आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार डबे मागे सोडून शकुंतलेचे इंजिन एकटेच निघाले होते पुढच्या प्रवासाला 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येवदा- विदर्भातील यवतमाळ, मुर्तीजापुरवरून दर्यापूर मार्गे १८९ किमीचा प्रवास करीत तीन जिल्ह्यांना जोडणारी शकुंतला नॅरोगेज रेल्वे मार्गावरून धावते. शिकस्त झालेल्या शकुंतलेचा कायापालट करणे गरजेचे असतानाच दशकभरापासून शासन दरबारी तिचे भिजत घोंगडे पडले आहे. दिवसागणिक तिची अवस्था बिकट होत आहे. मागील महिन्यात तिच्या एका डब्याला मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर आग लागल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी (दि. २) चार डब्यांसह प्रवाशी घेऊन निघालेलेल्या शकुंतलेचे इंजिन लेहगाव रेल्वे गेटजवळ चार डबे सोडून पुढे निघाले होते. मात्र नागरिकांनी आवाज देताच इंजिन थांबवण्यात आले. ही घटना सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. यामुळे एखाद वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची खंत प्रवाशांसह नागरिकांनी व्यक्त केली. 

 

शनिवारी नेहमीप्रमाणे शकुंतला चार डब्यांसह प्रवाशी घेऊन दर्यापूरवरून अचलपूर येथे जाण्यासाठी निघाली होती. मात्र लेहगाव रेल्वे गेटजवळ अचानक इंजिनपासून शकुंतलेचे चार डबे वेगळे झाले. ही बाब इंजिन चालकाच्या लक्षात न आल्याने तो तसाच पुढे जात होता. मात्र हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी आवाज देऊन इंजिन थांबविले. सुटलेले चार डबे जोडून शकुंतला पुढील प्रवासासाठी निघाली. मात्र या प्रकारामुळे काही काळ प्रवाशांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

 

या पूर्वीही घडला असाच प्रकार 
शकुंतलेने कात टाकावी, अशी प्रवाशांसह नागरिकांची इच्छा आहे, परंतु रेल्वे प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पूर्वीही शकुंतलेचे डबे रेल्वे पुलावर सुटल्याचा प्रकार घडला होता. शकुंतलेचा कायापालट होणे आवश्यकत असल्याच्या प्रतिक्रिया लेहगाव येथील रवी नवलकर यांच्यासह प्रवाशांनी व्यक्त केल्या. 
 

बातम्या आणखी आहेत...