आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि माझा ‘पोपट’ झाला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण नेहमी अनोळखी माणसाची मदत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही वेळा आपल्याच तोंडात मारून घ्यायची वेळ येते. असाच अनुभव एकदा मला बसने जाताना आला. मी उमरग्याहून सोलापूरला जाण्यासाठी बसमध्ये चढलो. गाडीला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे जागा काय भेटली नाही म्हणून उभा राहिलो. इतक्यात माझ्या बाजूला थांबलेल्या एका जाडजूड माणसाचा चुकून एका महिलेला धक्का लागला. त्यामुळे ती जाम संतापली. त्या माणसाला शिव्या देऊ लागली आणि तोही बिचारा गप्प गुमान ऐकू लागला. इतक्यात माझ्यातील ‘बंधुप्रेम’ जागे झाले. मी त्या महिलेसोबत त्या प्रवाशांची बाजू घेऊन भांडू लागलो. तेव्हा ती महिला म्हणाली, ‘हा तुझा कोण लागतो?’ तेव्हा मी म्हणालो, ‘हा माझा भाऊ आहे.’ तेवढ्यात तो माणूस म्हणाला, ‘तू कुठला माझा भाऊ?’ मग बसमधील सर्व प्रवासी माझ्याकडे बघून हसू लागले. इतक्यात ती महिला मला म्हणाली,‘बाळा, पहिल्यांदा भावाला विचारत जा की, तू खरंच माझा भाऊ आहेस का!’ बसमधल्या त्या प्रवाशांचा खरं तर मला रागच आला. मी त्याच्या मदतीला गेलो तर तोच माझ्यावर उलटला. दुस-यांच्या भांडणात पडू नये असे म्हणतात. असाच अनुभव माझ्या मित्रालाही आला. त्याची एका पानटपरीवाल्याशी घनिष्ठ मैत्री होती. तिथे पानटपरीवाल्याचा शाळेतला मित्र आला. नमस्कार - चमत्कार झाल्यानंतर खूप दिवसांनी भेटलास...वगैरे गप्पागोष्टी सुरू झाल्या. मात्र बोलता-बोलता कोणत्या तरी कारणावरून त्यांचा वाद सुरू झाला. एका घटनेबाबत बोलताना त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. वाद वाढला. माझा मित्र त्या घटनेचा साक्षीदार होता. त्याने पानटपरीवाल्यांची बाजू घेतली. तेव्हा भांडणा-या व्यक्तीने माझ्या मित्राला वादात न पडण्याचा सल्ला दिला. पुढे काही दिवसांनी पाहिले तर दोघेही गळ्यात गळे घालून हिंडत होते. माझ्या मित्राने उगाच त्या मित्रांशी दुश्मनी घेतली.