आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाण्यांमध्ये \'देव\'पण​ आणणारा संगीतकार हरपला, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे वयाच्या 91व्या वर्षी दीर्घ आजाराने मुंबई येथील शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती. त्यांना न्यूमोनिया झाल्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची मध्यरात्री 1:35 वाजता प्राणज्योत मालवली.

 

मराठी भावगीतांना समृद्ध करणारे व्यक्तिमत्व हरपले - मुख्यमंत्री

ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांच्या निधनाने शब्दांसोबतच सुरांवर प्रभूत्व असलेला आणि मराठी भावगीतांचे विश्व समृध्द करणारा एक अस्सल कलावंत हरपला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

 

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात,  अनेक भावगीतांसह श्री. देव यांनी नाटकांना दिलेले संगीतही कायम स्मरणात राहील. एक अष्टपैलू संगीतकार म्हणून यश मिळवण्यासोबतच त्यांनी लिहिलेली अनेक गीतेही लोकांच्या ओठावर  सहज येतात. नव्या पिढीच्या आवडींशी नाळ जोडतानाच संगीताचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची अविरत धडपड होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला आहे.

 

‘यशवंत’ संगीतकार
यशवंत देवांचे घराणे संगीताने समृद्ध होते. वडील संगीतप्रेमी व जाणकार. तबला, पेटी, सतार, व्हायोलिन, जलतरंग अशी अनेक वाद्ये ते वाजवीत. हिराबाई बडोदेकर, मा. दीनानाथ, रामकृष्णबुवा वझे अशा नामवंतांची गाणी त्यांच्या घरी होत. घरात कीर्तन होत असल्याने विविध प्रकारचे संगीत सतत कानावर पडे. वेगवेगळी स्तोत्रे, वैदिक ऋचा यांच्या पाठांतरामुळे ताल-स्वरासंबंधी मूलभूत दृष्टी मिळाली. पेणमधील बालपणाची 10 वर्षे हा त्यांच्या जडणघडणीचा काळ. पुढे तळेगाव, पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी त्यांचे शिक्षणासाठी वास्तव्य झाले. नाट्यसंगीताच्या संस्कारांबरोबरच भावगीतांशी नाते जुळले. जी. एन. जोशी, गजानन वाटवे, रानडे यांच्या मैत्रीतून भावगीतातील गोडवा अनुभवला. संवादिनी व बासरी या वाद्यांवर त्यांचा हात बसू लागला होता. जयसिंग भोई या बासरीवादकामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 


आकाशवाणीवरील ‘गंमत-जंमत’ हा बालगोपाळांसाठी असलेला कार्यक्रम बघण्यासाठी ते गेले होते. तीन मिनिटे सतार वाजवण्याची प्रथम संधी त्यांना तिथेच मिळाली. सतार येत नसताना वडिलांच्या मार्गदर्शनाने फक्त आठ दिवसांत त्यांनी एक धून बसवली आणि ती वाजवली. तो त्यांच्या आयुष्यातला पहिला कार्यक्रम. नभोनाट्यांना पार्श्वसंगीत देणे, संगीतिकांना संगीत देणे अशी अनेक आव्हाने घ्यायची सुरुवात येथून झाली. स्वत:कडे चिकित्सकपणे पाहण्याचा पिंड असल्याने निरीक्षण आणि प्रयत्नातून सतार शिकले. प्रसिद्ध सरोदवादक रत्नाकर व्यास यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. ‘एचएमव्ही’मध्ये दीडएक वर्ष संगीत नियोजक म्हणून त्यांनी नोकरी केली. याच काळात चित्रपटांच्या संगीत दिग्दर्शनाची संधी मिळाली. 

बातम्या आणखी आहेत...