खोती आणि जमीनदारी विरोधातील बाबासाहेब

शाहू पाटोळे

Apr 14,2019 12:16:00 AM IST

१४ एप्रिल १९२९ रोजी चिपळूण येथे झालेल्या पहिल्या ‘रत्नागिरी शेतकरी परिषदेचे’ अध्यक्षस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भूषवले होते; आज त्या घटनेला नव्वद वर्षे पूर्ण होताहेत. या परिषदेत सावकार आणि जमीनदारांच्या विरोधातील कोकणातील शेतकऱ्यांच्या चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली होती...


‘खोतीविरुद्धचा लढा’ या पुस्तकाचे लेखक चंद्रकांत पांडुरंग अधिकारी, हे बाबासाहेबांच्या या चळवळीत वयाच्या सोळाव्या वर्षांपासून कार्यरत होते. त्यांचे निधन ४ जुलै १९८९ रोजी झाले.त्यांनी अनेक ऐतिहासिक संदर्भ गोळा करून हे, प्रबंधपूरक पुस्तक लिहिले. त्यांची इच्छा हा दस्तऐवज PES ने प्रकाशित करावा, अशी होती. ती PESच्या अडचणीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्या निधनाच्या दहा वर्षांनंतर त्यांच्या पत्नी श्रीमती उषा चंद्रकांत अधिकारी आणि त्यांच्या मुलांची हे पुस्तक प्रकाशित केले, हे विशेष. हे पुस्तक कोकणातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, चळवळ आणि त्यातून झालेल्या स्थित्यंतराचा अभ्यास करणारांसाठी संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणारे आहे.

खोती आणि सावकारीच्या दुष्टचक्रात कोकणातील महार समाजच नव्हे, तर बहुसंख्येने असलेला कुणबी मराठा समाज अडकलेला होता. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहात सवर्ण समजाचे पुढारी सहभागी झाले होते, तसेच खोती आणि सावकारी विरुद्धच्या लढ्यात भाई अनंतराव चित्रे, सुरेंद्रनाथ टिपणीस उपाख्य सुरबानाना, नारायण नागू पाटील (सा. ‘कृषिवल’चे संपादक), वकील चंद्रकांत अधिकारी हे पुढारी नेतृत्व करीत होते; (या सर्वांनी पुढे ‘स्वतंत्र मजूर पक्षाचे’ नेतृत्व केले). या आंदोलनाच्या उभारणीस १९२५ पासून सुरुवात झालेली होती. त्यासाठी बाबासाहेब कोकणात सभा घेत होते. त्याची परिणती म्हणजे, १४ एप्रिल १९२९ ची चिपळूणची परीषद. या सभेस कुणबी, मराठा, चर्मकार आणि महार समाजाचे लोकं मोठ्या संख्येने उपस्थित होते. याच परिषदेत बाबासाहेबांनी ‘सामाजिक समतेची चळवळ’ हाती घेण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, महाडच्या आंदोलनामुळे धीट झालेले महार शेतकऱ्यांसाठीच्या सभेला मोठ्या संख्येने येत. पण कुणबी-शेतकरी मात्र यायला बिचकत. नंतरच्या या आंदोलनाच्या जितक्या सभा झाल्या, त्या सभेच्या ठिकाणी महार कार्यकर्ते एखाद्या लढवय्या पलटणीप्रमाणे काठ्या, घोंगड्या घेऊन पुढे बसत. त्यांच्या आधाराने मागच्या बाजूस कुणबी, मराठा वगैरे बसत. कोकणातील महार समाज खोतीविरुद्धच्या लढ्यात ‘स्वयंसेवक’ म्हणून उभा राहिला. कोकणातील ही चळवळ एकमेव मुस्लिम संस्थान जंजिऱ्यात उभी करणे, जिकिरीचे होते, पण तिथेही ही चळवळ उभी राहिली, हे विशेष.


बाबासाहेबांनी एप्रिल १९३०च्या चिपळूण येथील शेतकरी परिषदेत ‘खोती जमीनदारी नष्ट करण्याच्या चळवळीची’ घोषणा केली. त्यानंतर लगेच भाई चित्रे यांनी चळवळीच्या बांधणीस सुरुवात केली. या चळवळीची कुलाबा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खोती,जमीनदारीच्या विरोधातली पहिली सभा माणगाव तालुक्यात गोरेगाव येथे १९३०च्या मे महिन्याच्या पहिल्या रविवारी घेण्यात आली. या सभांमध्ये ‘पांढरपेशा’ समाज सहभागी होत नसे. सभांच्या आयोजनासाठी गावोगावचा महार समाज, भाई चित्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मदत करीत असे. महार, शेतकरी, शेतमजूर आपापल्या गावातील इतर जातींच्या लोकांना चळवळीचे महत्व पटवून देवून त्यांना सभेसाठी आणण्यास मेहनत घेत. खोतांच्या सांगण्यावरून चळवळ दडपण्याचा सरकार जसा प्रयत्न करीत तसेच, गावोगावचे उच्चभ्रू खोत, सावकार बाबासाहेबांच्या या चळवळीस कट्टर विरोध करीत. ‘बाबासाहेबांचा उद्देश आणि उपदेश हा हिंदू धर्माचा उच्छेद करणारा, धर्म आणि जाती बाटविणारा असल्याचा’ अपप्रचार त्यावेळी सातत्याने केला जाई.


१९३५ मध्ये ‘प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुका झाल्या. त्यात बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचे १९ उमेदवार निवडून आले. मधल्या काळात बरेच सव्यापसव्य झाले. १७ सप्टेंबर १९३७ला मुंबई प्रांताच्या विधिमंडळाचे कामकाज सुरू झाल्यानंतर बाबासाहेबांनी ‘खोती पद्धती नष्ट करण्याचे विधेयक’ मांडले. तत्कालीन भारतात शेतकऱ्यांची गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या कायदे मंडळात, असे विधेयक मांडणारे, बाबासाहेब हे पहिले लोकप्रतिनिधी होते. तसेच बाबासाहेबांनी १८ ऑक्टोबर १९३७ला मुंबई विधिमंडळात ‘Bombay Hereditary Act 1874’मध्ये सुधारणा करण्याचे विधेयक मांडले. त्या दिवशी महार वतनाच्या गुलामगिरीतून महार समाजाला मुक्त करण्याचा लढा सुरु झाला...!
(संदर्भ : खोतीविरुद्धचा लढा. लेखक : ‘दलितमित्र’ चंद्रकांत अधिकारी (वकील), प.आ. जुलै १९९९.
किंमत : १०० रु., पृष्ठे : १२८)


शाहू पाटोळे
[email protected]

X
COMMENT