आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Seven Members Of The Congress Suspended For The Session Due To Muddle In The Lok Sabha

लोकसभेत गोंधळ घातल्याने काँग्रेसचे सात सदस्य अधिवेशन काळासाठी निलंबित

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गुरुवारी लोकसभेत गोंधळ घातला. सभापतींच्या आसनासमोर येत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. - Divya Marathi
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गुरुवारी लोकसभेत गोंधळ घातला. सभापतींच्या आसनासमोर येत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
  • गांधी, नेहरू कुटुंबाबाबत राजस्थानातील खासदाराचे आक्षेपार्ह वक्तव्य
  • उर्वरित कालावधीसाठी आता काँग्रेसचे ४५ खासदारच राहतील उपस्थित

नवी दिल्ली - लोकसभेत खनिज नियमन दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याच्या वेळी गोंधळ घालत कागद फाडल्याने काँग्रेसच्या सात सदस्यांना गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबित करण्यात आले. यामुळे आता काँग्रेसचे ४५ खासदार सभागृहात उपस्थित राहतील.सभागृहाचे कामकाज तीन वेळा स्थगित करण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता कामकाजास सुरुवात झाल्यानंतर पीठासीन उपसभापती मीनाक्षी लेखी यांनी काँग्रेसचे गौरव गोगोई, टी. एन. प्रतापन, डीन कुरियाकोस, बेनी बेहनान, मणिकम टागोर, गुरजितसिंग अौजला आणि राजमोहन उन्निथन यांना नामांकित केले. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी या सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. त्यानंतर उपसभापतींनी या सदस्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आणि या सदस्यांना तत्काळ सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.नेहरू, गांधी कुटुंबाबाबत लोकसभेत राष्ट्रीय लाेकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनीवाल यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात काँग्रेस तसेच इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केल्याने खनिज नियमन दुरुस्ती विधेयक २०२० सभागृहात मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आल्यानंतर दुपारी दोन वाजता कामकाजास सुरुवात होताच विरोधी पक्षांचे सदस्य हातात फलक घेऊन अध्यक्षांच्या आसनाजवळ गेले. त्यांनी नेहरू, गांधी कुटुंबाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या खासदारास निलंबित करण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सभापतींच्या आसनासमोर हे सदस्य मोठा फलक घेऊन उभे राहिले. उपसभापतींनी २ वाजेच्या सुमारास सभागृहाचे कामकाज स्थगित केले. दुपारी ३ वाजता सभागृहाच्या कामकाजास  पुन्हा सुरुवात झाल्यानंतरही गोंधळ सुरूच होता. काँग्रेसच्या सदस्यांनी कागद फाडून फेकले. देशाच्या संसदीय इतिहासात असे आधी कधीच झाले नसल्याचे सांगत पीठासीन उपसभापती मीनाक्षी लेखी यांनी नाराजी व्यक्त केली.खनिज नियमन दुरुस्ती विधेयक लटकले

गदारोळातच पीठासीन उपाध्यक्ष रमादेवी यांनी विधेयकाशी संबंधित अध्यादेशावर संवैधानिक संकल्प सादर करण्यासाठी रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पक्षाचे एन. के. प्रेमचंद्रन यांचे नाव पुकारले. प्रेमचंद्रन यांनी संविधानिक संकल्प सादर केला. मात्र, ते म्हणाले की, सभागृहात शांतता नसल्याने बोलू शकत नाही. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हे विधेयक महत्त्वाचे असल्याने चर्चेशिवाय लगेच ते मंजूर करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, हे महत्त्वाचे विधेयक आहे. यामुळे खाण क्षेत्रात मोठे बदल होतील आणि कोळशाची टंचाई दूर होईल. या विधेयकात कोळसा खाणींच्या वाटपासाठी उत्पादित कोळशाचा वापर करण्याबाबतची अट काढणे आणि परदेशी कंपन्यांनाही बोली लावण्याचा अधिकार देण्याची तरतूद आहे. उपसभापती रमादेवी यांनी विधेयकाच्या दुरुस्तीवर एक-एक करत चर्चा सुरू केली.