आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे, पालमचे उपनगराध्यक्ष रोकडे यांची भाजपने केली हकालपट्टी, सीएएच्या विरोधात घेतलेला ठराव भोवला

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे पदाधिकारी असूनही दोघांनी आपआपल्या पालिकांमधून सीएएच्या विरोधातील ठराव घेतला

परभणी- सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे व पालम नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे यांची भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी(दि.3) पक्षातून हकालपट्टी केली. भाजपचे पदाधिकारी असतांनाही या दोघांनी आपआपल्या पालिकांमधून सीएएच्या विरोधातील ठराव घेण्याचा प्रकार म्हणजे पक्ष विरोधी कारवाई असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.


केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणलेला असताना भाजपची सत्ता असलेल्या या दोन्ही पालिकांतील पक्षाच्या पदाधिका-यांनी अशा प्रकारचा ठराव सर्वसाधारण सभेत मंजूर केल्याच्या प्रकाराची दखल भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने घेतली आहे. विरोधातील प्रस्ताव पारीत करून त्यांनी पक्ष विरोधी कृत्य केले आहे. पक्षाचे अनुशासन भंग करणारी ही कृती असून त्याची पक्षाने गंभीर दखल घेत पक्षातून निष्कासित करण्यात येत असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दोघांनाही बजावलेल्या पत्रात म्हटले आहे.


सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी महाजनादेश यात्रे दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. नगरविकास आघाडीच्या माध्यमातून बोराडे यांनी सेलू पालिकेवर सत्ता स्थापन केलेली आहे. माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर यांचे ते समर्थक म्हणून ओळखले जातात.


तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्या पुढाकाराने बोराडे भाजपमध्ये दाखल झाल्याने साहजिकच बहुमत असलेल्या सेलू नगरपालिकेवर भाजपची सत्ता आली होती. सत्ता असतानाही नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष बोराडे यांनी सीएएच्या विरोधातील ठराव पारित केला. त्याबाबतचे पत्र ही सेलूत सुरू असलेल्या सीएए विरोधी आंदोलकांना दिले. 

रोकडे जुनेच पदाधिकारी

भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे सदस्य गणेशराव रोकडे यांचे चिरंजीव असलेले बाळासाहेब रोकडे हे पालम नगरपंचायतीचे उपाध्यक्ष आहेत. गेल्या अनेक वर्षापासून वडिलांसोबतच भाजपमध्ये सक्रीय आहेत. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद व पालम नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदही त्यांनी भूषविलेले आहे. अशाही स्थितीत त्यांनी नगरपंचायतीमध्ये सीएएला विरोध करणारा ठराव पारित केल्याने भाजपच्या या पदाधिका-यां बद्दल आश्‍चर्य व्यक्त होत आहे. त्याचीच दखल पक्षीय नेतृत्वाने घेत रोकडे यांनाही पक्षातून निष्कासित केले.