आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद-‘ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचे रहस्य वेदांमध्ये विशद करण्यात आले आहे, तर दुसरीकडे सध्या जगभरात आधुनिक विज्ञानावर आधारित दिशाहीन विकास केला जात आहे. परंतु वेदावर आधारित विज्ञानाची कास धरली तरच लौकिक आणि पारलौकिक उत्कर्ष हाेऊ शकेल. वेदसंमत विज्ञान स्वीकारले नाही तर विनाश अटळ आहे,’ असे परखड मत गोवर्धनपीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘दिव्य मराठी’ लिटरेचर फेस्टिव्हलच्या तिसऱ्या पर्वास शुक्रवारी अाैरंगाबादेतील सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतील पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ साहित्यनगरीत थाटात प्रारंभ झाला. या वेळी उदघाटनाच्या सत्रात स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी ‘वेद आणि विज्ञान’ या विषयावर व्याख्यान दिले. शंकराचार्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी पु.ल. देशपांडे सभागृहात प्रचंड गर्दी झाली होती. ‘वेद आणि विज्ञान’ या दोन्ही टोकांच्या मानल्या जाणाऱ्या विषयावर शंकराचार्य काय बोलणार याबद्दल उपस्थितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. ब्रह्मवृदांच्या वेदमंत्रोच्चाराच्या घोषाने वातावरण भारावले होते. त्यानंतर धीरगंभीर अावाजात शंकराचार्यांचे व्याख्यान सुरू झाले. त्यांनी वैदिक सनातन विज्ञान आणि कलियुगातील आधुनिक विज्ञान यांची सांगड घालणे कसे शक्य आहे याची तर्कशुद्ध मांडणी केली.
मोबाइल, संगणक, अणुबॉम्बच्या रचनेचा आधारही वेदच
स्वामीजी म्हणाले, ‘वेद म्हणजेच विज्ञान आणि विज्ञान म्हणजेच वेद आहे. ओंकाराच्या ध्वनीतून वेदांची महिमा प्रतीत होते. मोबाइल, संगणक,अणुबॉम्बच्या रचनेचा आधारही वेद आहे. वेद हा सर्वात प्राचीन ग्रंथ असल्याचे संपूर्ण विश्व मान्य करते. आधुनिक विज्ञानामुळे मनुष्याच्या बुद्धीवर तमोगुणाचा प्रभाव वाढत आहे. परिणामी विपरीत ज्ञान-विज्ञानाच्या आधारे आपण पुढे जात आहोत. आजच्या दिशाहीन विकासामुळे पृथ्वी संतप्त आहे. जल, वायू, आकाश, प्रकाश हेसुद्धा दूषित, उत्पीडित आहेत. त्यामुळेच वैज्ञानिकांनाही वैदिक शिक्षणाची गरज आहे.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.