आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत जनावरांच्या हाडांपासून तेल, भुकटी बनवणारा कारखाना सील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - तालुक्यातील पिंपरी व चिलवडी परिसरात मृत जनावरांच्या हाडापासून तेल व भुकटी तयार करण्याचे कारखाने महसूल प्रशासनाच्या वतीने अखेर सील करण्यात आले आहेत. मात्र, सातत्याने सील काढून कारखाना सुरू करण्याचा प्रकार होत असल्यामुळे संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे. कारखाने बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयतच हाडे व मांस आणून टाकण्याचा इशारा  शिवसेनेच्या वतीने देण्यात आला होता. तसेच भाजपनेही यासंदर्भात कारवाईची मागणी केली होती.

 
तालुक्यातील पिंपरी व चिलवडी परिसरात मृत जनावरांच्या  हाडापासून तेल व पावडर तयार करण्याचे कारखाने मागील अनेक वर्षांपासून सुरू आहेत. दरम्यानच्या काळात  प्रशासनाच्या वतीने २७ जुलै २०१६ ला कारखाने सील करण्यात आले होते. कारखाना मालक शफिक अब्दुल माजिद कुरेशी (रा. ख्वाजानगर, उस्मानाबाद) याने उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे कच्चा माल व यंत्रणा अन्य ठिकाणी हलवण्यासाठी १०० रुपये मुद्रांक शुल्कावर शपथपत्र सादर करून कारखाना पुन्हा सुरु करणार नाही, असे हमीपत्र दिले होते.  यामुळे उपविभागीय दंडाधिकारी यांनी २० जानेवारी २०१७ ला सील उघडण्याचे आदेश पारीत केले होते.

 

त्यानुसार संबंधितास सील काढून देण्यात आले. परंतु, कुरेशी याने आदेशाला ठेंगा दाखवत पुन्हा कारखाना सुरू केला. यामुळे ग्रामीण पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात मंडळ अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

 

दुर्गंधीमुळे जनतेला त्रास  
कुजलेली हाडे व मांसापासून सुटणाऱ्या दुर्गंधीमुळे पिंपरी, चिलवडी, सुर्डी, झरेगांव, वलगूड, जुनोनी, राघुचीवाडी आदी गावातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.  कारखान्याच्या परिसरात असलेल्या सुमारे एक किलोमीटर परिघापर्यंत उग्र दुर्गंधी येत असल्यामुळे शेतात कामही करता येत नाही. 

बातम्या आणखी आहेत...