आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड बायपासजवळील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, डमी ग्राहकाने खिडकीतून थुंकताच पोलिसांनी टाकली धाड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आराेपींना न्यायालयात हजर करण्यात आले. छाया : रवी खंडाळकर - Divya Marathi
आराेपींना न्यायालयात हजर करण्यात आले. छाया : रवी खंडाळकर

औरंगाबाद : बीड बायपास लगत झाल्टा फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या दोन बंगल्यांमध्ये छापा टाकून औरंगाबाद पोलिसांनी भरदिवसा चालणारे सेक्स रॅकेट उघडकीस आणले. शनिवारी दुपारी झालेल्या या कारवाईत कोलकाता येथील दोन, हैदराबादेतील एक आणि औरंगाबाद येथील एक अशा चार तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात अाली. चार ग्राहकांमध्ये शहरातील प्राेझाेन माॅलचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्या चौघांसह दलाली करणाऱ्या दोन महिला व अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. बनावट ग्राहकांना पाठवून इशारा करण्याच्या सूचना पाेलिसांनी दिल्या हाेत्या. त्यानुसार, बनावट ग्राहकांना काही तथ्य अाढळले तर खिडकीतून थुंकण्यास सांगण्यात अाले हाेते. तसा इशारा मिळताच पाेलिसांनी कारवाई केली.

परराज्यातून आलेल्या तरुणींचा उपयोग करून शहरात अवैधरीत्या देहविक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलिस लक्ष ठेवून हाेते. शनिवारी डमी ग्राहकाने पाेलिसांना इशारा केल्यानंतर दोन्ही बंगल्यांत छापा टाकण्यात आला. यातील एक बंगला राजेशनगरमध्ये, तर दुसरा यशवंतनगरमध्ये असला तरी दोन्ही बंगल्यांत केवळ काही मीटरचे अंतर आहे. एका बंगल्यात कोलकाता येथून आलेल्या दोन आणि हैदराबाद येथून आलेली एक तरुणी ग्राहकांसह आढळून आली. दुसऱ्या बंगल्यात औरंगाबाद येथील परित्यक्ता तरुणीसह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. संजय त्र्यंबक कापसे (४४) हा गणेशनगरमधील रहिवासी आणि सिडको एन-४ मध्ये राहणारा विनोद टेकचंद नागवणे (३५) या दोघांना अवैधरीत्या तरुणींना देहविक्री करायला लावल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. यातील संजय कापसे याला अशाच प्रकरणात यापूर्वी दोन वेळा अटक करण्यात आली होती. जामिनावर सुटताच तो पुन्हा तोच गुन्हा करताना तिसऱ्यांदा आढळून आला आहे. या दोघांना यासाठी मदत करणाऱ्या दोन महिलांनाही अटक केली आहे.

तरुणींसोबत आढळून आलेल्या चौघांना अटक
 
छाप्यात तरुणीसाेबत असलेल्या चौघांना अटक करण्यात आली. त्यात प्राेझाेन माॅलचा सीईओ मोहंमद अर्शद साजिद आली (४९, रा. एमआयडीसी, चिकलठाणा), अजय सुभाष साळवे,(२३, रा. आनंदनगर), ज्ञानेश्वर सर्जेराव जऱ्हाड (४२, रा. स्टेशनरोड, बदनापूर) व अमोल शेजूळ (२९, रा. म्हाडा कॉलनी, मुकुंदवाडी) यांचा समावेश आहे. 

चारही ग्राहकांना सशर्त जामीन
 
अजय साळवे, ज्ञानेश्वर जऱ्हाड, माेहंमद अर्शद व अमोल शेजूळ या पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले. त्यांना कोर्टाने १५ दिवस ठाण्यात हजेरी व इतर अटी-शर्तींसह प्रत्येकी १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अभयसिंग भोसले, अ‍ॅड. किरण दंताळ, अ‍ॅड. सीताराम चव्हाण यांनी काम पाहिले.

सेक्स रॅकेट प्रकरणातील आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, विदेशी मद्यासह ५० हजार रुपये जप्त


औरंगाबाद शहरात उघडकीस अालेल्या सेक्स रॅकेटमधील अाराेपी संजय कापसे, कविता जाधव, विनोद नागवणे या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना १३ डिसेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली.

पाेलिसांनी अाराेपींना न्यायालयात हजर करून बाजू मांडली. या प्रकरणात आरोपी पिडितांकडून बळजबरी देहविक्री व्यवसाय करून घेत होते. त्यांना ब्लॅकमेल करत होते. अनेक महिला व अल्पवयीन मुलींची या अाराेपींच्या ताब्यातून सुटका करावयाची अाहे, असे पाेलिसांनी न्यायालयात सांगितले. घटनास्थळावर फक्त गोवा राज्यात विक्री परवानगी असणारे २७ हजार ८४० रुपये किंमतीचे दहा दारूचे बॉक्स सापडले असून ते शहरात कोणी आणले, त्याची विक्री कशी करत होते, याचा तपास करावयाचा असल्याने अाराेपींना पाेलिस काेठडी द्यावी, अशी मागणाी पाेलिसांनी केली. आरोपी हा देहविक्रीचा व्यवसाय बऱ्याच कालावधीपासून करत आहेत. त्यामुळे त्याची व्याप्ती बरीच मोठी व साखळी पद्धतीने आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करावयाचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील योगेश सरोदे यांनी न्यायालयाकडे केली. ही विनंती मान्य करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी चौघा आरोपींना १३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

गोव्याच्या दारूचा साठाही

या कारवाईत पोलिसांना दोन्ही बंगल्यांतून विदेशी मद्याच्या बाटल्यांचे १० खोके आढळून आले. केवळ गाेवा येथे विकण्याची परवानगी असलेली ही दारू, कंडोमची १०० पाकिटेही पाेलिसांनी जप्त केली. दोन वयस्क महिलांकडे सुमारे ५० हजार रुपये रोख आढळून आले. ग्राहकांकडून एका तासासाठी ३ हजार रुपये मिळत. त्यातील निम्मी रक्कम या महिला स्वत:कडे ठेवून घेते.

तरुणींना पाठवले सुधारगृहात

चार तरुणींपैकी दाेघी कोलकाता येथून आठवडाभरापूर्वीच शहरात आल्या होत्या. त्यानंतर हैदराबाद येथून एक तरुणीही सामील झाली. या तिघी एका बंगल्यात सापडल्या. दुसऱ्या बंगल्यात आढळलेली तरुणी परित्यक्त्या असल्याचे सांगण्यात आले. तिची पैशांची गरज लक्षात घेऊन तिला जाळ्यात ओढण्यात आरोपींना यश आले असावे. या कारवाईनंतर चौघींचीही रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

दोषींवर कारवाई करणार, एम्पायर मॉल कंपनीचा खुलासा

प्रोझोन मॉलचे पालकत्व असलेल्या एम्पायर माॅल प्रा.लिमिटेड या कंपनीने अनैतिक कृत्यातील दोषी कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. आमचे दोन कर्मचाऱ्यांना अनैतिक कृत्य करताना पकडण्यात आले. अशा अनैतिक कृत्यांबद्दल कंपनीचे कठोर धोरण असून वस्तुस्थितीची योग्य चौकशी करून कंपनीच्या धोरणानुसार कारवाई करण्यात येईल. कायदेशीर आणि न्यायालयीन प्रणालीवर कंपनीचा विश्वास असून संबंधित अधिकाऱ्यांना सहकार्य करु, असे कंपनीने आपल्या खुलाश्यात म्हटले आहे.

बनावट ग्राहकाच्या जाळ्यात अडकले

या कारवाईसाठी दोन्ही ठिकाणी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवले होते. त्यासाठी या ग्राहकांनी आधी संजय कापसेशी संपर्क केला होता. त्याने मोबाइलवर तरुणींचे फोटो दाखवून पसंती विचारली होती. रक्कम निश्चित झाल्यावर त्यांना बंगल्यात नेण्यात आले. तिथे अाराेपी रंगेहात पकडले जाण्यासारखी स्थिती आहे याची खात्री करून बनावट ग्राहकांनी पोलिसांना इशारा केला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी तातडीने छापे टाकले आणि हे रॅकेट उघडकीस आले. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, निरीक्षक मधुकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोज शिंदे, सहायक उपनिरीक्षक नितीन मोरे, पोलिस नाईक भगवान शिलोटे, विलास वाघ, परभत म्हस्के, संजय खोसरे, आप्पासाहेब खिल्लारी, विशाल पाटील, सुलताना शेख, सरीता भोपळे, अाशा कुंटे यांनी दोन्ही कारवाया पार पाडल्या.

ब्रेन वॉश करून महिलांना ओढले जातेय जाळ्यात

कापसेला यापूर्वी दाेन वेळेस सेक्स रॅकेटच्या आरोपामध्ये अटक करण्यात आली आहे. हर्सुल परिसरातून त्याला गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यामुळे त्याच्या माध्यमातून शहरातील अनेक महिला, तरुणींचे ब्रेन वॉश करून कापसेची टोळी सेक्स रॅकेटमध्ये त्यांना ओढत आहे. कापसेच्या जवळील एका महिलेचे कामगार चौक परिसरात ब्युटी पार्लर आहे. तेथे येणाऱ्या महिला, महाविद्यालयीन विद्यार्थीनींशी जवळीक साधून, त्यांची आर्थिक अडचण लक्षात येताच किंवा पैशांचे आमिष दाखवून या रॅकेटमध्ये ओढले जात असून त्याची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.