Home | Maharashtra | Vidarva | Akola | Sedley cattle for drying due to lack of water in the banana crop

पाण्याअभावी सुकलेल्या केळीच्या पिकात चरण्यासाठी साेडली गुरे; अकाेला जिल्ह्यातील चित्र

दिलीप ब्राह्मणे | Update - May 13, 2019, 09:29 AM IST

बाेअर आटल्याने शेतकरी हतबल, पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई

 • Sedley cattle for drying due to lack of water in the banana crop

  अकोला - आधी पावसाअभावी पिके नाहीत. त्यातही जे काही पीक हाती लागले त्याला याेग्य भाव मिळेना. काढणीचा पैसाही निघत नसल्याने पिकांवर नांगर फिरवल्याच्या विदारक घटना राज्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. तेल्हारा तालुकाही त्याला अपवाद नाही. येथील केळी परदेशात निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा दुष्काळामुळे विहिरी, बोअरने तळ गाठले. लाखो रुपये खर्च करून जगवलेली केळीची झाडे आता डोळ्यादेखत सुकत असल्याचे पाहून शेतकरी वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यापैकी एकाने चक्क वाळलेल्या केळीच्या शेतात गुरे सोडून त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था केली.


  अकाेला जिल्ह्यातील हिवरखेडपासून (ता. तेल्हारा) चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्ला गावात गेल्यानंतर तेथील शेतकरी श्रीकृष्ण अशोक कारोडो हे गुरांच्या शोधात दिसून आले. गायी चारणाऱ्याशी ते बोलू लागले. ‘आपल्या शेतातील केळीच्या बनात तुझ्या गायी चरायला घेऊन ये,’ असे ‘निमंत्रण’च ते गावातील पशुपालकांना देत हाेते. ते एेकून धक्काच बसला. याबाबत विचारणा करताच श्रीकृष्णभाऊ यांनी शेतपिकाचे विदारक चित्र दाखवण्यासाठी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधींना थेट आपल्या शेतातच नेले. शेतात पोहोचलो, तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आले. काय बोलावे कळेनासे झाले. तरीही म्हणाले, ‘या केळीला आता पाणी पुरत नाही, बोअरचे पाणी आटले. पिकांसाठी दीड लाख रुपये खर्च झाला. पिके वाळली, या शेतात गुरे सोडू नाही तर काय करू?’ त्यांच्या या प्रश्नावर आम्हीही निरुत्तर झालाे. साैंदाळा येथील प्रमोद हरचंद अरबट यांच्या शेतातही तीच परिस्थिती असल्याचे कळले. बोअर अचानक आटल्याने केळीला पाणी कसे देणार, असे म्हणून त्यांनीही डोक्याला हात लावला. उत्पादनाच्या बाबतीत सिंचनाच्या सोयी-सुविधा असलेल्या अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात दुष्काळाची ही विदारक परिस्थिती आहे.


  पिण्याच्या पाण्याची टंचाई
  अकाेला शहर व जिल्ह्यातील अनेक गावात सध्या पिण्याच्या पाण्याची माेठ्या प्रमाणावर टंचाई जाणवत आहे. जलसाठे आटल्यामुळे व बाेअर- विहिरींनी तळ गाठल्यामुळे अबालवृद्धांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. दुष्काळामुळे जिल्ह्यातील काही कुटुंबांनी राेजगारासाठी स्थलांतरही केले आहे.


  गुरे पिकात घालण्याची ही पहिलीच वेळ
  आजपर्यंत आमच्या बोअरचे पाणी कधी आटले नाही. दोन वर्षांपासून पाऊस नाही, पाण्याची पातळी खोल गेली. चार किलोमीटरवर वानचे धरण आहे. मात्र, त्याचा काहीच फायदा आम्हाला नाही. अडीच एकर केळी पेरून दीड लाख रुपये खर्च झाला आहे.
  श्रीकृष्ण कारोडे, केळी उत्पादक शेतकरी, कार्ला.

Trending