आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेख इक्बाल मिन्ने
मोमोज म्हणजेच मोदक नाहीत हा भ्रम आपला गेला असेल. आपल्या इथल्या वडापाव आणि पाणीपुरीच्या गाड्यांजवळ आता मोमोजने अल्पावधीत जागा निर्माण केली आहे. खाबुगिरी या नव्या सदरात मोमोजच्या जन्माची कहाणी.....
मोमोज हे मूळचे तिबेटचे. मोमो हे या पदार्थाचे नाव चिनी शब्द “मोमो” (अर्थात steamed bread) वरून दिले गेले. असं म्हटलं जातं की, काठमांडू खोऱ्यातील नेवारी समाजाचे व्यापारी मोमोज हा पदार्थ आणि तो बनवण्याची पाककृती तिबेट येथील ल्हासा येथून नेपाळमध्ये घेऊन आले. तिबेटीयन बोलीभाषेतील ‘मॉग मॉग’ या शब्दापासून ‘मोमो’ची निर्मिती झालेली आहे. चायनीज भाषेत त्याचा अर्थ वाफवलेले पाव असा होतो. नेपाळमध्ये त्याला ‘ममचा’ म्हणतात, तर भारतातील आसाम आणि बंगालमध्ये त्याचे उच्चार वेगळ्या पद्धतीने केले जातात. हिमालयाच्या प्रदेशात ‘मोमो’मध्ये याक आणि मेंढीचं मांस वापरलं जातं. कालांतराने त्याचा प्रवास उतर डोंगराळ भागात आणि समुद्रसपाटीच्या प्रदेशात झाल्यानंतर चिकन, मेंढा वापरूनदेखील मोमो तयार केले जाऊ लागले. उत्तर व पूर्वोत्तर भागातील शाकाहारींच्या मागणीनुसार व्हेज मोमोज अस्तित्वात आले. आता तर शाकाहारी ‘मोमो’सुद्धा जागोजागी मिळतात. वाफवलेले ‘मोमो’ ही त्याची मुख्य ओळख असली तरी त्यामध्येही बदल होऊन हल्ली तळलेले, भाजलेल्या ‘मोमो’चाही ट्रेंड पाहायला मिळत आहे.
तिबेटचे अनेक रीतीरिवाज, त्यांचा पेहराव आणि त्यांच्या खाद्यसंस्कृतीवरसुध्दा मंगोलियन आणि चिनी संस्कृतीचा खूप मोठा पगडा आहे. त्यामुळेच मोमोजशी साधर्म्य असलेले पदार्थ तिकडेही आढळतात.चीनमधील जियाओझी, जपानमधील ग्योजा, आणि कँटोनमधील दिम सम हे या मोमोजचेच भाई-बांधव. प्रत्येक प्रांताने आपल्या सोयी आणि आवडीनुसार या सारणात थोड्याफार प्रमाणात फेरफार करून त्याला नवीन नाव आणि आपल्या प्रांताचा शिक्का दिला.
आजही या डोंगराळ भागांमध्ये भाज्यांचा तुडवडा असल्याने मोमोज बनवण्यासाठी मीट(मांसाचा) चा वापरच जास्त प्रमाणात होतो. पण जेव्हा हा पदार्थ भारतात आला तेव्हा उत्तर व पूर्वोत्तर भागातील शाकाहारींच्या मागणीनुसार व्हेज मोमोज अस्तित्वात आले. आज व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्ही प्रकारचे मोमोज पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये मोठ्या प्रमाणात बनवले आणि लहान-मोठ्या ठिकाणांपासून अगदी पंचतारांकित हॉटेल्स पर्यंत गल्लोगल्लीतील विक्रेते आणि टपऱ्यामधून विकले जातात. या प्रत्येक प्रांतातले मोमोज वेगळ्या चवीचे, वेगळ्या रंगढंगाचे. मोमोजच्या रूपाने अगदी सहजपणे तिबेटीयन खाद्यसंस्कृतीने आपल्या फास्टफूडच्या टेस्टमध्ये एक चवदार स्थान निर्माण केलं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.