Home | International | Other Country | Schethetia panic in Sri Lanka; 16 people arrested with 4 women

श्रीलंकेत पुन्हा स्फाेटाने दहशत; 4 महिलांसह 16 जणांना अटक, ड्रोन, विमान उड्डाणाला तूर्त मनाई

वृत्तसंस्था | Update - Apr 26, 2019, 11:34 AM IST

सुरक्षा सुधारेपर्यंत सामूहिक प्रार्थना नाही : कॅथॉलिक चर्चचा निर्णय

 • Schethetia panic in Sri Lanka; 16 people arrested with 4 women

  काेलंबाे - श्रीलंकेत ईस्टर संडेला झालेल्या साखळी बॉम्बस्फाेटाच्या चार दिवसांनंतर गुरुवारी पुन्हा राजधानी परिसर स्फाेटाने हादरला. काेलंबाेपासून ४० किमी अंतरावरील पुगाेडा शहरात स्फाेट झाला. सुदैवाने त्यात काहीही हानी झाली नाही. या हल्ल्यानंतर देशात अति सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यादरम्यान गुरुवारी श्रीलंका सरकारचे प्रवक्ते सुदर्शन गुणवर्धने म्हणाले, रविवारी पंचतारांकित सिनामाेन ग्रँड हाॅटेलमध्ये स्फाेट घडवणाऱ्या दाेन आत्मघाती हल्लेखाेर भावांपैकी एकास काही वेळापूर्वी अटक झाली हाेती. परंतु नंतर त्याची सुटका झाली हाेती.


  हा हल्लेखाेर काेलंबाेचे प्रसिद्ध मसाला व्यापारी युसूफ इब्राहिम यांचा मुलगा हाेता. इल्हम अहमद व त्याचा भाऊ इशथ अहमद हे संशयित दहशतवादी कारवायांत सामील असल्याच्या वृत्तास पाेलिसांनी दुजाेरा दिला. त्यांच्याविराेधात पुरेसे पुरावे नव्हते. तेव्हा ते सुटले हाेते. यादरम्यान लष्कराच्या मदतीने तपासमाेहीम सुरू असून आणखी १६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दाेन बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. पकडलेल्यांपैकी काही आराेपी हे पाकचे असून त्यात चार महिलांचाही समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेले सर्व मुस्लिम समुदायाचे आहेत. त्यांची चाैकशी करण्यात येत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाच ठिकाणांवरही छापे टाकले हाेते.

  सहा हजार जवान तैनात, एफबीआयसह ६ परदेशी संस्थाही सहभागी
  आत्मघाती हल्ल्यामागे स्थानिक इस्लामी संघटना नॅशनल ताैहिद जमातच्या सदस्यांचा सहभाग हाेता, असे सुरक्षा दलाचे म्हणणे आहे. हल्ल्यामागे या संघटनेचा हात असल्याचे मानले जाते. परंतु या संघटनेने अद्याप हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. देशभरात सुमारे ६ हजार जवान तैनात करण्यात आले हाेते. त्याशिवाय एफबीआय, स्काॅटलंड यार्ड व भारताच्या तपास यंत्रणांसह इतर सहा परदेशी संस्थांचीदेखील मदत घेण्यात आली आहे. बुधवारी रात्री १० वाजेपासून सुरू असलेली संचारबंदी गुरुवारी मागे घेण्यात आली.

  ड्रोन, विमान उड्डाणाला तूर्त मनाई; सहा हजारांवर जवान तैनात केले

  श्रीलंकेच्या सर्व कॅथॉलिक चर्चनी पुरेशा सुरक्षेची हमी आवश्यक आहे, व्यवस्था सुधारेपर्यंत सामूहिक प्रार्थना घेण्यात येणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे. ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटात ३६० जणांचा मृत्यू झाला होता. सध्या राजधानीत सुमारे ६ हजार ३०० नौदल, लष्कराला तैनात करण्यात आले आहे. तूर्त या भागातून ड्रोन, विमान उड्डाणांनादेखील मनाई करण्यात आली आहे. साखळी बाँबहल्ल्यात किमान ३६० जणांचा मृत्यू झाला, तर ७०० जण जखमी झाले होते. हलल्यानंतर जगभरातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या होत्या.

  भारतीय उच्चायुक्त कार्यालयही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

  श्रीलंकेतील ईस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी स्फाेटादरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयासदेखील लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला हाेता. काेइम्बतूरमध्ये इसिसच्या माॅड्यूलच्या तपासादरम्यान राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) श्रीलंकेच्या कट्टरवादी जाहरान हाशिमचा व्हिडिआे मिळाला हाेता. या व्हिडिआेमध्ये भारतीय उच्चायुक्त कार्यालयास लक्ष्य करण्यात आले हाेते. याआधारे भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेच्या गुप्तचर संस्थांना दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्क करणारा संदेश पाठवला हाेता. परंतु श्रीलंकेने त्यावर तातडीने कार्यवाही केली नव्हती.

Trending