आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ती\' कोण? मुंबईतून येऊन पुण्यात मराठा अांदाेलकांना भडकावणाऱ्या तरुणीचा शाेध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन संपल्याची घोषणा मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आल्यानंतरही तिथे थांबून राहिलेले ऐंशी-नव्वद तरुण कोण? मुख्यमंत्री आणि पोलिसांविरोधात अत्यंत अर्वाच्य भाषा वापरून पोलिसांनी बळाचा वापर करावा असा प्रयत्न करणारी ‘ती’ तरुणी कोण? भडकाऊ विधाने करून आंदोलकांना चिथावणारी ‘ती’ कोण? या प्रश्नांचा शोध पुणे पोलिस घेत आहेत. सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेली ही तरुणी मुंबईतून उठून खास पुण्याच्या ठिय्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या तरुणीबद्दलचे गूढ आणखी वाढले आहे.


गुरुवारी (ता. ९)  पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ केलेल्या ठिय्या आंदोलनात काही कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. त्यात आमचे मराठा कार्यकर्तेही असतील पण त्यांचे नियंत्रण ‘बाह्य शक्ती’ करत होत्या, असे पुण्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांचे म्हणणे आहे.

 

मराठा महासंघाचे सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड, शांताराम कुंजीर, विकास पासलकर आदी ठिय्या आंदोलनाचे मुख्य आयोजक होते. हे सर्व आयोजक गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनात असल्याने पुण्यातल्या स्थानिक मराठा मंडळींमध्ये ते परिचयाचे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर या नेत्यांनी आंदोलन संपल्याची घोषणा करत सर्वांना शांततेत घरी जाण्याचे आवाहन केले. त्यानंतर धुडगूस सुरू झाला.

 

नेहमीच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर स्थानिक मराठा तरुणांची गर्दी पांगू लागली असतानाच अचानकपणे एका तरुणीने आक्रमक भाषण करायला सुरुवात केली. पोलिस अधिकारी आणि सरकारच्या विरोधात चिथावणीखोर भाषा वापरत या तरुणीने आंदोलकांना भडकावण्याचा प्रयत्न केला. ठिय्या आंदोलनाच्या आयोजकांवरही या तरुणीने टीका करण्यास सुरुवात केली. शंभर तरुणांचे टोळके या तरुणीच्या भडकाऊ भाषणाला प्रतिसाद देत थांबले होते. यामुळे पोलिसही चक्रावून गेले.

 

स्थानिक आंदाेलकांचा तरुणीला प्रतिसाद नाही
पुण्यात अांदाेलन संपल्यानंतरही काही जणांनी ठिय्या सुरूच ठेवला हाेता. वारंवार सांगितल्यानंतरही न ऐकणाऱ्या ८१ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील अनेक तरुण पुण्याबाहेरचे असल्याचे आढळून आले. संबंधित तरुणीदेखील पुण्याची नसून ती आंदोलनाच्या दिवशीच मुंबईतून पुण्यात आल्याचे निष्पन्न झाले.  त्यास स्थानिक मराठा आंदोलकांचा प्रतिसाद मिळाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण अधिक
तिशीच्या आतल्या तरुण विद्यार्थ्यांची संख्या आंदोलनात सर्वाधिक असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. त्यातही स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात राहिलेले तरुण लक्षणीय होते. आंदोलनातील गुन्ह्यांमुळे भावी कारकीर्दीत त्यांना कोणते नुकसान सोसावे लागेल, याची कल्पना दिल्यानंतरही यातील अनेक तरुण धुडगूस घालत राहिले. आयोजकांनाही त्यांनी जुमानले नाही.

 

 

बातम्या आणखी आहेत...