आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गर्जे मराठी’चे शाहीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनीता गानू डोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणात वाढल्या. त्यांचे आईवडील शिक्षक होते. आनंद यांना पार्ल्याची समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली. त्यांचे शालेय शिक्षण ‘पार्ले टिळक विद्यालया’त झाले. आनंदला नेहमीच काही तरी ‘वेगळे’ करायला आवडायचे. त्याच्या आईच्या भाषेत ‘आक्रित’. आक्रिताला पदर दोन असतात - नादिष्टपणा आणि ध्यास. आनंदचा नादिष्टपणा ध्यासात रूपांतरित झाला, त्याची गोष्ट म्हणजे ‘गर्जे मराठी’!


‘गर्जे मराठी’ या पुस्तकात शिक्षण व ज्ञानाच्या माध्यमातून यशोप्राप्ती करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. शिक्षण, बांधकाम, वास्तुरचना, वैद्यकीय, अर्थशास्त्र, संगीत, नाटक, तंत्रज्ञान आदि विविध क्षेत्रांतील ३१ जणांचं अल्पचरित्र पहिल्या पुस्तकात आहेत. आपल्या काळातील या जिवंत प्रेरणा इतरांना माहीत व्हाव्यात आणि त्यांच्याकडून स्फूर्ती घेता यावी, त्यांची एकत्र नोंद व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती झाल्याचे पुस्तक वाचताना स्पष्ट होते. लूप क्लांटम ग्रॅव्हिटीची थेअरी मांडणारे डॉ. अभय अष्टेकर, पद्मविभूषण अर्थतज्ज्ञ डॉ. अविनाश दीक्षित, संशोधक डॉ. अशोक गाडगीळ, इंटरनॅशनल स्टडी ग्रुपचे स्ट्रॅटेजिक अॅडव्हायजर डॉ. जयंत साठ्ये, प्रोफेसर डॉ. नरेंद्र दहोत्रे, डॉ. राजीव राजे, डॉ. अभय सातोस्कर, डॉ. मंदार बिचू, डॉ. मिनौती आपटे, संगीतातील मुकुंद मराठे, नंदकिशोर मुळ्ये आदींचा समावेश या पुस्तकात आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक व्यक्तीचा केवळ जीवनप्रवास सांगून थांबत नाही, तर त्या त्या व्यक्तीच्या कार्यक्षेत्रातील, त्यांच्या संशोधनातील अनेक पैलूंवरही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक व्यक्तिचरित्रात दिसते. या पुस्तकातल्या आणखी एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. तो म्हणजे परदेशात जपलेल्या मराठीपणाची घेतलेली विशेष नोंद. चीन, मॉरिशस आणि इस्रायल इथं मराठी संस्कृतीची जपणूक कशी होत आहे यावर विस्तृत लेखन केलं आहे. हे पुस्तक अाणि त्यात नोंदलेल्या व्यक्ती विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तिदायक अाहेत. गानू दांपत्याने हे पुस्तक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी त्याच्या प्रती महाराष्ट्रातील शाळांकडे पाठवल्या. सोबत विद्यार्थ्यांचे अभिप्राय जाणून घेण्यासाठी प्रत्येक पुस्तकासोबत काही रिटर्न पोस्टकार्ड््स जोडली. त्यांना तब्बल साडेसातशे विद्यार्थ्यांची पत्रं अाली.


सुनीता आणि आनंद, दोघे एकत्र आले ते फार्मास्युटिकल्समध्ये पदवी शिक्षण घेताना. त्यांची मने विवाहबंधनात अडकण्याएवढी तेथेच जुळली. त्यांचा सहप्रवास सुरू झाला १९७९ मध्ये. दोघांनाही कुटुंबाविषयी विलक्षण आस्था. सर्वोच्च अग्रक्रम मुलांना. शैलेश आणि गायत्री ही त्यांची दोन अपत्ये. शैलेश सध्या सिंगापूर येथे ‘विलिस टॉवर्स वॅटसन’ या मल्टिनॅशनल कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर व भागीदार आहे, तर गायत्री ‘फेसबुक’मध्ये डाटा मॅनेजर म्हणून काम पाहते.


आनंद यांनी करिअरचा प्रवास १९८०मध्ये, वयाच्या तेविसाव्या वर्षी झांबिया येथे ‘चिपाटा जनरल हॉस्पिटल’मध्ये सुरू केला. तोपर्यंत त्यांचे फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाले होते. अानंद अाणि सुनीता यांचे कार्यक्षेत्र समान असल्याने करिअरच्या कक्षा परस्परांशी जुळत होत्या. त्या दोघांनी झांबियात नोकरी केली आणि भारतात परत आल्यावर ‘सुनंद फार्मास्युटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ स्थापन केली. सुनीता यांनी १९८० ते १९८४ या काळात झांबियामध्ये चारशे खाटांच्या ‘चिपाटा जनरल हॉस्पिटल’मध्ये प्रांतीय फार्मासिस्ट म्हणून काम करताना दोन जिल्ह्यांतील हॉस्पिटल्स आणि सत्तावीस ग्रामीण आरोग्य केंद्रे यांचे काम पाहिले होते. त्या  तेव्हाच तिथल्या नर्सिंग स्कूलमध्ये फार्माकॉलॉजी हा विषय शिकवतही होत्या. सुनीता १९८७ ते १९९७ या काळात Apothecar’s या ओरल लिक्विड्स, कॅप्सूल्स आणि प्रोटीन सप्लिमेंट्स यांचे उत्पादन आणि मार्केटिंग बनवणाऱ्या कंपनीच्या प्रोप्रायटर होत्या. आनंद आणि सुनीता १९८५मध्ये झांबियातून परतले.
आनंद-सुनीता यांचे आयुष्य घर, प्रपंच, मुलांचे संगोपन, करिअर असे सर्व मिळून चारचौघांसारखे सर्वसामान्य, परंतु उच्चस्तरीय होते. पण नंतर ती दोघे लेखक म्हणून घडली हे विशेष आहे. त्याचेही मूळ त्यांच्या बालपणीच्या संस्कारांमध्ये जाणवते. त्यांचे छंद त्या संस्कारांबरोबर जोपासले गेले. आनंदच्या प्रवासी वृत्तीला झांबियामध्ये असताना बहर आला होता. त्या दोघांनी आफ्रिकेतील दहा देश पायाखाली घातले. सुनीताने तिच्या गिर्यारोहणाच्या आवडीला पुरेपूर न्याय दिला. त्या दोघांचे सहजीवन हे इतके सहित होते की, लग्न झाल्यावर त्या दोघांपैकी कोणीही एकट्याने एकदासुद्धा फिरायला किंवा पार्टीला गेलेले नाही, असे ती दोघे ठासून सांगतात. त्या दोघांनी जे काही केले ते मिळून. ‘गर्जे मराठी’ हे पुस्तकसुद्धा तसेच घडले. त्यांनी भारतासह जगाच्या नकाशावरील अनेक देशांत भटकंती केली. सुनीताने क्रमशः रोजनिशी लिहिली. आनंदने त्याच्या प्रवासाच्या अनुभवांना www.diyindiatravels.com या वेबसाइटवर शब्दबद्ध केले.
आनंदने ‘सुनंद फार्मास्युटिकल्स’ ही कंपनी तीन कामगारांना बरोबर घेऊन १९९१मध्ये सुरू केली. सुनीता सोबत होती. त्याने इंजेक्टेबल्सचे उत्पादन दुसरीकडून करून घेता घेता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली. कंपनीची प्रगती काही काळात सव्वाशे कामगार आणि दहा हजार चौरस फुटांची इमारत दाखवू लागली. पण तो व्यवसाय सुरू करताना, वाढवताना, स्थिर करताना आणि सांभाळून ठेवताना जे अनुभव आले ते आनंदच्या संवेदनशीलतेला आव्हान देणारे ठरले. कामगार चळवळीच्या आरंभकाळात कामगारांच्या हक्कांसाठी कामगार लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड डी.एस. वैद्य यांच्या नातवाला, आनंदला त्याच्या कंपनीतील कामगार आंदोलनाने मात्र कंपनी बंद करण्यास लावली! त्याने कंपनी गुंडाळण्याचा निर्णय २००६मध्ये विषण्ण मनाने घेतला. काम बंद झाले. विस्तारणारे क्षितिज सीमित झाले!


आनंद-सुनीता यांच्या जीवनात कंपनी बंद पडल्याने पोकळी निर्माण झाली. मुले मोठी होऊन स्वतंत्र झाली होती. आनंदचे पुढील तीन वर्षांत वडिलांचे छत्र हरपले. मागोमाग कॅन्सरने आईचा हळूहळू घास घेतला. त्यापूर्वी अतिशय बुद्धिमान अशी मोठी बहीण नीला हिलाही कॅन्सरने गाठले होते. कॅन्सरने जवळच्या व्यक्तींना दूर केल्यामुळे त्यांनी कॅन्सरचा वेळेवर प्रतिबंध आणि निदान यासाठी जागरूकता आणण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याने अत्यल्प शुल्कात तीन कॅन्सर निदान शिबिरे २०१७मध्ये आयोजित केली. एका हाकेसरशी मदतीसाठी धावून जाणारा असा लौकिक झालेल्या आनंदचा जनसंपर्क दांडगा होता. अनेक माणसे भेटली होती, भेटत होती आणि मुख्य म्हणजे भेटणार होती. अनेक अनुभव गाठीशी होते. आयुष्यही सर्वांसारखेच शिकवून गेले होते. अशा वेळी तो हरवलेला सूर त्यांच्या कानावर आला. बोइंग इंटरनॅशनलचे सीनियर व्हाइस प्रेसिडेंट डॉ. दिनेश केसकर भेटले, लोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान ‘Order of Australia Medal’ याने विभूषित डॉ. विजय जोशी भेटले. त्यांची थक्क करणारी विश्वभरारी पाहून आनंदचे मन नादावले. मनात मराठीच्या अभिमानाची संगीत कारंजी फुटू लागली. मॉरिशसच्या पुतळाजी अर्जुन यांनी म्हटलेले आठवले, ‘शिवाजी महाराज नसते तर आज हिंदुस्थान नसता...’ आनंदला बाबांचे शब्द आठवले, ‘आपण कोण आहोत याचा अभिमान असला तरच इतर समाज आणि त्यांच्या आस्था यांना चांगले समजून घेता येईल.’ एका रात्रीत, आनंद आणि सुनीता यांनी माहितीजाल पिंजून काढले आणि त्या रात्रीत जन्माला आले एक आक्रित. एका ध्यासाच्या रूपात - जगभर विखुरलेल्या मराठी सुरांना गवसणी घालून ‘गर्जे मराठी’ हा वाद्यमेळ जमवण्याचे!


लोकमान्य टिळक म्हणायचे, ‘सा विद्या या विमुक्तये’. टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी १ ऑगस्ट २०१७ रोजी मुक्त मराठी विद्याव्यासंगींचा पहिला वाद्यमेळ ग्रंथरूपात आकाराला आला. ‘गर्जे मराठी’ या ग्रंथाचे भव्य स्वरूपात प्रकाशन झाले. ती सुरुवात आहे आनंद-सुनीता यांच्या नव्या उद्योगाची. नव्या ध्यासाची!
अानंद गानू - 9969005157
garjemarathi@gmail.com

बातम्या आणखी आहेत...