Home | Maharashtra | Vidarva | Akola | seven lakhs withdrawn by hacking credit card number

क्रेडिट कार्ड नंबर हॅक करून परस्पर काढले सात लाख; चौघांविरुद्ध गुन्हे नोंद

प्रतिनिधी | Update - Sep 05, 2018, 12:14 PM IST

अमेरिकन एक्स्प्रेस को. ऑपरेटिव्ह शाखा प्रभादेवी मुंबईच्या काही खातेदारांची माहिती शहरातील चौघांनी चोरली.

 • seven lakhs withdrawn by hacking credit card number

  अकोला- अमेरिकन एक्स्प्रेस को. ऑपरेटिव्ह शाखा प्रभादेवी मुंबईच्या काही खातेदारांची माहिती शहरातील चौघांनी चोरली. त्यांनी संबंधित खातेदारांच्या क्रेडिट कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाइल नंबरमध्ये बदल केला. त्यानंतर अकोल्यात पेटीएमद्वारे ७ लाख ६६ हजार ४७४ रुपयांची परस्पर खरेदी केल्याची धक्कादायक बाब बँकेच्या सायबर शाखेच्या तपासामध्ये उघड झाली आहे. दरम्यान या प्रकरणी चार ठकसेनांविरुद्ध येथील डाबकी रोड पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये मंगळवारी ४ सप्टेंबरला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.


  या संदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जून २०१८ ते ३ जुलै २०१८ या कालावधीत या बँकेतील काही खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारी बँकेकडे येत होत्या. दरम्यान या संदर्भात बँकेच्या कित्येक खातेदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बँकेच्या सायबर तज्ज्ञांनी तपास केला असता बँकेच्या काही खातेदारांच्या पश्चात त्यांचे मोबाइल नंबर बदलण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. त्यानंतर तज्ज्ञांनी बदलण्यात आलेल्या मोबाइल नंबरचा डाटा मिळवला असता अकोला येथील प्रतीक सुभाषराव कराळे(रा. कोर्ट कॉलनी, आश्रयनगर डाबकी रोड), विक्की गव्हाळे(रा. रेणुकानगर डाबकी रोड), अर्पित यादव (रा. गजानन मंदिर जवळ कॅनॉल रोड, पार्वतीनगर) व तुळशीदास मारोती साबळे (रा. सरस्वती नगर डाबकी रोड) या चौघांची नावे समोर आली. या चौघांनी खातेदारांचे मुळ नंबर बदलून त्यांचे मोबाइल नंबर रजिस्टर करून घेतले होते. त्यानंतर त्यांनी पेटीएमच्या माध्यमातून पेंमेट करून लॅपटॉप, मोबाइल, मोटार सायकली खरेदी केल्या, अशी तक्रार अमेरिकन एक्स्प्रेस बँकेचे प्रभादेवी मुंबई शाखेचे सिक्युरिटी अधिकारी मिलिंद रामचंद्र चव्हाण यांनी डाबकी रोड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भादंवि ३७९, ४२०, ३४ सहकलम ४३, ६६ ब,क,ड,ई, माहिती व तंत्रज्ञान कायदा नुसार गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.


  अशी झाली बँकेच्या खातेदारांची फसवणूक
  > इक्बालसिंग सौन्ध रा. दिल्ली यांचा क्रेडिट कार्डचा मोबाइल बदलून अर्पित यादव याच्या नावाने मोबाइल व इतर वस्तूंची खरेदी (दोन लाख १९ हजार ६९७ रुपयांची) सौन्ध यांच्या खात्यातून २४ जून रोजी केली.
  > गौतम खन्ना अप्पासाहेब सोसायटी मराठे मार्ग प्रभादेवी मुंबई यांच्या खात्याला रजिस्टर असलेला मोबाइल नंबर बदलून प्रतीक सुभाषराव काळे याने २७ जून रोजी एक लाख १९ हजार ४३८ रुपये पेटीएमद्वारे ऑनलाइन यामाहा कंपनीची मोटारसायकल रतनलाल प्लॉटमधून खरेदी केली.
  > निलंजना मुखोपाध्याय रा. बंगळुरू यांचा मोबाइल क्रमांक जो क्रेडिट कार्ड खात्याला रजिस्टर केलेला आहे. तो मोबाइल क्रमांक बदलून त्याऐवजी दुसरे नंबर रजिस्टर केले व पेटीएमद्वारे मोबाइल व लॅपटॉप हे तुळशीदास मारोती साबळे याच्या नावे दोन लाख दोन हजार ८३८ रुपयांची २७ जून रोजी खरेदी केले.
  > अंशुमन बापना रा. बंगळुरू यांच्या खात्याला रजिस्टर असलेला नंबरसुद्धा बदलण्यात आला. त्यांच्या खात्यातून दोन लाख २४ हजार ५०१ रुपये पेटीएमद्वारे मे. राज मोटर्स अर्बन डिव्हिजन अमरावती यांच्या खात्यात वर्ग करण्यात येऊन तेथून मोटार सायकल खरेदी केली.


  आरोपींनी अकोल्यात केली खरेदी
  आरोपींनी आधी खातेदारांचे क्रेडिट कार्ड नंबर हॅक केला. त्यानंतर ऑनलाइन मोबाइल नंबर बदलवला व आलेल्या ओटीपी(वन टाइम पासवर्ड)च्या माध्यमातून पेटीमद्वारे खातेदारांच्या क्रेडिट कार्डमधून अकोला शहरात व अमरावती शहरात वस्तूंची खरेदी केली.


  खातेदारांनी सतर्कता बाळगावी
  अनेकदा खातेदारांचे अनेक बँकांमध्ये खाते असल्यामुळे ते या खात्यांविषयी माहितीच घेत नाही, असे खाते हॅकरच्या रडारवर असतात. त्याचप्रमाणे शनिवारी, रविवारी किंवा सुटीच्या आदल्या दिवशी कोणीतरी फोन करतो आणि क्रेडिट कार्डचा नंबर मागतो. त्यानंतर आलेला ओटीपी मागितला जातो त्यामुळे फसवणूक होते. याशिवाय दोन-तीन दिवस बँका बंद राहणार या धास्तीने खातेदार अशा गोष्टीला बळी पडतो. त्यामुळे बँकेविषयीची माहिती फोनवरून कुणालाही सांगू नये. - सीमा दातारकर, प्रभारी अधिकारी सायबर पोलिस ठाणे

Trending