SCO Council / एससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे

चीनने मज्जाव केला तरीही मोदींनी दहशवादाचा मुद्दा उपस्थित केलाच

वृत्तसंस्था

Jun 14,2019 09:08:00 AM IST

बिश्केक/नई दिल्ली - प्रधानमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी किर्गिस्तानच्या बिश्केकमध्ये शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर परिषदेनिमित्त चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्याबाबत चर्चा केली. मोदींनी पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. परराष्ट्र सचिवांनी दोन्ही नेत्यांत झालेल्या चर्चेची विस्तृत माहिती दिली. ते म्हणाले की, पाकिस्तानने दहशतवादमुक्त वातावरण बनवण्याची गरज आहे, सध्या तसे होत असल्याचे दिसत नाही, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याची गरज आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग यांना सांगितले. मोदींनी जिनपिंग यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले, ते त्यांनी मंजूर केले. विशेष म्हणजे ११ जूनला चीनचे परराष्ट्रमंत्री लू कांग यांनी म्हटले होते की, एससीओला पाकिस्तानला लक्ष्य करण्याचा मंच केले जाऊ नये.

वुहानसारख्या परिषदेसाठी भारतात बोलावले

पुन्हा पंतप्रधान झाल्याबद्दल जिनपिंग यांनी मोदींचे अभिनंदन केले. त्यांच्याशी भेटीनंतर मोदींनी ट्विट केले की, जिनपिंग यांच्याशी फलदायी चर्चा झाली. मोदी म्हणाले,‘वुहानच्या चर्चेनंतर दोन्ही देशांतील संबंधात एक नवी गती आली आहे. दोन्ही देशांत रणनीतिक चर्चेत वेगाने प्रगती झाली. त्यामुळे परस्परांची चिंता आणि हितांबद्दल आम्ही जास्त संवेदनशील आहोत.’ गेल्या वर्षी चीनच्या वुहानमध्ये मोदी-जिनपिंग यांच्यात अनौपचारिक चर्चा झाली होती. ही चर्चा पुढे नेण्यासाठी मोदींनी जिनपिंग यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिले. दोन्ही देशांतील संबंधांना या वर्षी ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे दोन्ही देश ७० कार्यक्रम घेतील. तत्पूर्वी, मोदी येमेन, इराणमार्गे किर्गिस्तानला पोहोचले.

निमंत्रण: पुतीन यांचे मोदींना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण

जिनपिंग यांच्या भेटीनंतर मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचीही भेट घेतली. मोदींनी अमेठीत रायफल निर्मिती केंद्र स्थापन करण्यासाठी रशियाच्या पाठिंब्यासाठी पुतीन यांचे आभार मानले. परराष्ट्र सचिव विजय गोखलेंनी सांगितले की, पुतीन यांनी मोदींना व्लादिवोस्तोकमध्ये होणाऱ्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित केले. मोदींनी ते स्वीकारले आहे.

एससीओ: सदस्य देशांची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या ४२%

एससीओ आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा मंच आहे. भारत २०१७ मध्ये त्यात सहभागी झाला. कझाकिस्तान, चीन, किर्गिस्तान, पाक, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे इतर ७ देश आहेत.
एससीओ भौगोलिक आणि लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठी संघटना आहे. ती ४२% लोकसंख्या, २२% भौगोलिक आणि २०% जीडीपीचे प्रतिनिधित्व करते.

आज: भारत आण किर्गिस्तान यांच्यात होणार विविध करार

पंतप्रधान मोदींच्या बिश्केक दौऱ्यात भारत आणि किर्गिस्तानमध्ये जीव विज्ञान आणि औषध या क्षेत्रांत एकत्रितपणे शोध करण्यासाठी संबंधित करारासोबतच आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात करार होण्याची शक्यता आहे. हवामान विज्ञानाशी संबंधित करारही होईल. मोदींसोबत पाकचे पंतप्रधान इम्रान खानही परिषदेत सहभागी होत आहेत, पण मोदी त्यांची भेट घेणार नाहीत.

X
COMMENT