आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जानेवारीपासून सातवा वेतन आयोग, मूळ वेतन 23 टक्क्यांपर्यंत वाढणार; कर्मचारी, पेन्शनधारकांना लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- येत्या जानेवारीपासून राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग लागू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात अाला. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वाढीव वेतनाचे लाभ हाती पडणार अाहेत. १७ लाखांपेक्षा अधिक सरकारी कर्मचारी व सुमारे ७ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ होईल. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात २३ टक्क्यांपर्यंत वाढ होणार असल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पाच दिवसांचा अाठवडा करण्याच्या मागणीचा निर्णय मात्र पुन्हा मुख्यमंत्र्यांकडे टाेलवण्यात अाला अाहे. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा वेतन आयोग लागू हाेईल. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर २४,७८५ कोटी रुपयांचा  बोजा पडणार आहे. सातवा वेतन आयोग जानेवारीपासून लागू करावा यासाठी सरकारी कर्मचारी सतत आंदोलन करीत होते. ५ जानेवारी रोजीही त्यांनी सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा दिला होता.

 

सातव्या वेतन आयोगातील महत्त्वपूर्ण तरतुदी...

वेतनश्रेण्यांची संख्या ३८ वरून ३१. सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन निश्चिती- १ जानेवारी २०१६ रोजीच्या मूळ वेतनास (वेतन बँडमधील वेतन अधिक ग्रेड वेतन) २.५७ ने गुणून होणार वेतन निश्चिती. वेतनवाढ १ जुलैऐवजी १ जानेवारी किंवा १ जुलै असे दोन तारखांपासून. पोलिस शिपाई, नाईक, हवालदार या संवर्गाना सध्या ५०० रुपये दराने मिळणाऱ्या विशेष वेतनात ५० टक्क्यांची वाढ. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी मंजूर होणारे महागाई भत्त्यांचे दर राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांनाही लागू होणार.


सेवेतील कर्मचारी : थकबाकी ५ समान हप्त्यांत जीपीएफ खात्यात
सेवेतील कर्मचाऱ्यांना ३८,६५५ कोटींची ३ वर्षांपासूनची देय थकबाकी २०१९-२० पासून ५ वर्षांत ५ समान हप्त्यांत भविष्य निर्वाह निधी व पेन्शन योजनेत जमा केली जाईल. ही रक्कम जमा केल्याच्या दिनांकापासून २ वर्षे काढून घेता येणार नाही. १०, २० आणि ३० वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ वेतनश्रेणीचे ३ लाभ मिळतील.

 

अंशकालिक कर्मचारी : अडीच पट वेतनवाढीचा लाभ मिळेल
या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात किमान ६०० व कमाल १,२०० रु. वेतन होते. आता ते अनुक्रमे १,५०० ते ३,५०० रु. झाले. ड वर्ग कर्मचाऱ्यांना आधी ५,७४० रु. मूळ वेतन होते. ते १५ हजार होईल. क वर्गाचे किमान ७ हजारांचे मूळ वेतन १८ हजार होईल. किमान पेन्शनही २,८८४ वरून ७,५०० रुपयांवर.

 

निवृत्त कर्मचारी : किमान निवृत्तिवेतन ७५०० रुपयांवर
- निवृत्त कर्मचाऱ्यांची थकबाकी पुढील आर्थिक वर्षापासून ५ हप्त्यांत रोखीने. किमान निवृत्तिवेतन ७५०० रुपये, तर ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा निवृत्तिवेतनास २.५७ ने गुणून निवृत्तिवेतन मिळणार.

 

- ८० ते ८५ वयोगटातील पेन्शनर्सना मूळ पेन्शनमध्ये १०% वाढ मिळेल. ८५ ते ९० गटाला १५%, ९० ते ९५ गटाला २०%, ९५ ते १०० गटाला २५%, १०० वर्षांवरील गटाला ५०% वाढ मिळेल. ग्रॅच्युइटीची मर्यादा ७ लाखांवरून १४ लाख रुपयांवर.

 

बातम्या आणखी आहेत...