आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून ५ शहरांत चित्रपटगृहे, व्यायामशाळा, स्विमिंग पूलही बंद; मुख्यमंत्र्यांची घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १८, पुण्यात १०, नागपुरात ३
  • मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी राज्य सरकारचे आदेश

मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने (कोव्हिड - १९) थैमान घातले असून राज्यातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १८ वर गेला आहे. कोरोना आणखी पसरू नये यासाठी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी - चिंचवड येथील चित्रपगृहे, व्यायामशाळा, स्विमिंग पूल पुढील सूचना देईपर्यंत बंद ठेवण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. यानंतर पत्रकार परिषदेतही त्यांनी याबाबत माहिती दिली. चीन, दक्षिण कोरिया, इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इराण व दुबईहून शुक्रवारी राज्यात आलेल्या प्रवाशांचीही तपासणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी राज्यात एपिडेमिक अॅक्ट १९४५ नुसार सरकारने काही सूचना जारी केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे एकूण १८ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये मुंबईत ३, ठाण्यात १, नागपूरमध्ये १ आणि पुण्यात १० रुग्ण आहेत. मात्र सर्व रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची आहेत. विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबतचे विस्तृत निवेदन केले. 
 

बाधित भागात १० वी, १२ वगळता शाळा बंद :


पुण्यातील रुग्णांची संख्या पाहता पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. या शाळांतून १० वी, १२ वीच्या वर्गांना वगळले जाईल. पुणे वगळता मुंबई-ठाण्यासह अन्य भागांमधील शाळांबद्दल मात्र कोणताही निर्णय घेतलेला नाही. 

मॉल सुरू, मात्र लोकांनी जाणे टाळावे :


येत्या १५ दिवसांत या परिसरातील हॉटेल व मॉल बंद ठेवण्यात येणार नाहीत. तथापि, लोकांनी शक्यतो अशा ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

प्रवास, हॉटेलिंग टाळावे


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नागरिकांनी अनावश्यक प्रवास करणे टाळावे. तसेच हॉटेलमध्येही जाणे टाळण्याचा प्रयत्न करावा. शक्य असेल तिकडे खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी. 
 

नगरमध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण!

दुबईहून १ मार्चला नगरला परतलेल्या ४ संशयितांपैकी एकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.  चौघांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. एकाचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे.

नागपूर : तीन जण पाॅझिटिव्ह

येथील कोरोना रुग्णांचा आकडा तीनवर गेला आहे. रुग्णाची पत्नी व त्याच्या सहकाऱ्यालाही कोरोना झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. पुणे : रुग्णांचा आकडा १० वर 

पुण्यातील रुग्णांची संख्या १० वर गेली आहे. दुबईवरून आलेल्या ७ प्रवाशांसह अमेरिकेतून आलेल्या दाेघांना लागण झाली आहे. मुंबई विमानतळावरून पुण्यात प्रवासी घेऊन आलेल्या चालकालाही काेराेनाची लागण झाली. त्याशिवाय अन्य नवीन पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या ३ किमी परिसरातील ८,७७७ घरांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे.कार्यक्रमांना परवानगी नाहीच  


धार्मिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. यासाठी सरकार परवानगी देणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमांना परवानगी दिली असेल तर ती रद्द करावी, असे आदेश आहेत. ग्रामपंचायत निवडणूक लांबणार? 

लग्न समारंभ कमी गर्दीचे करावेत आणि ग्रामपंचायत निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा केली जाईल, अशी माहिती नंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. रुग्णांवर आयसोलेशनमध्ये उपचार 

सर्व रुग्ण विलगीकृत वॉर्डात आहेत.ते सर्वजण दुबई, अमेरिका व फ्रान्समधून आले आहेत. केंद्र सरकारने चीन, द. कोरिया, इटली, जर्मनी, फ्रान्स व इराणमधल्या प्रवासावर बंदी घातली आहे. 

बातम्या आणखी आहेत...