आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये १८ जानेवारीपासून अवतरणार धगधगते शंभूपर्व.....

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नाशिक - छत्रपती शंभूराजांची जीवनगाथा कथन करणारी व्याख्यानमाला, स्वराज्याच्या ग्रेट वंशजांशी थेट भेट, शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन व युद्धकला प्रात्यक्षिके असा भरगच्च उत्सव १८ ते २० जानेवारी या तीन दिवसांत हाेणार असून तिन्ही दिवशी राेज सायंकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिर येथे हाेणाऱ्या व्याख्यानमालेचे आयाेजन नगरसेवक तथा काँग्रेसचे पालिकेतील गटनेते शाहू खैरे यांच्या संस्कृती नाशिकने केले आहे. क्रांतिशाहीर प्रा. सचिन कानिटकर कथित या तीन दिवसीय व्याख्यानमालेत छत्रपती श्री संभाजीराजांचा जीवनपट उभा केला जाणार आहे. 

आगळीवेगळी सांस्कृतिक मेजवानी देण्याची ख्याती असलेल्या संस्कृतीच्या वतीने नाशिककरांसमाेर इतिहासातील महत्त्वाचा पट उलगडला जाणार आहे.

 

या महाेत्सवात व्याख्यानाबराेबरच दुर्मिळ शस्त्रेही आहेत. व्याख्यानमालेस विशेष अतिथी म्हणून छत्रपती शिवरायांच्या सेनापतींच्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी, म्हणजेच स्वराज्याचे 'ग्रेट' वंशज उपस्थित राहणार आहेत. तानाजी मालुसरे यांच्या वंशज श्रीमती शीतलताई मालुसरे, हंबीरराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, संताजी घोरपडे यांचे वंशज श्रीमान घोरपडे सरकार, धनाजी जाधव यांचे वंशज विक्रमसिंह राजे जाधवराव, हिंमतबहाद्दर चव्हाण यांचे वंशज संग्रामसिंह चव्हाण यांचा याप्रसंगी बहुमान करण्यात येणार आहे. 


२० जानेवारी राेजी शाेभायात्रा

शहरात क्रांतिज्योतीचे स्वागत २० जानेवारीला रामशेज किल्ल्यावरून मोटारसायकल रॅलीने करण्यात येईल. ही रॅली गोदाघाटावरील ऐतिहासिक रोकडोबा हनुमान मंदिरात आल्यानंतर स्वागत व दुपारी तीनला शोभायात्रा निघेल. शोभायात्रेत विविध खेळ, कसरतींचा समावेश असेल. छत्रपतींनी रायबाला दिलेली ऐतिहासिक कवड्यांची माळ व तानाजी मालुसरे यांची २६ किलो वजनाची तलवार शोभायात्रेतून कालिदास कलामंदिर येथे नेण्यात येणार आहे. 


कवड्यांची माळ; २६ किलाेची तलवार ठरणार आकर्षण 
शिवरायांच्या सुप्रसिद्ध कवड्यांच्या माळेचे दर्शन हे या उत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. तानाजी मालुसरे यांचा मुलगा रायबा याच्या गळ्यात साक्षात शिवरायांनी बांधलेली कवड्यांची माळ व तानाजीची २६ किलो वजनाची तलवार या उत्सवात ठेवली जाणार आहे. शिवाय, रोज शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके व शस्त्रांचे प्रदर्शन भरणार आहे. 


इतिहासच अवतरणार 
मोबाइलच्या अधीन झालेल्या पिढीला इतिहासाचे भान यावे, इतिहासाची खरी बाजू समाजापुढे यावी या हेतूने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने तीन दिवस नाशिकमध्ये छत्रपती संभाजीराजे यांचा जीवनपट उलगडला जाणार आहे. कार्यक्रम विनामूल्यअसून नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा. - शाहू खैरे, अध्यक्ष संस्कृती तथा नगरसेवक 
 

बातम्या आणखी आहेत...