आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरिष्ठांचा ग्रामीण दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्वदच्या दशकातील शेवटची काही वर्षे भारतीय स्टेट बँकेच्या वडीगोद्री शाखेत कार्यरत होतो. स्टेट बँकेसारख्या महाकाय संस्थेत काम करत असताना अधिकारी वर्गास ग्रामीण भागात काम करावे लागते. अशा शाखेत शेतीव्यवसायाला पूरक अशा व्यवसायाला कर्ज दिले जाते. उद्योग किंवा व्यवसायासाठी कर्ज मागणा-यांची संख्या कमीच असते. बँकेच्या प्रत्येक शाखेला सर्वसाधारणपणे दर दीड-दोन वर्षांत अंतर्गत ऑडिट आणि निरीक्षणाला सामोरे जावे लागते. बँकेचे अन्य राज्यातील वरिष्ठ अधिकारी अशा तपासणीसाठी येतात. त्यावर्षी ओ. पी. गेरा नावाचे इन्स्पेक्टर तेथे आले होते. एका सहका-याचे वास्तव्य आपल्या प्रांतात आरामदायी कसे होईल हे पाहणे व्यवस्थापकास एक आव्हान असते. त्यामुळे त्यांची निवास व जेवणाची सोय लावण्यात ऑडिटला सामोरे जाण्यापेक्षाही जास्त कसब पणाला लागत असते. गेरा अत्यंत मितभाषी होते आणि बोलले तर जरा खेकसूनच बोलत.

अर्थात ऑडिटरने थोडे मवाळ भाषेत बोलल्यास तपासणीमध्ये तेवढी मजा येत नाही म्हणा. तपासणीचाच भाग म्हणून गेरांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलेल्या शेतक-यांच्या फळबागा, ट्रॅक्टर वगैरेच्या पडताळणीसाठी थेट खेडोपाडी जायचे आहे, असे फर्मान सोडले. सकाळीच बँकेचे चालक हजर झाले. जीपमधून ब-याच ठिकाणी पाहणी होत असताना शेवटच्या टप्प्यातील एका शेताकडे जाण्यासाठी मुख्य रस्ता सोडून जीपने बैलगाडीच्या चाकोरीचा मार्ग धरला. दोन शेतांमध्ये टेकडीवजा बांधावरून चालकांनी जीप लीलया चढवली, परंतु त्या वेळी गेरांच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण गाडी कलंडली होती. जीपच्या चालकाला व क्षेत्राधिका-याला असे अपघात नित्याची बाब होती. राजधानी दिल्लीहून आलेले अधिकारी हवालदिल झाले. आता पुरे म्हणून सांगत, जीप परत शाखेकडे नेण्याचे सांगून त्यांनी परतीचा मार्ग धरला. मला त्या अधिका-यांची मर्जी सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली.