आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचा दुसरा टप्पा साेमवारपासून; पहिली सभा पैठणमध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सांगली, कोल्हापूर, सातारा येथील महापुरामुळे स्थगित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा १९ आॅगस्टपासून पैठण येथून सुरू हाेत आहे. खासदार तथा अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह प्रमुख नेत्यांचा या यात्रेत सहभाग असेल.  ६ आॅगस्ट राेजी सुरुवात झालेली ही यात्रा ९ आॅगस्ट राेजी तात्पुरती स्थगित केली हाेती. आता राष्ट्रवादीने १९ ते २६ ऑगस्टपर्यंतचे यात्रेचे वेळापत्रक पक्षाने जारी केले आहे. मराठवाड्यासह यवतमाळ व नगरच्याही काही भागातून ही यात्रा जाणार आहे.  पैठण येथे १९ ऑगस्टला सकाळी ९ वाजता संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन यात्रेस प्रारंभ होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता जाहीर सभा हाेईल. दुपारी २ वाजता बदनापूर (जि. जालना) येथेही दुसरी सभा होईल. या यात्रेत मराठवाड्यातील सारकणी (किनवट), अंबाजोगाई येथे सभा तर परभणी व बीड येथे युवासंवाद होणार आहे. रेणुकादेवी, औंढा नागनाथ मंदिर, अंबाजोगाई मंदिर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक या तीर्थस्थानांना यात्रा भेट देईल.  पैठण, बदनापूर, भोकरदन, वाशीम, कारंजा, दारव्हा, यवतमाळ, सारकणी, पुसद, हिंगोली, जिंतूर, परभणी, अंबाजोगाई, माजलगाव, घनसावंगी, गेवराई, पाटोदा, बीड, जामखेड व करमाळा या ठिकाणांहून ही यात्रा जाणार आहे. २७ ते ३१ आॅगस्टपर्यंतचा यात्रेचा कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती हाताळण्यात सरकारला यश आले नसल्याच्या मुद्द्यांवर या यात्रेत भर दिला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिली. 

जयंत पाटलांचे पूरपरिस्थितीकडे लक्ष
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व हसन मुश्रीफ यांनी सांगली, कोल्हापूर व सातारा येथील पूरग्रस्तांना मदत करण्यावर भर दिला आहे. त्यामुळे त्यांचा या यात्रेत कमी सहभाग असेल, असेही सूत्रांनी सांगितले.