आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्ण-डॉक्टरांचा जिव्हाळा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर खूप चांगले अनुभव येतात. त्यांचे पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक जेव्हा त्यांना भेटतात, त्यांची आठवण किंवा ओळख आवर्जून ठेवतात तेव्हा स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र डॉक्टरांना खूप समाधान आणि आनंद मिळतो. तो शब्दांत वर्णन करणेही अशक्य आहे. गरोदर महिलेची तपासणी पूर्ण 9 महिने करावी लागते. त्यानंतर बाळाचा जन्म म्हणजे डॉक्टरांचा संबंध दोन जिवांशी येतो. एकदा सहजीवन कॉलनीत एका छोट्या मॉलमध्ये सामान घेत होतो. तेव्हा एक गृहस्थ, जे मौलाना आझाद कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, ‘आप डॉ. पांगरेकर? परभणी सिव्हिल हॉस्पिटल में मेडिकल ऑफिसर थे ना.’ त्यांनी सांगितले, ‘माझ्या पत्नीचे सिझेरियन ऑपरेशन तुम्हीच केले. तेव्हा मला मुलगी झाली. तीच मुलगी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेडिकलला आहे.

ती आता डॉक्टर होणार आहे.’ जवळपास त्या पेशंटचे पती मला 20 ते 22 वर्षांनंतर भेटत होते. त्या गृहस्थाने मला ओळखले. अदबीने माझ्याशी येऊन ते बोलले. तो आनंद अवर्णनीय होता. आणखी एक पेशंट माझ्या मित्राचा मुलगाच होता. तो म्हणाला, ‘पांगरेकर काका, तुम्ही घाटीत सीएमओ असताना माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला जखम झाली होती. तिला तुम्हीच तर टाके घातले होते.’ मी पाहिले, ती करंगळी वाकडी झालेली होती, पण त्याचे त्याला वाईट वाटत नव्हते. असे अनेक पेशंट किंवा त्यांचे आई-वडील आम्हाला भेटताच आदराने थांबून बोलतात.