आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगावात ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश बलात्काराच्या तक्रारीनंतर एक अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- माजलगाव येथे मुलींना विविध आमिषे दाखवून त्यांना सेक्स रॅकेटमध्ये ओढण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पाच जणांविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. एका आरोपीला ताब्यात घेतले असून इतर आरोपी फरार आहेत. दरम्यान, यामध्ये दोन महिलांचाही समावेश असून हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट समोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून गुप्तता पाळण्यात येत आहे. 


माजलगाव शहरातील एका नामांकित महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलीला विविध आमिषे दाखवून सेक्स रॅकेटमध्ये आेढण्यात आले होते.  काही दिवसांपूर्वी या मुलीने विष घेत आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. बीडमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान,रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर पुन्हा तिची प्रकृती बिघडल्याने औरंगाबाद येथील रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. बदनामीपोटी मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली नव्हती. पोलिसांना या रॅकेटची कुणकुण लागताच पोलिसांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांना तक्रार देण्याबाबत समुपदेशन केले. इतर अनेक मुलींना भविष्यात या रॅकेटमधून वाचवण्यासाठी हे आवश्यक असल्याचे पटल्याने मुलीने या प्रकरणात तक्रार दिली.  दरम्यान, या प्रकरणात पोलिसांकडून  गोपनीयता बाळगण्यात येत असून पोलिस उघडपणे काहीच बोलण्यास तयार नाहीत.


सात दिवसांची कोठडी  
माजलगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून मुलीने विष घेतले त्याच दिवशी उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. अटक केलेल्या एकाला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


विशेष पथक पाठवून जबाब 
माजलगाव पाेलिसांनी विशेष पथक पाठवून औरंगाबादेत रुग्णालयात जाऊन मुलीचा इन कॅमेरा जबाब नोंदवला आहे.  रॅकेटमध्ये अनेक मुली अडकल्या आहेत. पीडित मुलीने तक्रार देऊ नये यासाठी तिच्यावर व कुटुंबीयांवर मोठा दबाव होता.  


अनेक मुलींची फसवणूक  झाल्याचा संशय
या रॅकेटने अनेक मुलींची फसवणूक करून त्यांना वाममार्गाला लावले आहे. त्यामुळे तपासात पीडित मुलींची संख्या तसेच आरोपींची संख्याही वाढणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणात मोठी मंडळीही गुंतली आहे. हे महाविद्यालय नामांकित असल्याने पोलिसांकडून गोपनीयता पाळत तपास केला जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...