आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Spotted An Event To Felicitate The Winner Of Shah Rukh Khan La Trobe University PhD Scholarship

शाहरुखच्या नावाने दिली जाते ला ट्रोब युनिव्हर्सिटीची पीएच. डी स्कॉलरशिप, विजेत्याला कोट घालताना दिसला सुपरस्टार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः ‘ला ट्रोब’ विद्यापीठाचे कुलपती जॉन ब्राम्बी एओ यांच्या हस्ते प्रतिष्ठेची ‘शाहरुख खान ला ट्रोब पीएचडी शिष्यवृत्ती’ दक्षिण भारतातील केरळमधील पीएचडी संशोधन विद्यार्थिनी गोपिका कोट्टनथरायील भाशी हिला मुंबईत झालेल्या एका समारंभात प्रदान करण्यात आली. ही शिष्यवृत्ती 2 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची (साधारण 9.4 दशलक्ष भारतीय रुपये) असून तब्बल 800 विद्यार्थीनींमधून पशुविज्ञान, पर्यावरणशास्त्र आणि आण्विक अभ्यासाच्या माध्यमातून कृषीपरंपरा सुधारण्याची आस असलेल्या गोपिका कोट्टनथरायील भाशी हिची या शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. ही शिष्यवृत्ती चार वर्षासाठी असणार आहे.


गोपिका ही जगातील मधमाशांचे विविध विषाणू व प्रदुषाकांपासून रक्षण व्हावे तसेच वनस्पतींमधील घटती विविधता संरक्षित व्हावी म्हणून नवीन तंत्र शोधण्याचे काम करत असलेल्या ‘ला ट्रोब’च्या चमूमध्ये सामील होणार आहे. गोपिका ही मधमाशांवरील विषाणूसाठी प्रत्यक्ष करण्यात येणाऱ्या निदान चाचणीच्या संशोधनावर काम करणार आहे. या संशोधनाचा हेतू हा मधमाशांच्या आरोग्यासाठी उपचारपद्धती विकसित करणे हासुद्धा आहे.


शाहरुख खानने गोपिकाचे तसेच जगाला भेडसावणाऱ्या समस्यांवर समाधान शोधण्यापोटी तिची जी चिकाटी आहे तिचे खूप कौतुक केले. गोपिकाचे समर्पण आणि तिची चिकाटी याचे मला विशेष कौतुक आहे. या शिष्यवृत्तीमुळे तिला ऑस्ट्रेलिया येथील मेलबोर्नमधील ‘ला ट्रोब’मध्ये जात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. तिथे तिला तिचे स्वप्न पूर्ण करत भारतातील कृषी क्षेत्रातील सुधारणेला हातभार लावण्याचे काम करता येणार आहे. कोणत्याही देशासाठी पुढे जाण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण असे शाहरुख खान म्हणाला.  


कॅलीकट विद्यापीठातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या गोपिकाला प्राण्यांच्या आरोग्याबद्दल खूप ओढ आहे. शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या गोपिकाने केरळ येथील आशियाई हत्तींच्या व्यवस्थापनावर संशोधन केले आहे. गेले वर्षभर ती तिच्या कुटुंबाचा कुकुटपालन फार्म सांभाळत होती. तिच्या वडिलांवर बायपास शस्त्रक्रिया झाल्याने ही जबाबदारी तिच्यावर आली होती. या काळात गोपिकाने अन्न, पाणी, आजार आणि हवामान या गोष्टींचा पाळीव गायी-म्हशींवर अन्ननिर्मितीच्या दृष्टीने काय परिणाम होतो यावर संशोधन केले.

ही 2 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरची (साधारण 9.4 दशलक्ष भारतीय रुपये) शिष्यवृत्ती असून तिची घोषणा ऑगस्ट 2019 मध्ये झाली होती. ‘ला ट्रोब विद्यापीठा’ने शाहरुख खानला मानद पदवी बहाल केली तेव्हा ही घोषणा झाली. ही पदवी विद्यापीठाने शाहरुख खानला ते मीर फाऊंडेशनच्या माध्यमातून अॅसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या सबलीकरण व पाठबळासाठी जे काम करत आहेत आणि त्यांचे एकूणच जे मानवतावादी काम आहे, त्याचा गौरव करण्यासाठी दिली होती. 


भारतातून 800 हूनही अधिक विद्यार्थिनींनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. त्यातून तीनजणींची अंतिम फेरीत निवड झाली आणि त्यातून गोपिकाची अंतिम विजेता म्हणून निवड झाली. ‘ला ट्रोब ग्रॅज्युएट रिसर्च स्कूल’मधील शिक्षकांच्या स्वतंत्र परीक्षक मंडळाने ही निवड केली.