आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीची आठवण आजही कायम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालिनी घुटे 

आधुनिक तंत्रज्ञानामुळे सण साजरे करण्याची पद्धत बदलली. मात्र,  त्याला बालपणीच्या आजोळच्या दिवाळीची सर नक्कीच नाही...
 

दिवाळी म्हटलं की माहेरची आठवण, मैत्रिणींच्या भेटीगाठी, खायची मज्जा आणि भाऊबीजेची ओवाळणी या खूप साऱ्या गोष्टी येतात. दिवाळी तर दरवर्षी होते, पण लहानपणाची दिवाळी ही मनात नेहमीच घर करून जाते. लहानपणी आमची आजी ही सगळ्या भावंडांना एकत्र तिळाच्या तेलाने मालिश करायची, गरम पाण्याने अंघोळ घालायची. त्यानंतर आम्हाला गरमागरम खाऊ द्यायची. रांगोळी काढण्यासाठी अंगण सारवायला लागायचे. त्यासाठी शेण गो‌ळा करावे लागायचे. प्रत्येकाच्या दारातील रांगोळी पाहत दिवसभर आम्ही फिरायचो. फराळाचा घराघरातून येणारा सुगंध, जिभेला अगदी पाणी सुटायचे. माझ्या आजीच्या हाताची चवच काही निराळी होती. सोजीच्या करंजीने तर आमचे पोटच भरायचे. सुट्टीचा काळ असल्यामुळे आम्ही दिवसभरात खेळतच असायचो. पण आठवणीने आजी वेळेवर बोलवून प्रेमाने जेवू घालायची. बोलता-बोलता मी तिला नेहमीच म्हणायचे, माझ्या लग्नात तूच करवली व्हायचं. म्हणजे मला काही काम आलं नाही तर तुलाच करायला लावणार. घरात सणांचं प्रत्येक काम पुढाकार घेऊन आजीच करायची. माझं लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा चकली केली होती. पण ती कुणीच खात नव्हतं. मी फराळाचं ताट वाढायला घेतलं की प्रत्येक जण चकली सोडून दुसरेच पदार्थ खायचे. माझ्या चकलीची चव कुणाला फारशी आवडली नाही. असा दिवाळीत कोणता तरी पदार्थ बिघडला तर मला आजीची खूप आठवण येते. ती होती त्या वेळी मी तिच्याकडून काही शिकूनही घेतले नाही. माझं लग्न झालं. मग जेव्हा पदार्थ करण्याची जबाबदारी पडली त्या वेळी सातत्याने आजीची उणीव जाणवत राहते. 

लेखिकेचा संपर्क- ९२७०१५०९९०