आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही मृत्यू अनुभवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरवर्षी डिसेंबर आला की, अजूनही मला त्या अपघाताची आठवण येते आणि मन सुन्न होते. अक्कलकोट स्वामींच्या दर्शनासाठी माझे नेहमी येणे-जाणे असते. वेळ कशी असते पाहा. माझे आणि माझ्या मैत्रिणीचे अचानक अक्कलकोटला जाण्याचे ठरले. मी ह्यांना फोनवरून कल्पना दिली व आम्ही बसने अक्कलकोटला जाण्यासाठी रंगभवन स्टॉपला थांबलो होतो. बस काही वेळेवर येईना. तेव्हा खासगी जीपचा ड्रायव्हर आमच्याकडे आला आणि म्हणाला, चला, जीप रिकामीच आहे. हो-नाही करता करता आम्ही जीपमध्ये बसलो. पुढच्या सीटवर दोन लेडीज, एक जोडपे आणि त्यांचे मूल होते. जीप वेगाने अक्कलकोटकडे निघाली. कुंभारी गाव ओलांडले, पुढे सूतगिरणी हाकेच्या अंतरावर असतानाच समोरून कर्नाटक डेपोची बस राँग साइडने आली आणि काही कळायच्या आतच आमच्या जीपला समोरून धडक दिली. जोराचा आवाज झाला. पाच मिनिटांनी आम्ही शुद्धीवर आलो.
आम्ही दोघी सुखरूप होतो; पण समोरच्या सीटवरील सगळे ठार झाले होते. ते बिचारे बाळही या अपघातात जखमी झाले होते. दहा मिनिटांपूर्वीच ते आईबरोबर खेळत असताना आम्ही त्याला पाहिले होते. आम्ही कशाबशा जीपमधून बाहेर आलो. सोलापूरकडे जाण्यासाठी वाहन मिळते का याची वाट पाहत उभ्या होतो. लोक हाका मारत होते; पण वळून पाहण्याचे धाडस होईना. एक तवेरा गाडी पंढरपूरकडे निघाली होती. त्याच्यातील मुले आमचा अ‍ॅक्सिडेंट पाहण्यासाठी उतरली होती. त्यांना आम्ही सोलापूरला सोडण्याची विनंती केली. गाडीत बसताच माझ्या हाताला प्रचंड वेदना सुरू झाल्यानंतर माझ्या हाताकडे माझे लक्ष गेले. माझा हातच हलेना. सोलापूरला आल्यानंतर त्या मुलांचे पुन्हा पुन्हा आभार मानत आम्ही दवाखान्यात गेलो. दुस-या दिवशी पेपरमध्ये मृतांचे फोटो, जीपचा चुराडा पाहिल्यानंतर आम्ही किती भयानक अपघातातून वाचलो, याची जाणीव झाली. पुढे माझ्या हातावर शस्त्रक्रिया झाली. या घटनेने अजूनही अंगावर शहारे येतात.