आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रथम व्यक्ती नंतर स्त्री/पुरुष 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाट्यगृहासारख्या सामाजिक जागी इतरांसोबत बसलेले असतांना लैंगिकता वा तत्सम गोष्टीवरील विनोदाला हसणे म्हणजे गुन्हा किंवा शरमेची बाब आहे, असे जर अजूनही मुलींना वाटते आहे तर सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होऊनसुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याच्या बेड्या खोलल्या गेलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते.


मागच्या प्रयोगाला प्रेक्षकांमध्ये असलेल्या मुली हसतच नव्हत्या,’ या लेखक प्रतीक पुरी यांच्या प्रतिसादाने मला अंतर्मुख केलं. पुणे नाट्यसत्ताकमध्ये ‘वाफाळलेले दिवस’ या नाटकाच्या प्रयोगावेळी ‘वाफाळलेले दिवस’ या कादंबरीचे हे लेखक बोलत होते. आणि तिथंच, अशा अनेक प्रयोगांची भारतीय समाजाला किंवा पितृसत्ताक भारतीय समाजाला गरज आहे, याचे महत्त्व अधोरेखित होत होते.


अगदी उत्तर आधुनिक म्हणवणाऱ्या आपल्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत समाजामध्ये लैंगिकता या विषयाची चर्चासत्रे, विचारविनियम, परिसंवाद, कार्यशाळा यात नाहीच, पण अगदी नाट्यगृहासारख्या सामाजिक जागी इतरांसोबत बसलेले असतांना लैंगिकता वा तत्सम गोष्टीवरील विनोदाला हसणे म्हणजे गुन्हा किंवा शरमेची बाब आहे, असे जर अजूनही मुलींना वाटते आहे तर सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा होऊनसुद्धा व्यक्तिस्वातंत्र्याच्या बेड्या खोलल्या गेलेल्या नाहीत, हे स्पष्ट होते.


वयात येणाऱ्या मुलांची गोंधळलेली मानसिकता आणि त्यातून निर्माण झालेले अनुत्तरित प्रश्न या वरवर अगदी साध्या दिसणाऱ्या समस्येने कादंबरीची सुरुवात होते. यावर आधारित अभिवाचनाचा प्रयोग दिग्दर्शक राहुल लामखेडे यांनी मंचावर आणला आहे. एक मिसरुडं फुटायला लागलेला शाळकरी मुलगा स्वतःमधील काही शारीरिक बदलांबद्दल बोलू लागतो आणि त्याच्या बरोबरच्या इतर मुलांनाही तो हे विचारण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या संवादातून आणि प्रसंगातून नाट्यगृह तूफान हास्याने खळाळून जाते. पण शेवटी प्रेक्षकाला एक गंभीर प्रश्न विचारून अंतर्मुख करते.


वयात येणाऱ्या मुलांचा लिंगभाव (sexual orientation) हा विषय सध्या जरी गरजेचा वाटत असला तरी त्याबद्दल होणाऱ्या चर्चा अजूनही दबल्या आवाजात, कुजबुजतच केल्या जातात. त्यातही पुरुष-पुरुष चर्चा असतील तर सहज घेतल्या जातात पण स्त्रीने त्यामध्ये रस दाखवला की, भुवया उंचावल्या जातात. तहान, भूक, मैथुन या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये समान गरजा असल्या तरी मानव जातीमधल्या ‘बाई’ या प्राण्याला स्वतःची ही तिसरी गरज सांगण्याचा/मागण्याचा/दाखविण्याचा/अधोरेखित करण्याचा/नाकारण्याचा / विचारण्याचा अधिकार नाही, असे हा पितृसत्ताक समाज पिढ्यानपिढ्या गृहीत धरत आला आहे. त्यातही जर एखाद्या बाईने यावर स्वतःची मते सांगण्याचा प्रयत्न केला तर तिला चरित्रहीन ठरवून बाजूला टाकले जाते. त्यामुळेच लहानपणापासून मुलींना हा ‘न’ बोलण्याचा किंवा खाजगीत बोलण्याचा विषय आहे हे मनावर बिंबवले जाते.


नाटकातील प्रथमपुरुषी निवेदकाचे पात्र आपल्याला आवडणाऱ्या शिल्पा निंबाळकर या मुलीबद्दल सांगताना विरुद्धलिंगी आकर्षणाबद्दल भाष्य करते, असे इतरही समवयस्क मुलांना होते, हे समजल्यावर ही गोष्ट नैसर्गिक आहे, हे नक्की होते. पण जर हे नैसर्गिक आहे, तरी घरी-दारी, शाळेत, समाजात ही गोष्ट एवढी अवघडलेली का आहे? पालक मुलांसोबत या बाबतीत का बोलू शकत नाहीत? मुले-मुले बोलतात तर मुली-मुली किंवा मुले-मुली का बोलू शकत नाहीत? हे प्रश्न अनुत्तरीत ठेवण्यात धन्यता मानणाऱ्या समाजाला, मग ओंगळवाण्या लैंगिक विकृतींना, अल्पवयीन बलात्कार, कुमारी माता, विवाह अंतर्गत बलात्कार, विवाहबाह्य संबंधांमुळे खिळखिळी झालेली कुटुंबसंस्था, नैराश्य, एकटेपणा, टोकाच्या लैंगिक अपेक्षा आणि फक्त सेक्स हेच साध्य आणि साधक मानणारे, बांधीलकी नको असलेले नातेसंबंध इत्यादी इत्यादी समाजस्वास्थ दूषित करणारे भयानक प्रश्न मग डोळे मिचकावून आणि आवंढा गिळून बघत राहावे लागतात. आजच्या या ढवळलेल्या वातावरणात म्हणूनच ‘वाफाळलेले दिवस’ ही कलाकृती गरजेची वाटते. निवेदन करणारा तो शाळकरी मुलगा आपल्या गोंधळलेल्या आणि उत्सुक मनःस्थितीबद्दल बोलत असतो पण त्याचीच मैत्रीण तिला शाळेत एका व्यक्तीकडून झालेला नकोसा स्पर्श, सांगताना ‘तुला नाही रे समजणार’ असे म्हणून गप्प बसते. खरे पाहता, तिला त्याच्याबद्दल असलेल्या आकर्षणाबद्दल पण बोलता येत नाही आणि नको असलेला स्पर्श किंवा मुलींच्या वाढणाऱ्या उरोजांकडे जाणाऱ्या किळसवाण्या नजरा याबद्दलही बोलता येत नाही.

 
लैंगिकता ही दोघांसाठी एकच आणि सामान्य असतांना त्याचे वर्गीकरण स्त्री चारित्र्य आणि पुरुष लैंगिकता असे दोन वेगवेगळ्या पद्धतीने केल्यामुळे आपली लैंगिकता व्यक्त करण्यामध्ये हा विरोधाभास आपल्या समाजामध्ये दिसून येतो. या विरोधाभासातूनच पुढे पुरुषाला कायम ‘तयार’ तर स्त्रीला कायम ‘सावध’ अशी परिस्थिती निर्माण होते. मग ‘सावध’ राहायचं म्हणजे सतत स्त्री असण्याचं ओझं क्षणोक्षणी मनावर बाळगायचं, प्रत्येक धोकादायक प्रसंगाची स्त्री असण्याशी सांगड घालायची आणि कधीही मोकळेपणी जगायचे नाही. या गुदमरवून टाकणाऱ्या लैंगिक विरोधाभासाच्या चौकटीतून बाहेर येण्यासाठी समाजप्रबोधन आवश्यक आहेच आणि वाफाळलेले दिवस ही कलाकृती हे काम उत्तम करते. आपल्या सादरीकरणातून हा प्रयोग अशा संवेदनशील प्रश्नांना वाचा फोडतो आणि स्त्री किंवा पुरुष असण्याचं भांडवल करण्याची जशी गरज नाही, तसा त्याचा बाऊ करण्याचीही गरज नाही, हे अधोरेखित करतो. आपल्याला स्वतःची ओळख आहे आणि ती केवळ स्त्री वा पुरुष असण्याच्या पलीकडची आहे. म्हणूनच प्रथम व्यक्ती आणि नंतर स्त्री अथवा पुरुष, हे सूत्र ती मांडते.

 

बातम्या आणखी आहेत...