आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असत्याच्या आधारावर काँग्रेसवर निशाणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या सत्ताधारी पक्षाचा विश्वास असत्याच्या शक्तीवर जास्त आहे. गोबेल्सचा फॉर्म्युलाच आहे. सत्य पादत्राणे घालून तयार होईपर्यंत असत्य अर्ध्या जगाची भ्रमंती करून येते. मी या तंत्राचा बळी ठरलो आहे. मी एक वक्तव्य करतो. नंतर माझे शब्द जाणूनबुजून फिरवले जातात. प्रवक्ते आणि पक्षातील नेत्यांचे जत्थे त्यावर संतप्त प्रतिक्रिया देतात. यात मंत्र्यांचाही समावेश असतो. माध्यमे ही खोट्याची मालिका वारंवार दाखवत राहतात. 

 

काही दिवसांपूर्वी पुन्हा हेच घडले. मी 'हिंदू'च्या लिटलिव्ह फेस्टिव्हलमध्ये प्रज्ञावंत गोपालकृष्ण गांधी यांच्याशी संवाद साधला. एका गृहस्थाने अयोध्येवर प्रश्न विचारला. ते हिंदुत्वाचे समर्थक असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांना थेट उत्तर देण्याची गरज होती. मी म्हटले,'एक हिंदू म्हणून मला याची जाणीव आहे की, राम जन्मभूमी तीच आहे, असे माझे असंख्य सहधर्मी मानतात. त्यामुळे तेथे रामाचा जन्म झाला आहे, असे मानून बहुतांश चांगल्या हिंदूंना त्या ठिकाणी मंदिर पाहण्याची इच्छा आहे. पण मला हेदेखील माहिती आहे की, चांगल्या हिंदूंना दुसऱ्या कुणाचे श्रद्धास्थान नष्ट करून मंदिर बांधले जावे, असे कदापि वाटणार नाही.' 

 

आयोजनातील व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहून माझे शब्द पडताळून पाहता येतील. पण भाजपने माझ्या शब्दांची मोडतोड करत दावा केला की, मी माझ्या सहधर्मींना 'चांगले हिंदू' आणि 'वाईट हिंदू' या दोन गटांत विभागले. तसेच माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत म्हटले की, चांगल्या हिंदूंना अयोध्येत मंदिर बांधायची इच्छा नाही. पण मी थेट असे काही बोललोच नव्हतो. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. नऊ वृत्तवाहिन्यांवरील निवेदकांनी संध्याकाळची चर्चा तसेच दिवसातील बहुतांश वेळ या त्रासदायक वादविवादावर खर्च केला. बातमीचे स्वरूप घेतलेल्या या वक्तव्यांमुळे वातावरणातही भ्रष्टपणा भारलेला आहे. आपण काय करत आहोत, याची भाजपला पूर्ण कल्पना होती. ज्या ठिकाणी अयोध्या मुद्द्याचा भावनिक प्रभाव पडण्याची शक्यता आहे, अशा तिन्ही हिंदी भाषिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी भाजप काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी मोठ्या असत्याचा आधार घेत आहे. 

 

त्यामुळेच आजही मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. पण आता मला जाणीव होत आहे की, सध्या देशात असे वातावरण असताना मी अशा शब्दांत बोलायला नको होते. आपल्या माध्यमांमध्येही सत्यासाठी कोणताही बचावाचा कोपरा नाही. तुम्ही काय वक्तव्य करता, तुमचा हेतू काय आहे, याला काहीही महत्त्व नाही. तुमचे राजकीय शत्रू काय ऐकल्याचा दावा करतात, हेच तेवढे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याच्या नेमके उलटे वक्तव्य फिरवले जाऊ शकते. तुमच्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप भरून दिला जाऊ शकतो. 

 

धार्मिक वादांवर मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे भाजपचे हे प्रयत्न आहेत. त्यामुळे रामजन्मभूमी, तीन तलाक, सबरीमाला किंवा पाकिस्तानवर तुम्ही केलेले कोणतेही वक्तव्य त्यांचा विभाजनात्मक अजेंडा पुढे नेण्यासाठी तुमच्याच विरोधात वापरले जाऊ शकते. टीआरपीच्या तत्त्वहीन आणि धोरणहीन स्पर्धेत उतरलेली माध्यमेही सत्तारूढ पक्षाचे दुर्दैवी हेतू साध्य करण्यासाठी काहीही करायला तयार होतात. बाबरी मशीद पाडली जात असताना त्यांच्याच नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा मी पुनरुच्चार करत होतो. पण याच्याशी भाजपला काही देणे-घेणेच नाही. लालकृष्ण आडवाणी यांनी लिहिले होते, 'हा माझ्या आयुष्यातील सर्वात दु:खद दिवस होता. एवढा निराश आणि हताश मी यापूर्वी कधीही नव्हतो.' या विध्वंसात सहभागी असलेल्यांना त्यांनी आवाहन केले की, या सर्वांनी पुढे यावे, आपल्या कृत्याची जबाबदारी स्वीकारावी आणि परिणामांचा सामना करावा. 


पुढे विस्ताराने बोलताना अडवाणी म्हणाले, 'बाबरी मशिदीचा ढिगारा अत्यंत भाव-सन्मानपूर्वक इतरत्र हटवल्यानंतर तेथे राम जन्मभूमीवर राम मंदिर स्थापन करणे, हाच भाजपचा उद्देश आहे. हे सर्व कायदेशीर प्रक्रियेद्वारे किंवा हिंदू-मुस्लिम समूहांमध्ये सौहार्दपूर्वक चर्चेतून साध्य करण्याची आमची इच्छा आहे.' पण असे झाले नाही, हे सर्वांनाच माहिती आहे. त्या दिवशी माझे वक्तव्य मोडूनतोडून त्याचा सारखा जप लावणाऱ्या भाजपच्या त्या प्रवक्त्यांसाठी तसेच सर्व वृत्तवाहिन्यांच्या निवेदकांसाठी मग अडवाणी आणि वाजपेयी हे 'चांगले हिंदू' नाहीत का? 
अटलबिहारी वाजपेयी यांनी आपण हिंदू असल्याचा गर्व एका कवितेतून व्यक्त केला आहे. त्यात माझी बाजू त्यांनी उत्तमरीत्या मांडली आहे. या कवितेच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.- 

कोई बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ीं? भू-भाग नहीं, शत-शत मानव के हृदय जीतने का निश्चय। 

हिन्दू तन-मन, हिन्दू जीवन, रग-रग हिन्दू मेरा परिचय! 
हिंदू धर्मात जे काही चांगले आहे, ते प्रतीकाच्या स्वरूपात स्थापन करण्याचा प्रयत्न वाजपेयी यांनी केला होता. अशा स्थितीत त्यांनी त्यांच्या पक्षाकडून बोलणाऱ्यांचे असे दावे ऐकले असते, तर आयुष्यात त्यांनी जी मूल्ये आणि नैतिक तत्त्वांचा अभिमान बाळगला होता, त्या तत्त्वांना आजच्या भारतात कोठेही स्थान नाही, हे त्यांना जाणवले असते. 

 

त्यामुळे मी बोलायला नको होते. संधिसाधू माध्यमांद्वारे आपले राजकीय वक्तव्य अनेक मर्यादा ओलांडून फिरवले जाते, आपले सृजनात्मक बोलही रेटिंग वाढवण्यासाठी वादग्रस्त ठरवले जाते, अशा वेळी सत्याच्या बाजूचा थोडाही सन्मान केला जात नाही, अशा काळात आपण राहतो, याचे मला भान असणे गरजेचे होते. 

 

माझे हितचिंतकही मला हेच म्हणतात की, मी तेव्हा बोलायला नको होते. कारण आता यावर कोणतीही निष्पक्ष सुनावणी होणार नाही. अशा पद्धतीची लोकशाही व्यवस्था सध्या आपल्या देशात अस्तित्वात आहे. माझ्या पक्षाला ठेच पोहोचवण्यासाठी माझे शब्द फिरवले जातील. जी मूल्ये आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी मी राजकारणात आहे, त्यांचेही नुकसान केले जाईल. लोकशाहीतील वाद या मर्यादेपर्यंत पोहोचलेले पाहून मला खेद वाटतो. त्या वक्तव्यामुळे तत्त्वहीन आणि माथेफिरू नेत्यांना मी माझ्या तत्त्वांना बाधा पोहोचवण्याची आणखी एक संधी देऊन चूकच केली. 


सध्या देशात असे वातावरण असताना मी अशा शब्दांत बोलायला नको होते. आपल्या माध्यमांमध्येही सत्यासाठी कोणताही बचावाचा कोपरा नाही. तुम्ही काय वक्तव्य करता, तुमचा हेतू काय आहे, याला काहीही महत्त्व नाही. तुमचे राजकीय शत्रू काय ऐकल्याचा दावा करतात, हेच तेवढे महत्त्वाचे आहे. तुम्हाला जे म्हणायचे आहे, त्याच्या नेमके उलटे वक्तव्य फिरवले जाऊ शकते. तुमच्याविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप भरून दिला जाऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...