आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरीही… हम साथ साथ हैं

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकापेक्षा एक उत्कंठावर्धक प्रसंगांची मालिका असलेला, क्षणाक्षणाला रंग बदलत जाणारा, घराणेशाही, राजकारण, कौटुंबिक कलह अशा अनेक अंगांनी जाणारा राष्ट्रवादी प्रॉडक्शनचा ‘फिर भी … हम साथ साथ हैं’ हा सिनेमा मराठी माणसाने तुकड्या-तुकड्यांत पाहिला. शनिवारी त्याचा अखेरचा सीन झळकला. आता संपूर्ण सिनेमाची पटकथा खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी...
 

सीन पहिला : (काळ साधारण २०५० चा. पार्थ पवार यांचा बंगला. पार्थ कार्यकर्त्यांना त्यांच्या दिवाणखान्यात लावलेली पवार कुटुंबीयांची छायाचित्रे दाखवत आहेत. सर्वात शेवटी अजित पवार यांचे डोळ्यांतून अश्रू ओघळत असल्याचे चित्र दिसते.)
 
एक कार्यकर्ता : भय्यासाहेब, हे नेमके काय आहे? दादांच्या डोळ्यातून अश्रू … हा नेमका काय प्रकार? केव्हाची घटना?
पार्थ : (डोळ्यावरील चष्मा काढतात. आता फक्त पार्थ यांचाच चेहरा दिसतो.) ही २०१९ ची म्हटलं तर फार मोठी, पण म्हटलं तर दोन दिवसांत संपलेली कहाणी आहे. 

फ्लॅशबॅक ... 

सीन दुसरा : (स्थळ : शरद पवारांचा बंगला. वेळ : सकाळची. बंगल्यात व बाहेरील बाजूला मीडियावाले, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी. झेंडे उंचावत लोक घोषणाबाजी करत आहेत. (नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड गर्दीतून वाट काढत ये-जा करत आहेत. आव्हाड गर्दीसमोर येतात.)

आव्हाड :  मराठी माणसाची अस्मिता असलेल्या आपल्या पवारसाहेबांचा काहीही संबंध नसताना ईडीने आरोपी म्हणून गुंतवले. आता पवारसाहेब थोड्याच वेळात स्वत: होऊन ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. (पवारांच्या नावाने घोषणाबाजी होते. तेवढ्यात बंगल्यासमोर पोलिसांचा ताफा थांबतो. घोषणाबाजी वाढते. पोलिस अधिकारी घाईघाईने बंगल्यात जातात.)
 

सीन तिसरा : (स्थळ : अजित पवारांचा बंगला. ते सोफ्यावर बसलेले. चेहऱ्यावर तणाव. फोनवर बोलताहेत. तेवढ्यात पीए येतो.)
 
पीए : साहेब, मी देऊन येतो ते.
अजित पवार : (मोबाइल स्वीच ऑफ करत) हे बघ, कुठेही लीक होता कामा नये. बागडेसाहेबांचा सचिव तिथे तुला भेटेलच. त्याच्याच हातात दे. आता मी मोबाइल बंद केलाय.

(पीए “होय साहेब’ म्हणून निघून जातो. अजित पवार भिंतीवर नजर फिरवतात. तिथे त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतानाचा भला मोठा फोटो लावलेला आहे. त्याकडे ते बघत राहतात.)

सीन चौथा : (पुन्हा शरद पवार यांचा बंगला. घोषणाबाजी टिपेला पोहोचलेली. पवार बंगल्यासमोरील हिरवळीवर येतात. मीडियावाले त्यांना घेरतात. घोषणांचा आवाज हळूहळू कमी.)
 
पवार : ईडीवाल्यांनी नोटीस दिल्यावर त्याचं त्यांच्या कार्यालयात जाऊन उत्तर देण्याचं मी ठरवलं होतं. पण काही अत्यंत वरिष्ठ पोलिस अधिकारी नुकतेच येऊन भेटले. ते म्हणाले की, तुमच्या कार्यालयात जाण्यानं कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मीदेखील मुख्यमंत्री राहिलो आहे. गृहमंत्रालय सांभाळले आहे. त्यामुळं मला परिस्थितीची जाणिव आहे. म्हणून मी तूर्तास ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला आहे.
(खूप जोराचा वारा सुटल्याचा आवाज येतो. पाठोपाठ ढग गडगडण्याचाही आवाज येऊ लागतो. मलिक, आव्हाड आकाशाकडे पाहू लागतात. पवार वळून बंगल्यात जाऊ लागतात.)
 

सीन पाचवा : (संजय राऊत यांचा बंगला. ते चॅनलवाल्यांशी बोलताहेत. मागे भिंतीवर शरद पवार, बाळासाहेब ठाकरे एकत्र असलेले छायाचित्र.)

राऊत : शरद पवारसाहेब म्हणजे देशाच्या राजकारणातील भीष्म पितामह आहेत. त्यांना सरकारने विनाकारण या प्रकरणात गोवले आहे. हे शिवसेनेला मुळीच मान्य नाही. (कट २) चंद्रकांत पाटील : पवार कुटुंबातील वाद मिटावा अशी अंबा चरणी प्रार्थना
 

सीन सहावा : (एका दैनिकाचे कार्यालय. कर्मचारी आपापल्या कामांत व्यस्त. एवढ्यात टीव्हीवर “अजित पवारांचा आमदारपदाचा राजीनामा’ असे दिसू लागते...आणि काम करणारी मंडळी टीव्हीसमोर गोळा होतात.)

सीन सातवा : (शरद पवारांची पत्रकार परिषद. ईडीसमोर का गेलो नाही, असे ते सांगतात. पण पत्रकारांना त्यात स्वारस्य नाही. ते अजित पवारांच्या राजीनाम्याविषयीच प्रश्न विचारत राहतात.)
 
सीन आठवा  : (एका चॅनलचा रिपोर्टर अजित पवारांच्या राजीनाम्याने राजकीय भूकंप झाला आहे. शरद पवारांचे नाव भ्रष्टाराचारात गोवले गेल्यानेच अजितदादांनी राजीनामा दिला असावा, असे सांगितले जात आहे. पण यामागे कौटुंबिक कलहच असल्याचे आमच्या सूत्रांनी सांगितले. सुप्रिया सुळे आणि अजितदादांमधील वाद वाढल्यानेच दादांनी आमदारकी सोडली आहे, अशीही चर्चा आहे. पण नेमके खरे कारण दादा जेव्हा सर्वांसमोर येतील, तेव्हाच उघड होणार आहे.) 
 

सीन नववा : (पत्रकार परिषदेसाठी तुंबळ गर्दी. आवाज. अजित पवार येतात. खुर्चीवर बसतात. माइक ओढून घेत निवेदन करतात. सोबत धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ)
 
अजित पवार : शिखर बँकेत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आहेत. मात्र शरद पवार हे कोणत्याही पदावर वा सभासदही नसताना एफआयआरमध्ये त्यांचे नाव आल्याने मी अस्वस्थ होतो. या घोटाळ्यात माझे नाव असल्यानेच शरद पवार यांचेही नाव समाविष्ट करण्यात आले. ज्या पवार साहेबांमुळे मी इथवर पोहोचलो त्यांची वयाच्या ८० व्या वर्षी अशी बदनामी होणे मला आवडले नाही, आणि त्यामुळेच मी राजीनामा दिला.

पत्रकार : पण तुम्ही असे नॉट रिचेबल का झालात?
अजित पवार : (डोळ्यात पाणी..वातावरण स्तब्ध. पत्रकारांच्या चेहऱ्यावर आश्चर्य. अश्रू आवरत. पाण्याचा घोट घेत) मला खूप राग आला होता. शिखर बँकेत १०८८ कोटींची अनियमितता असल्याचा ठपका होता. भ्रष्टाचार नव्हता. तरीही २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे चित्र रंगवण्यात आले. 
 
पत्रकार : पण तुम्ही राजीनामा देणार हे तुमच्या काकांनाही का सांंगितले नाही?
अजित पवार : (काही क्षण थांबत) असंय की, मी जर राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याला राजीनामा देण्याबाबत बोललो असतो तर त्यांनी मला त्यापासून परावृत्त केले असते.
 
पत्रकार : कौटुंबिक कलहामुळे तुम्ही राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे. खरं काय आहे?
अजित पवार : आमच्या कुटुंबात कोणताही कलह नाही. शरद पवार हे कुटुंबप्रमुख. त्यांच्या सल्ल्यानेच आम्ही काम करतो. 
 
पत्रकार : मग आज शरद पवारांची भेट झाली का?
अजित पवार : होय. हे पाहा. तासभर चर्चा झाली. (असे म्हणत टीव्ही ऑन करतात. त्यावर शरद पवार, सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार बंगल्याच्या आतील बाजूस एकमेकांशी बोलत असल्याचे दिसते. पवार टीव्ही ऑफ करतात.) मी जो निर्णय घेईन तो तुला मान्य करावा लागेल, असे पवार साहेबांनी मला निघताना सांगितले. मी त्यांच्या नजरेला नजर भिडवू शकलो नाही.
 
पत्रकार : तु्म्ही आज भाजपवर आरोप करीत आहात, परंतु तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते ना?
पवार : ते राज्याचे प्रमुख होते. एखाद्या गोष्टीचा संशय आला की कारवाई करण्याचा त्यांना अधिकार आहे. शिखर बँकेत घोटाळा झाल्याचे त्यांना वाटले आणि म्हणूनच त्यांनी संचालक मंडळ बरखास्त केले. आताच्या भाजप सरकारने विनय कोरे, पंकजा मुंडे, कल्याणराव काळे यांच्यासह इतर चार कारखान्यांनाही एनपीए असतानाही अशीच मदत केली आहे. शिखर बँक, जलसंपदा घोटाळ्याची चौकशी किती वर्षं चालवायची यालाही काही मर्यादा आहे की नाही? न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, परंतु आम्हाला भावना आहेत की नाहीत?
 
पत्रकार : म्हणजे एकुणात सगळ्या नाट्यावर पडदा पडला आहे, असं महाराष्ट्रातील जनतेनं समजावं की नाही?
अजित पवार : होय, होय. आणि त्या ठिकाणी असंय की, एवढं सगळं होऊनही...फिर भी हम साथ साथ हैं.

सीन दहावा : (पार्थ पवार पुन्हा कार्यकर्त्यांसोबत.)
कार्यकर्ता : पण भय्यासाहेब...त्यापुढं काय झालं?
दुसरा कार्यकर्ता : अरे, त्यासाठी आपल्याला याचा सिक्वेल पाहावा लागेल. (सगळे हसतात. पार्थही त्यात सामील होतात.)

पटकथा लेखन : श्रीकांत सराफ