आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूळ 52 टक्क्यांना धक्का न लावता मराठा समाजाला वेगळे आरक्षण - देवेंद्र फडणवीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विविध प्रवर्गांसाठी सध्या असलेल्या ५२ टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. विधीमंडळाच्या अधिवेशनात तिसऱ्या दिवशीही मराठा व धनगर आरक्षणाच्या मुद्दा तापलेला राहिला. मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल, धनगर आरक्षणाबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल पटलावर मांडल्याशिवाय कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका घेत विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज रोखून धरले.

 

दरम्यान, दुष्काळाबाबतही विरोधकांनी ‘चर्चा नको, थेट मदत जाहीर करा’ अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली. गोंधळ वाढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांनी मराठा आरक्षण दिले जात असताना मूळ ५२ टक्के आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे स्पष्ट केले. धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये मिळावे ही मागणी आहे. ही प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने पूर्ण करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

 

मुख्यमंत्री म्हणाले... आयोगाच्या सर्व शिफारशी स्विकारल्या

- मराठा आरक्षणासाठी भविष्यात सरकारला कदाचित न्यायालयात लढावे लागेल हे गृहित धरूनच या कायद्याची मजबूत रचना केली आहे. आरक्षण विधेयक याच अधिवेशनात मांडण्यात  येईल. 
- मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल. सर्व शिफारशी स्वीकारण्यात आल्या आहेत.
- आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याबाबत संसदेने कायदा करावा, हा मुद्दा योग्य. संसदही एकमताने कायदा करेल. मात्र, त्याला कालावधी लागेल. तोवर मराठा आरक्षण थांबवता येणार नाही.

 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील....
मराठा आरक्षणाचा अहवाल आणि सरकारी कार्यावाहीबाबतची माहिती मांडा. आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्यांच्या वारसांना दहा लाखांची मदत केव्हा देणार? कामकाज बाजूला ठेवून मुंबईत मोर्चा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करा.

 

छगन भुजबळ
राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या, अहवाल नाही, असे वर्तमानपत्रात आले आहे. अहवाल का स्विकारला नाही? आरक्षणाचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी केंद्राला सांगून संसदेत कायदा करून बदल करून घ्यावा.

 

अजित पवार
सरकारच्या मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्ये येत असल्याने मराठा समाजात संभ्रमावस्था आहे. मुख्यमंत्री म्हणतात जल्लोष करा, पण जल्लोष कशासाठी करायचा ते तरी अगोदर कळू द्या. धनगर आरक्षणाचे काय झाले?

 

विरोधी पक्षाची पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधी आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षण व दुष्काळी मदतीवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मराठा आरक्षण अहवाल पटलावर ठेवा आणि दुष्काळी मदत जाहीर करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी, काँग्रेससह इतर आमदारांनी घोषणाबाजी केली.

 

आमदार प्रकाश गजभिये छत्रपती शिवरायांच्या वेषात
मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वेष परिधान करून सरकारकडे आरक्षणाची मागणी करत आंदोलन केले. यापूर्वी त्यांनी संभाजी भिडे यांचा वेष परिधान करून लक्ष वेधले होते.

बातम्या आणखी आहेत...