आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Train Accident: सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले; 7 जणांचा मृत्यू, किमान 24 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - बिहारच्या हाजीपूर येथे रविवारी भल्या पहाटे 12487 सीमांचल एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरले. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून किमान 24 जण जखमी झाले आहेत. पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक एलसी त्रिवेदी यांनी सांगितल्याप्रमाणे, ही ट्रेन बिहारच्या जोगबनी येथून दिल्लीच्या आनंद विहार टर्मिनलच्या दिशेने जात होती. ही दुर्घटना पहाटे 3:58 वाजता हाजीपूर-बछवाडा रेलखंडच्या महनार आणि सहदोई बुजुर्ग स्टेशनदरम्यान घडली आहे. प्रवाशांनी आरोप लावला की कटिहारजवळ कपलिंगमध्ये काही बिघाड आला होता. तरीही तो दुरुस्त न करता ट्रेन आपल्या दिशेने रवाना करण्यात आली.

 

रुळावरून घसरलेल्या कोचमध्ये एस-7, एस-8, एस-9, एस-10, एक जनरल कोच आणि एक एसी (बी3) डब्यांचा समावेश आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांनी बचाव मोहिमेत हातभार लावला. रेल्वे अॅक्सिडेंट व्हॅन आणि डॉक्टरांच्या टीमने किरकोळ जखमींवर प्रथमोपचार केला तसेच गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पीडितांना शक्य ती सर्वच प्रकारची मदत करणार असे आश्वस्त केले. रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5-5 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी एक लाख आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सोबतच, जखमी झालेल्या सर्वांचाच खर्च रेल्वे विभाग उचलणार आहे.

 

काचा फोडून, ग्रिल कापून लोकांना काढले बाहेर
बचाव मोहिम राबवणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुळावरून डबे घसरण्यापूर्वी ते इंजिनपासून वेगळे झाले होते. एकूणच 11 डबे घसरले. तर त्यापैकी 3 डबे उलटले होते. त्यातील एका एसी कोचमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी काचेच्या खिडक्या तोडाव्या लागल्या. तसेच एनडीआरएफच्या सदस्यांनी डब्यांवर चढून तसेच त्यांना उचलून बाहेर काढले आहे. तर सामान्य डब्यांचे दार उघडत नसल्याने खिडक्यांचे ग्रिल कापून लोकांना बाहेर काढण्यात आले.


रेल्वे मंत्र्यांनी दिले चौकशीचे आश्वासन
रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. रेल्वे अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून इतके डबे रुळावरून कसे घसरले आणि नेमका हा अपघात कसा झाला या कारणांचा शोध घेतला जात आहे. एवढेच नव्हे, तर अपघात घडला त्यावेळी रेल्वेचा वेग जास्त नव्हता. तरीही ही दुर्घटना कशी घडली असा प्रश्न गोयल यांनी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...