दरवर्षी कर्ज नूतनीकरण करत होते.

श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ँड टेक्नॉलॉजीचा संस्थाचालक अॅड. गंगाधर नाथराव मुंढे, मंगेश नाथराव मुंढे यांच्यासह दिगंबर गंगाधर डहाळे या त्रिकुटाने हे रॅकेट सुरू केले होते. गुन्हे शाखेने तीन दिवसांपूर्वी जया स्मॉल फायनान्स बँकेत चांदीच्या दागिन्यांना सोन्याचा मुलामा देऊन ते तारण ठेवत तीन लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा भंडाफोड केला. मूल्यांकन करणाऱ्यास फिर्यादी करत पोलिसांनी गुन्हा दाखल करून सचिन जगन्नाथ शहाणे (३२) व शरद जगन्नाथ शहाणे (३५, दोघेही रा. न्यू बालाजीनगर) या भावांना अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


निरीक्षक मधुकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, मनोज शिंदे यांचे पथक या प्रकरणाचा तपास करत असताना शहरात आणखी एक टोळी अशा प्रकारे बँकांना सोन्याच्या जागी दुसऱ्याच प्रकारचे दागिने देऊन लाखो रुपयांचे कर्ज उचलत असल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याचा सखोल तपास केला असता महाराष्ट्र ग्रामीण बँक व नगर अर्बन को. ऑप. बँकेत हा घोटाळा झाल्याची माहिती मिळाली.

पथकाने दोन्ही बँकांत तपासणी केली असता तेथे तब्बल ५ किलो १९९ ग्रॅम सोने म्हणून ठेवलेले दागिने आढळून आले. क्रांती चौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

मूल्यांकन करणारा म्हणतो, मला व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली

पोलिसांनी दोन्ही बँकांचे मूल्यांकनाचे काम करणाऱ्या रमेश गंगाधर उदावंत याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आरोपी मुंढे बंधू व डहाळेने त्याला व त्याच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देऊन खोट्या सोन्याला खरे सोने असल्याचे नोंदवून कर्ज घेतल्याचे सांगितले. पथकाने दोन्ही बँकांमध्ये जाऊन पंचासमक्ष चित्रीकरण करत सील केलेल्या दागिन्यांची दुसऱ्या सोनाराकडून तपासणी केली. तेव्हा ते सोने नसून पितळ असल्याचे उघड झाले. त्यालाही आरोपींनी मुलामा, हॉलमार्क देऊन हुबेहूब सोन्याचे दागिने तयार केले होते. नगर अर्बन को.अाॅप. बँकेत २५९० ग्रॅम सोने ठेवत ५६ लाख ५० हजार ५५८ रुपयांचे गोल्ड लोन उचलले, तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समर्थनगर शाखेत २६०९.५५० ग्रॅम सोने ठेवत ४८ लाख ५७ हजार ९२७ रुपयांचे गोल्ड लोन उचलले.

पोलिस चौकशीनंतर उदावंतने चिठ्ठी लिहून दिली आत्महत्या करण्याची धमकी

पोलिसांनी व्हॅल्युअर उदावंतची चौकशी करून सोडून दिले. घरी अाल्यानंतर थाेड्या वेळाने उदावंत बाहेर गेला. शुक्रवारी सकाळी त्याने पत्नी व पोलिस अधिकाऱ्यांना मी आत्महत्या करत अाहे, असे लिहिलेली चिठ्ठी पाठवली. हा प्रकार कळताच एकच गाेंधळ उडाला. पूर्वाश्रमीचा अनुभव पाहता गुन्हे शाखेने तत्काळ त्याच्या घरी धाव घेतली. त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीला काॅल करताच पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधून समजूत घातली व घरी परतण्यास सांगितले.

२०१६ पासून फसवणुकीस सुरुवात, २०१७ मध्ये घोटाळ्यात अडकले

औरंगाबादजवळील चौका परिसरातील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ँड टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील २४ विद्यार्थी, ३ विद्यार्थिनींना शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या सुरेवाडी येथील निवासस्थानी पेपर सोडवताना गुन्हे शाखेने मे २०१७ मध्ये रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर संस्थाचालक अ‍ॅड. गंगाधर मुंडे, त्याचा भाऊ मंगेश मुंडे याच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात अाली होती. या प्रकरणाच्या वर्षभर आधी २०१६ मध्ये मुंढे बंधूंनी सोने म्हणून पितळ ठेवून लाखोंचे कर्ज उचलण्याचा गाेरखधंदा सुरू केला हाेता. त्यानंतर दरवर्षी ते दागिने तसेच ठेवून आतापर्यंत कर्जाचे नूतनीकरण करत हाेते. दरम्यान, मुंढे बंधू व डहाळे गुरुवार रात्रीपासून फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...