जनक्षोभातून इंदिरा गांधींना / जनक्षोभातून इंदिरा गांधींना धडा; आणीबाणीविरोधात लोकांनी खरी ताकद दाखवली, शिवसेनेवरही जनतेचा रोष

निखिल वागळे

Jan 28,2019 09:22:00 AM IST

निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव, मतदार हाच खरा राजा असे नेहमी म्हणतो. परंतु १९७७ ची लोकसभा निवडणूक ही खऱ्या अर्थाने लोकांची होती असे मला वाटते. मी १९७१ पासून लोकसभा निवडणूक प्रत्यक्ष बघत आहे. मात्र, १९७७ च्या निवडणुकीत देशातील लोकांनी त्यांची जी काही ताकद दाखवून दिली होती ती ‘न भूतो न भविष्यति’ होती.

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ पासून देशात आणीबाणी लागू केली होती. संपूर्ण देशात हुकूमशाही होती. लोकांवर प्रचंड दबाव होता. माध्यमांवर सेन्सॉरशिप होती. विरोधकांना तुरुंगात डांबले. उत्तर भारतात राजकीय कैद्यांवर अत्याचार सुरू होते. त्या वेळी दैनिके आणि दूरदर्शन हीच माध्यमे, मात्र त्यांच्यावरच सेन्सॉरशिपची कात्री होती, खऱ्या बातम्या कुणालाही कळत नव्हत्या. सर्वत्र अफवांचेच पेव फुटले होते. तब्बल १९ महिने लोकांची मुस्कटदाबी झाली होती आणि अचानक जानेवारी १९७७ मध्ये इंदिरा गांधींनी निवडणुकीची घोषणा केली. लोकांसाठी तो अनपेक्षित धक्काच होता. इंदिरा गांधींनी ती निवडणूक का जाहीर केली याबाबतचे अनेक प्रवाद सांगितले जातात. गुप्तचर यंत्रणांपासून आंतरराष्ट्रीय दबावापर्यंत शक्यता मांडल्या जातात. विशेष म्हणजे विरोधी पक्षातील बहुतांश नेते तुरुंगात होते, विरोधी पक्षांकडे पैसे नव्हते. कोणी एक ताकदवान विरोधी पक्ष नव्हता. कार्यकर्त्यांची भक्कम फळी नव्हती. तरीही फक्त लोकांच्या ताकदीवर आणि दोन महिन्यांत पंतप्रधानाला पराभूत करणारी ती एकमेव निवडणूक ठरली.

निवडणूक जाहीर होताच लोकांच्या दबलेल्या भावनांचा स्फोट झाला. जानेवारीत घोषणा झाली आणि मार्चमध्ये मतदान होते. विरोधकांच्या हाती फक्त दोन महिने होते. त्यातही बहुसंख्य विरोधी नेते तुरुंगात होते. ते तुरुंगातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. एरवी पक्षाचे कार्यकर्ते प्रचारात उतरतात. सध्या तर कार्यकर्त्यांनाही मोबदल्यावर आणावे लागते. पण त्या निवडणुकीत लोकच कार्यकर्ते बनले. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक होती. जनसंघापासून कम्युनिस्ट पक्षापर्यंत सर्व विरोधी पक्ष, सर्व नेते एकत्र आले होते. सरकारच्या दडपशाहीविरोधात लोकांनी निवडणूक हातात घेतली होती. ती निवडणूक म्हणजे लोकांना मिळालेली संधी होती. भारतातील लोकशाहीचा खरा आविष्कार होता. तोपर्यंत पंतप्रधानांचा पराभव कधीच झाला नव्हता. परंतु लोकांनी हातात घेतलेली ही निवडणूक यास अपवाद ठरली.

१९७७ च्या काळात शिवसेना मुंबईकरांच्या गळ्यातील ताईत बनत होती. परंतु शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीस पाठिंबा दिला होता आणि तुरुंगातून निवडणूक लढवणाऱ्या मृणाल गोरेंवर एक आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. त्यामुळे लोक शिवसेनेवरही नाराज झाले होते. लोकांनी जयप्रकाश नारायणांकडे त्या निवडणुकीचे नेतृत्व सोपवले होते. शिवाजी पार्कवर जेपींची सभा झाली. संपूर्ण मैदान गर्दीनं भरून गेलं होतं. मैदानाकडे येणारे रस्ते लोकांनी ओसंडून वाहत होते. सभा संपल्यावर परतणाऱ्या लोकांवर सेना भवनातून कुणीतरी दगडफेक केली. त्यात एक गरोदर महिला जखमी झाली. संतापलेल्या लोकांनी सेना भवनावर दगड मारले होते. जनता पक्षाचे वामनराव परब थेट सेना भवनावर चढले. त्यांनी तिथे फडकणारा भगवा खाली उतरवला आणि जनता पक्षाचा झेंडा त्याजागी फडकवला होता.

निवडणुकीचे दोन महिने पूर्ण वातावरण भारावलेले होते. मोठ्या संख्येने तरुण सरकार विरोधातील प्रचारात सामील झाले होते. पोस्टर्स लावत होते, रस्त्यावर उतरत होते. पु. लं. देशपांडेंसारखे लोकप्रिय साहित्यिकही सरकारविरोधात प्रचारसभा घेत होते. तत्कालीन कायदामंत्री ह. रा. गोखले यांच्यावर कोट्या करीत. जनता पक्षासाठी होणाऱ्या पु. लं. च्या भाषणांना तुफान प्रतिसाद मिळत होता. पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या सभा गाजत होत्या. संयमी समजल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्याचीही तेव्हा जीभ घसरली. त्यांनी पु. लं. ची ‘विदूषक’ म्हणून निर्भर्त्सना केली. त्याचीही तीव्र प्रतिक्रिया जनमानसातून उमटली होती. मार्चमध्ये निवडणूक झाली आणि दोन महिन्यांच्या काळात देशातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने मुजोर सत्ताधीशांना सिंहासनावरून खाली खेचले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशातील लोकांनी दाखवलेली ती लोकशाहीची ताकद ऐतिहासिक ठरली.

‘दिल्लीवाली बाई पानी मे और पानीवाली बाई दिल्ली मे..’
१९७७ मध्ये जॉर्ज फर्नांडीस व मृणाल गोरे यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. फर्नांडिस मुजफ्फरनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. त्यांना बेड्या घालून कोर्टात आणलं होतं. त्यांचा तो फोटो निर्णायक ठरला. त्या फोटोचेच कटआऊट करून लोकांनी त्यांच्या बाजुने प्रचार केला आणि प्रचाराच्या एका दिवसासाठीही तुरुंगाबाहेर न येऊ शकलेल्या फर्नांडिसांना लोकांनी विजयी केले. असाच अनुभव मृणालताईंच्या बाबतीत आला. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून विधानसभेपर्यंत मृणाल गोरेंनी यशस्वी लढत दिली होती. लोकांच्या पाण्याचा प्रश्न लावून धरला होता, सोडवला होता. म्हणून त्यांना ‘पाणीवाली बाई’ म्हणून ओळखले जात होते. त्या देखील तुरुंगातून ती लोकसभा निवडणूक लढवत होत्या. त्यांच्या विरोधात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी गोरेगाव मतदारसंघात थेट पंतप्रधानांनी सभा घेतली होती. पण मृणालताईंना लोकांचा पाठिंब होता. लोक त्यांच्या प्रचारासाठी घोषणा देत-
‘दिल्लीवाली बाई पानी मे और पानीवाली बाई दिल्ली मे..’

शब्दांकन : दीप्ती राऊत

X
COMMENT