आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी कालवश, वयाच्या 79व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- मराठवाड्यातील ज्येष्ठ संगीतज्ञ पंडित शांताराम चिगरी (७९) यांचे सोमवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. गुरुजी या नावाने संगीतक्षेत्रात प्रसिद्ध असलेले शांताराम चिगरी यांचे मराठवाड्यासह राज्यभरात शिष्य आहेत. चिगरी गुरुजी यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सोमवारी दुपारी त्यांच्या अनेक शिष्यांच्या उपस्थितीत लातूर तालुक्यातल्या अंकोली शिवारातील त्यांच्या शेतात गुरुजींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


पंडित शांताराम चिगरी यांचा जन्म १५ एप्रिल १९३९ रोजी खैनूर (जि. विजापूर, कर्नाटक) येथे झाला. देवीच्या आजारामुळे वयाच्या सहाव्या वर्षी अंधत्व आल्यामुळे त्यांना दादरच्या अंध शाळेत पाठवण्यात आले. त्यांच्या संगीतातील आवडीमुळे ते संगीत क्षेत्राकडे वळले. त्यांनी पं. ओंकारनाथ ठाकूर, पं. नारायणराव व्यास, पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. उस्ताद अहमदजान थिरकवा यांच्याकडून फरुखाबाद घराण्याचे, पंडित बद्रिप्रसाद मिश्र यांच्याकडून बनारस घराण्याचे तर खलिफा नथ्थू खाँ यांच्याकडून दिल्ली घराण्यातील तबला वादनाची तालीम पूर्ण केली. १९७१ मध्ये चिगरी गुरुजी लातूरला आले आणि कायमचे इथेच रमले. त्यांनी १९७३ साली लातुरात सूरताल संगीत विद्यालयाची स्थापना केली. 


विविध पुरस्कारांनी गौरव 
चिगरी गुरुजींच्या सांगीतिक कार्याची दखल घेत कर्नाटक सरकारने त्यांना २००८ मध्ये कलाश्री पुरस्कार देऊन गौरवले होते. महाराष्ट्र शासनाने नुकताच त्यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार दिला. अ. भा. गांधर्व मंडळाने नुकतेच त्यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरवले होते. गुरुजींनी काही महिन्यांपूर्वीच अ. भ. गांधर्व मंडळासाठी त्यांनी ६२६४ चौरस मीटरचा लातूरमधील भूखंड दान दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...