आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या सभेत किशोरवयीन विद्यार्थ्यांनी पाहिले गदारोळाचे प्रात्यक्षिक 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मनपा सर्वसाधारण सभेत गोंधळ झाला नाही, असे होत नाही. बुधवारची सभाही याला अपवाद नव्हती. परंतु यामुळे ज्ञानेश विद्या मंदिर शाळेच्या इयत्ता आठवीच्या २२ विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वेगळीच भर पडली. ते सभेचे कामकाज पाहण्यासाठी आले होते. पत्रकार गॅलरीतून ही मंडळी सभा अनुभवत होती. सभेनंतर त्यांनी महापौरांवर "सर्व नगरसेवक एकाच वेळी का बोलतात? त्यांना महापौर शिक्षा का करत नाहीत?' अशा प्रश्नांचा भडिमारही केला. सभेच्या सुरुवातीपासून ते थेट संपेपर्यंत त्यांनी येथे गोंधळच बघितला अन् 'नगरसेवक होणे नको रे बाप्पा' म्हणतच ही मंडळी घरी गेली. 

 

सभा सुरू होण्यापूर्वीच १४ वर्षांचे हे विद्यार्थी सभागृहात दाखल झाले. त्यांना पत्रकार गॅलरीत जागा देण्यात आली. सभा सुरू होताच पाण्याच्या विषयावर चर्चा सुरू झाली अन् तेथून गोंधळाला सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे एकाच वेळी बहुतांश नगरसेवक बोलत होते. त्यामुळे कोण काय बोलतेय, हे त्या विद्यार्थ्यांना समजले नाही. पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता वैष्णवी कायंदे म्हणाली, हे सर्व जण एकत्र का बरे बोलतात? ते काय बोलले हे कळलेच नाही. शाळेत तर एका वेळी एकालाच बोलण्याची संधी असते, दुसरे कुणी बोलले तर त्याला शिक्षा होते, येथेही शिक्षेची तरतूद असली पाहिजे. तर ओम बोचरे म्हणाला, मी शाळेत नागरिकशास्त्र वेगळेच शिकलो. सभा तहकूब झाल्यानंतर या मंडळींनी येथे जेवणाचा आस्वाद घेतला. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्यावरही प्रश्नांचा भडिमार केला.

 

मुलांचा प्रश्न : नगरसेवक एकाच वेळी का बोलतात? महापौर शिक्षा का करत नाहीत? 
मनपा सर्वसाधारण सभेचे कामकाज पाहण्यासाठी आलेले विद्यार्थी सभागृहातील गोंधळ पाहून असे स्तब्ध झाले. छाया : मनोज पराती 


काही समजले, काही प्रश्न पडले 
कचरा, पाणी हे प्रश्न सोडवणे सोपे होते, असे आम्हाला वाटले; पण आता दिसले की हे सोपे काम नाही. 
 नगरसेवक काय बोलले हे आम्हाला कळले नाही, महापौर साहेब, तुम्हाला ते कसे समजले? 
 आम्ही चुकूनही नगरसेवक होण्याची विचार करणार नाही. 
 तिजोरीत पैसे नाही म्हणता, मग कर गोळा का करत नाही? 
 आमच्या शाळेसमोर कचरा डेपो झाला आहे, तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही, याचे कारणही आता समजले. 
काय अनुभवले? : नगरसेवक एकाच वेळी बोलत होते. वारंवार महापौरांसमोर येऊन थांबत होते. आधी मला बोलू द्या, असे जोराने ओरडत होते. अधिकाऱ्यांची उत्तरे पूर्ण होण्यापूर्वीच दुसराच बोलत होता. अधिकारी बदमाश आहेत, असे शब्दही त्यांच्या कानी पडले. 
 

बातम्या आणखी आहेत...