वसतिगृहात लैंगिक शोषण; पीडितांचा आकडा सातवर, चंद्रपुरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील प्रकार

दिव्य मराठी

Apr 21,2019 09:48:00 AM IST

नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहात लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुलींची संख्या आता सातवर पोहोचली आहे, तर या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपवला जाणार आहे. सोमवारी यासंदर्भातील आदेश काढले जातील, अशी माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.


संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या राजुरा येथील या अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी वसतिगृहाचे अधीक्षक, उपअधीक्षक आणि दोन वॉर्डनना अटक करून त्यांच्यावर बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, वसतिगृहातील आणखी दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले असल्याचे वैद्यकीय तपासणीतून निष्पन्न झाले असून चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पीडित मुलींची संख्या सातवर पोहोचली आहे. या मुलींनी पालकांसह राजुरा पोलिस ठाण्यात येऊन तक्रारी नोंदवल्या आहेत. त्यानंतर त्यांची चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करण्यात आल्यावर ही बाब स्पष्ट झाली. या प्रकरणात १८ ते २० मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून आतापर्यंत ८ मुलींच्या पालकांनी राजुरा पोलिसांकडे तक्रारी केल्या असून त्यापैकी सात प्रकरणांमध्ये लैंगिक शोषण झाल्याचा वैद्यकीय दुजोरा मिळाला आहे.


सीआयडी तपासणीचे आदेश सोमवारी निघण्याची शक्यता
मुलींवरील अत्याचारप्रकरणी संतप्त नागरिकांनी राजुरा येथे मोठा मोर्चा काढून सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाच्या केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशीची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. स्थानिक पोलिसांच्या तपासावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवणेच योग्य ठरेल, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे. त्यामुळे हे प्रकरण सीआयडीकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असून सोमवारी यासंदर्भात आदेश निघतील, अशी माहिती गृह विभागातील सूत्रांनी दिली.

काँग्रेसच्या माजी आमदाराची संस्था, समितीने केली चौकशी
इंग्रजी शाळा आणि आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे संचालन करणारी इन्फँट जीझस सोसायटी ही संस्था काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांची असून ते या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या चारसदस्यीय चौकशी समितीने इन्फँट जीझस स्कूलच्या परिसरात जाऊन चौकशी केली. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक प्रशासनाने शाळेचा परिसर ताब्यात घेतला आहे.

X