बायकोसोबत चालवत होता / बायकोसोबत चालवत होता मिठाईचे दुकान, अचानक बायकोने दुकानावर येणे केले बंद; लोकांनी विचारले तर समोर आले भावनिक कारण

दिव्य मराठी वेब टीम

Nov 10,2018 04:32:00 PM IST

सीलबीच : कॅलिफोर्निया स्टेटमध्ये राहणारा एक व्यक्ती पत्नीच्या मदतीने डोनटचे दुकान चालवत होता. काही आठवड्यांपूर्वी त्याच्या पत्नीचे दुकानात येणे अचानक बंद झाले. तो एकटा दुकान सांभाळू लागला. नेहमीच्या ग्राहकांच्या ते लक्षात आले. त्यांनी चौकशी केल्यानंतर समजले की, त्या महिलेला एक गंभीर आजार आहे. त्यामुळे तिला चालणे फिरणे शक्य नव्हते. लोकांनी त्याला मदत करायचे ठरवले. पण या व्यक्तीने आर्थिक मदत स्वीकराण्यास स्पष्ट नकार दिला. मग ग्राहकांनी एक शक्कल लढवली.


एकटाच दिसत होता दुकानावर

>> अमेरिकेत राहणाऱ्या जॉन चॅन आणि त्याची पत्नी स्टेला ही कथा आहे. दोघे डोनटचे दुकान चालवत होते. स्टेलाला मेंदूचा आजार झाल्याने तिला चालता फिरता येत नव्हते. ग्राहकांना हे समजले तेव्हा त्यांनी जॉनला मदत देऊ केली. पण त्याला ते मान्य नव्हते.

>> जॉन रोज सकाळी डोनट्स बनवायचा आणि सर्व डोनट्सची विक्री केल्यानंतर पत्नीला भेटायला जायचा. त्यामुळे त्याच्या ग्राहकांनी त्याला वेगळ्या प्रकारे मदत देऊ केली.

डोनट्सची खरेदी वाढवली

ग्राहकांनी जॉनला मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोनट्स खरेदी करणे सुरू केले. कोणी शाळेतील मुलांसाठी, तर कोणी त्यांच्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांसाठी डोनट्स खरेदी करत होते. लवकर आणि जास्त डोनट्सच्या विक्रीमुळे जॉन सकाळी 10 वाजता मोकळा व्हायचा. जॉन या सर्वाबद्दल ग्राहकांचे आभार मानत आहे. स्टेलाच्या अनुपस्थितीत जॉनची बहीण त्याला मदत करते.

X
COMMENT