आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कहब तो लग जायी धक से!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं तर जात नावाची ही ‘बिनपायऱ्यांंची इमारत’ बॉलीवूडच्या मोठ्या कॅमेऱ्यांच्या रक्तात इतकी भिनलेली आहे की तिच्या वरच्या मजल्यांवर कायमचा मुक्काम असताना मग ‘आता कुठेय जात?’ म्हणणाऱ्या कॅमेऱ्यांना जब्याच्या दगडाने इतकं हादरवलं त्याचं एवढं आश्चर्य काय? गेल्या काही वर्षांत मग एकामागोमाग एक सिनेमे येत गेले आणि गृहीत धरल्यामुळे दुर्लक्ष होणाऱ्या या जातीच्या इमारतीकडे फोकस करून पॉपकॉर्न खात बसलेल्या जनतेच्या डोळ्यांवरचे गॉगल उतरवू लागले.

 

पावसाची रिपरिप चालू असल्यामुळे रात्र आहे की दिवस कळत नाही. अंधारून आलेल्या आसमंतातून एका तरुण मुलीचा खणखणीत आवाज पावसाच्या ठेक्यावर ऐकू येतो, “कहब तो लग जायी धक से!” तिला साथ देत सात-आठ लोक गातात, “धक से!” हळूहळू भरून आलेल्या आकाशावरून कॅमेरा गावाबाहेरच्या वस्तीतल्या एका झोपडीच्या आडोशाला उभ्या असणाऱ्या घोळक्याकडे येतो आणि रांगड्या भोजपुरीमध्ये गाणारे लोक आपल्याला दिसतात. तरुण गौरा मोठ्या जोशात गातेय आणि पाऊसवारा अंगावर घेत तिच्या आजूबाजूचे लोक तिला साथ देतायत. ‘कहब तो लग जायी धक से’ या भोजपुरी शब्दांचा अर्थ ‘बोलायला लागलो तर जोरात लागेल!’ असा आहे. दूरवर पसरलेल्या लखनऊ हायवेवरून जाणाऱ्या पोलिसांच्या जीपकडे जाण्याआधी कॅमेरा गौराच्या आणि तिच्या साथीदारांवर खिळलेला आहे. अनुभव सिन्हाच्या ‘आर्टिकल १५’ची ही सुरूवात भोजपुरी न समजणाऱ्या जनतेलाही सावध करून मग लखनऊ हायवेवरून पळू लागते. 


सूर्य उगवतो आणि गावात उजेड पडतो तसा गावकुसाबाहेरसुद्धा पडतो. आपल्या ‘फिल्म इंडस्ट्री’चा कॅमेरा मात्र बहुतेक वेळा गावाचं सुंदर, रोमँटिक चित्र दाखवताना गावातल्या एकाच वस्तीतून फिरत राहतो. दिवसांमागून दिवस जातात. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. अचानक एक दिवस उजेड आणि अंधाराच्या मधे गावकुसाबाहेरून येणाऱ्या एका तरुण मुलीच्या खणखणीत आवाजाने कॅमेरा दचकून आपली नेहमीची वाट सोडून ठेचकाळत त्या आवाजाचा माग काढत जातो. चालता चालता त्याला जे दिसतं त्यानं तो कापू लागतो आणि आवाज येत राहतो, “आम्ही बोलू लागलो ना, तर मग लागंल बघा जोरात!” 


उघड्या गटारातून पळणारी डुकरं बघता बघता त्याला दिसतं की इथले स्वतंत्र कॅमेरे उभे राहू लागले आहेत. ते लांब लांब पसरलेली केवढी तरी जमीन टिपतायत त्यांच्यासमोरची. भकभकीत दुपारी गावाबाहेरच्या मोकळ्या माळावर उन्हानं करपणाऱ्या जमीनीवरून काळ्या चिमणीचा पाठलाग करत भटकणारा जब्या पाहत तो शांत बसू पाहतोय तोच मोठा दगड येतो त्याच्या दिशेने आणि क्षणात अंधार पसरतो.


खरं तर जात नावाची ही ‘बिनपायऱ्यांंची इमारत’ बॉलीवूडच्या मोठ्या कॅमेऱ्यांच्या रक्तात इतकी भिनलेली आहे की तिच्या वरच्या मजल्यांवर कायमचा मुक्काम असताना मग ‘आता कुठेय जात?’ म्हणणाऱ्या कॅमेऱ्यांना जब्याच्या दगडाने इतकं हादरवलं त्याचं एवढं आश्चर्य काय? गेल्या काही वर्षांत मग एकामागोमाग एक सिनेमे येत गेले आणि गृहित धरल्यामुळे दुर्लक्ष होणाऱ्या या जातीच्या इमारतीकडे फोकस करून पॉपकॉर्न खात बसलेल्या जनतेच्या डोळ्यांवरचे गॉगल उतरवू लागले. गेल्या वर्षी आलेला पा रंजिथ ‘काला’ आणि नुकताच प्रदर्शित झालेला ‘आर्टिकल १५’ ही त्यातली अत्यंत ताकदीची दोन उदाहरणं.  सुपरहीरो सुपरमॅन रजनीकांतला पहिल्यांदाच ‘माणूस’ म्हणून दाखवणारा ‘काला’ महानगरातल्या प्रचंड झोपडपट्टीतून दिमाखात चक्कर मारून आला. ‘काला’ येण्याआधी सिनेमात धारावी दिसली नव्हती असं नाही, पण तिथली रंगीत, जिवंत माणसं, गिचमिड चाळीतल्या डॅशिंग ‘तूफानी’ मुली आणि बुद्धविहारासमोर उभा असलेला दाक्षिणात्य आंबेडकरी हीरो हे चित्र पहिल्यांदाच मोठ्या स्क्रीनवर त्याच्या उत्सवी उत्साहात उमटलं. ‘विकासा’च्या नावावर झोपडपट्टीतल्या कष्टकरी जनतेच्या मालकीची जमीन हडपणाऱ्या हरिभाऊ अभ्यंकर या क्रूर राजकारण्याच्या विरोधात उभं राहिलेलं ‘काला’च्या नेतृत्वाचं राजकारण एकाच वेळी बॉलीवूडच्या कितीतरी गृहितकांना आव्हान देत ठामपणे उभं होतं. शुद्धता, स्वच्छता, पावित्र्याच्या खोट्या मुखवट्यांना हात घालून काला थेट रामकथेलाच यूटर्न घ्यायला लावतो. जात आणि हिंसा या आपल्यापासून दूरच्या, आपल्या नजरेपलीकडच्या गोष्टी आहेत असं मानणाऱ्या शहरी प्रेक्षकाला त्याच्या अंगणातला, त्याच्या पायाखालचा जातीयतेचा चिखल आणि सत्तेचं थंड, क्रूर रुपडं दाखवून ‘काला’ सहजपणे आपल्यासोबत, आपल्या नजरेतून दिसणारं ‘शहर’ किती वेगळं आहे हे सांगतो. पा रंजिथचा कॅमेरा जातीच्या इमारतीच्या खालून आपला फोकस स्थिर ठेवतो. या इमारतीतून चोवीस तास जे विष उकळलं जातं त्याचा जीवघेणा कडवटपणा अर्थातच इमारतीच्या खालच्या मजल्यांना जास्त सोसावा लागतो. आपला मजला जितका उंच तितकी त्यापासून वाचण्याची, त्याकडे दुर्लक्ष करता येण्याची शक्यता जास्त. तरीही प्रत्येक मजल्यावर काही लोक आपल्या मनातल्या ओलेपणाला उत्तर देत हे विष उतरवण्यासाठी प्रयत्न करतात. हे तेच लोक असतात, ज्यांना इमारतीचा ‘मॅनिफॅक्चरिंग डिफेक्ट’, तिच्यातली खोट दिसत राहते सतत. ‘आर्टिकल १५’ मधला तरुण अयान रंजन हा अशा काही लोकांपैकी आहे. परदेशातून दिल्लीत आणि मग दिल्लीहून उत्तर प्रदेशातल्या लालगावपर्यंत पोहोचेस्तोवर त्याला आपण गृहीत धरलेली आपली ‘जात’ व्यवस्थित कळू लागते. ‘पासी’ लोकांच्या गावातल्या पाणी आणि सावल्यांनेही आपल्याला स्पर्श करू नये, म्हणून स्वतःला जपणाऱ्या तथाकथित उच्चजातीय पोलिस अधिकाऱ्यांना बघून चकित झालेल्या अयानला त्याची मैत्रीण आठवण करून देते की त्याची आईसुद्धा वर्षानुवर्ष घरी काम करणाऱ्या मोलकरणींसाठीची भांडी कशी बाजूला ठेवत आली ते. जातीचं विष पिऊन झालेले भीषण बलात्कार आणि खून पाहून अयान अंतर्बाह्य हादरतो आणि पोलिस स्टेशनबाहेरच्या कचऱ्यातून चालता चालता आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगतो, “आजवर परदेशात आपल्या भारताचं किती कौतुक केलं मी. तिथल्या लोकांना इकडे कधीतरी यायचं आमंत्रण देताना ताज महाल आणि खजुराहो आपल्या बापाची मालमत्ता असल्यासारखे विकले मी… पण इथे जे चाललंय त्याचं आता काय करू मी? मला आजही या देशाचा अभिमान आहे, पण केवळ तीन रुपयांसाठी, त्यांच्या जातीमुळे दोन लहान मुलींचा जिथे बळी घेतला जातो त्याचा कसा अभिमान बाळगू?”


भारताला स्वातंत्र्य मिळालं, आपण आपलं संविधान लिहिलं आणि त्यात मूलभूत हक्कांचं पंधरावं कलम इथल्या नागरिकांसाठी समानतेच्या अधिकाराची हमी घेऊन आलं. सत्तर वर्षं होता होता भारत नावाची लोकशाही समजदार होऊ लागली. संविधानाच्या मूलभूत मूल्यांमधली आधुनिकता आणि जातविरोधी राजकारण आता कुठे इतकं झिरपलं की जनतेला हलवेल इतकी त्यामध्ये ताकद गोळा झाली. गावाकडे पहा नाहीतर शहराकडे, जिथे जाऊ तिथून ते डोकं वर काढू लागलं आणि जातीचा विषय टाळायचा म्हणूनही कॅमेऱ्याला ते जमेनासं झालं. एरवी पिढ्यानपिढ्या गावकुसाबाहेर गप राहावं लागतंय म्हणून मान खाली घालून जगताना जब्याला आता शाळेचा रस्ता मिळाला. त्याच्याबरोबरच्या सगळ्या मुलांमध्ये बसून शिकायला, खेळायला लागल्यावरच तर त्याला ही पिढ्यानपिढ्यांची गुलामी जाणवून टोचू लागली. एरवी कॉलेज आणि विद्यापिठात पोहोचू न शकणारे रोहित वेमुला आणि पायल तडवी तिथपर्यंत आले तेव्हाच तर ‘कोट्या’तून येण्याचं दुःख त्यांच्या वाट्याला आलं. 
या सगळ्या बॅकग्राउंडवर ‘आर्टिकल १५’मध्ये रोहित, जिग्नेश आणि चंद्रशेखर आझाद रावण यांचा आवाज होऊन निषाद ठामपणे उभा राहिला. ‘सब हिंदुओं की एकता’ म्हणत दलितांचे जीव घेणाऱ्या साधू-महंत-नेत्यांच्या डोळ्यांत डोळे घालून तो उभा राहिला. ‘बॉर्डरपेक्षा गटारात अधिक लोक शहिद होतात’ असं म्हणताना त्यानं दुसऱ्या तीरावरून दलदलीतल्या चिखलात उतरताना अयानला पाहिलं आणि तो समजुतीनं ओळखीचं हसला. ‘हरिजन’ म्हणून वाट्याला आलेली लाचारी आणि ‘बहुजन’ म्हटल्यानंतर काही वर्षांपूर्वी हत्ती आणि फुलाचं एकत्र चालणं पाहून गोंधळून गेलेला पोलिस अधिकारी त्याला अस्वस्थ करत होता… पण आज हा अस्वस्थपणा, कितीतरी वर्षांची त्याची बेचैनी वाटून घ्यायला त्याचा कॅमेरा त्याच्या बरोबर होता. आपला रांगडा, रंगीत जल्लोष घेऊन आलेला ‘काला’ आणि बॉब डिलन ऐकत गौराच्या गाण्यापर्यंत पोचू पाहणारा ‘आर्टिकल १५’ यांनी तर ‘धक से’ बोलायला सुरुवात केली. आता आपण आपले कान साफ करून किती ऐकू शकतोय हे पाहायचं. वाट वाकडी करून नवे रस्ते धुंडाळण्यासाठी कॅमेरा धडपड करतोय. आताच निघायला हवं. आपल्या घराबाहेर पडून ऊन वारा खात त्याच्यासोबत रानोमाळ, शहरा शहरात, गल्लोगल्ली भटकण्यासाठी.

 
लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२
 

बातम्या आणखी आहेत...